‘सिनेमा खिचडी’, या पुस्तकाचे लेखक नामवंत सिनेपत्रकार आहेत. आतापर्यंत त्यांची सेहेचाळीस पुस्तके बाजारात आली असून हे सत्तेचाळीसावे पुस्तक आहे. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘शिरीष कणेकर पुरस्कार’ घोषित झाला आहे.
आपल्या पुस्तकात प्रस्तावना लिहिताना लेखक दिलीप ठाकूर लिहितात- खिचडीची टेस्ट भारी. आपल्याकडे चित्रपट म्हणजे एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट. अर्थात मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन असे मानले जाते. मनोरंजनातून प्रबोधन, जीवनाचे प्रतिबिंब असलेले चित्रपट असेही काही फंडे असतातच. खरंतर चित्रपट व चित्रपटसृष्टी हा खूपच मोठा बहुस्तरीय प्रकार आणि प्रवास आणि त्यातील लहानमोठ्या गोष्टी सांगाव्यात तेवढ्या थोड्याच! माझा सगळा भर प्रत्यक्षातील मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भटकंती, लहानमोठ्या भेटीगाठी व निरीक्षण यावर. त्यामुळे विषय, माहिती, तपशील, संदर्भ यांची कधीच कमतरता नाही. माझ्या अशाच काही लेखांचा हा संग्रह. वेगळ्या भाषेत सांगायचे तर माझे चित्रपटसृष्टीवरचे आणखी एक वाचनीय पुस्तक आणि चित्रपटाचा प्रेक्षक केंद्रस्थानी ठेवून विषयाचा विचार. लेखात मुद्दे व गुद्दे याकडे लक्ष. वाचक जास्त महत्त्वाचा.. त्यांच्याशी नाते व संबंध खूपच महत्त्वाचे.

चित्रपटाचे जग स्टुडिओपासून ऑनलाइन तिकीटापर्यंत आणि नवीन चित्रपटाच्या मुहूर्तापासून यशाच्या पार्टीपर्यंत अगदी चौफेर, बहुरंगी, बहुढंगी आणि बहुस्तरीय. एकीकडे जुन्या आठवणींचा हवाहवासा सुखावणारा फ्लॅशबॅक तर दुसरीकडे नवीन प्रवाह, आधुनिक तांत्रिक मूल्ये. चित्रपट आणि चित्रपटसृष्टीबाबत सांगावे तेवढे थोडेच. जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सपासून ओटीटीपर्यंत हा प्रवास सुरू असतानाच अनेक लहानमोठ्या गोष्टी, गप्पा, किस्से, कथा, दंतकथाही. चित्रपट अर्थात चित्रचौकट म्हणजे, अनेक लहानमोठ्या कला व विज्ञान यांची सांगड. ही या माध्यमाची व्याख्या. दुसरीकडे कोणाला हे टाइमपास, मनोरंजन वाटते तर कोणाला त्याचा सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव महत्त्वाचा वाटतो.. या सगळ्यातून हे क्षेत्र कार्यरत आहे, वाटचाल करतोय. त्यावर मी माझ्या पुस्तकातून सातत्याने फोकस टाकतोय, शोध घेतोय. अर्थात वास्तव व स्वप्नरंजन यांची एक वेगळीच सांगड या माध्यम व व्यवसायाबाबत आहे. सतत कुतूहल निर्माण करणारे असेही हे क्षेत्र आहे. याचा एक मागोवा म्हणजे माझे आणखी एक नवीन पुस्तक, ‘सिनेमा खिचडी’ हे पुस्तक आपणास माहिती व मनोरंजन यांचा आनंद देईल, आपल्या भावविश्वात नेईल, असा विश्वास आहे.
या पुस्तकात दिलीप ठाकूर पुढील विषयावर प्रकाश टाकतात- कलाकारांच्या घराची गोष्ट देखील इस्टमनकलर; सिनेमाच्या यशाचा एक मार्ग इराणी हॉटेलमधून..; मराठीशी छान नाते; फोकस कमालीस्तान स्टुडिओदेखील पडद्याआड; रिमेक नको, मूळ चित्रपटच पुनःपुन्हा पाहू…; राजेश खन्नाची फिल्मी मुहूर्तातील हौसमौज; गाना बजाना, नाचना.. भन्नाट पब्लिक संस्कृती; फियाट टॅक्सी राहिली आता चित्रपटात; ‘डरना मना है’; पाऊस पडद्यावरच पाहावा, शूटिंगमधला नाही..; पाच पैशाची गाण्याची पुस्तिका ते यू ट्यूब; गावाकडचा पिच्चर माझ्या आणि तुमच्याही; पब्लिक बोललं, पिक्चर आवडलं नाही..; शो खतम, रिळे गोडावूनमध्ये; घडतं बिघडतं ते चांगल्याकरता…; पिक्चरला मध्यंतरच नाही` स्टार्सचे नातेसंबंध कधी असली, कधी नकली; मुसळधार पावसात, सिनेमाच्या थिएटरात पिक्चर एन्जॉय करायचा; काही चित्रपटांची नावे जपलीत तर बरं होईल..; फिल्मवाल्यांचे गॉसिप्स कुठे सापडते?; डाकूपट एन्जॉय केले जात; हिटच्या ट्रॉफीज राहिल्या फक्त आठवणीत; बाल्कनी साडेपाच का बीस बोलो..; मूळ गाण्याचे खोबरे करू नका हो…; खोताची वाडी, गिरगाव महामालिकेसाठी चांगला स्पॉट; जेव्हा शो सुटतो..
सिनेमा खिचडी
लेखक: दिलीप ठाकूर
प्रकाशक: नावीन्य प्रकाशन
मूल्य: ३००/- रुपये, सवलतमूल्य: २७०/- रुपये, टपालखर्च: ५०/- रुपये

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण ( 8383888148, 9702070955)
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व पुस्तकप्रेमी आहेत.)

