Homeटॉप स्टोरीशिवजयंतीला राज्यभर वाजवा...

शिवजयंतीला राज्यभर वाजवा राज्यगीत आणि शिववंदना!

येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सवाच्या आरंभी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हा स्तरावर व्यापक प्रसिद्धी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यासंदर्भात, मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करुन घ्यावा. ज्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याठिकाणी रंग-रंगोटी करुन विद्युत रोषणाई करणे, रांगोळी काढणे, भगवा ध्वज उभारणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडियो असा समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

राज्य शासनामार्फत दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या-ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे यावर्षीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शिवजयंती

शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त राज्यात मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण १० नोव्हेंबर २०२२ रोजी वन विभागामार्फत हटविण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून मुनगंटीवार यांनी २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी मातेस चांदीचे छत्र अर्पण केले.

सन २०२३च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मुनगंटीवार यांच्यामार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

१ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ३५०व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास १८ ऑगस्ट २०२३पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकवण्यात येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा शुभारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. “मराठा साम्राज्याचे चलन” या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठी,  हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये कॉफी टेबल बुक तयार करण्यात येणार आहे.

श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content