महाराष्ट्रात निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचू लागला असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा राग आळवायला सुरूवात केली आहे. नुकत्याच केलेल्या एका जाहीर भाषणात थोरल्या पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. गेली ५० वर्षे सक्रीय राजकारणात राहिलेल्या शरद पवारांनी असा आरोप करावा हे हास्यास्पदच आहे. शरद पवार मूळचे काँग्रेसी. आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी अनेकदा काँग्रेसमध्ये बंड केले आणि वेगळी चूल मांडली. यावेळी त्यांनी कित्येक काँग्रेस नेत्यांना आपल्याबरोबर घेतले. १९७८ साली तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले शरद पवार यांनी एका रात्रीत ते सरकार पाडून विरोधकांशी संधान बांधले आणि मुख्यमंत्री झाले. अजित पवारांवर टीका करताना पवार आपला हा इतिहास विसरले. पवारांच्या अशा दगाबाज राजकीय वृत्तीमुळेच काँग्रेसने कधीच त्यांना पक्ष संघटनेतले किंवा सरकारमधले प्रमुख पद दिले नाही. परिणामी त्यांनी स्वतःचाच पक्ष काढून राजकारणातली आपली बार्गेनिंग पॉवर टिकवून धरण्याचा प्रयत्न केला. आज तोच त्यांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजितदादांकडे सोपवल्याने शरद पवार कमालीचे संतप्त झाले आहेत.
याच सभेत पवारांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले. अजितदादांवर बरसताना ते म्हणाले की, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. हे विधान करतानाही त्यांना आपला राजकीय भूतकाळ आठवला नाही. याच शरद पवारांनी ३० वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांच्यासह तेव्हाच्या अखंडित शिवसेनेच्या १८ आमदारांना फोडून काँग्रेसमध्ये नेले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना बहरत होता. पक्ष फोडायला अक्कल लागत नसती तर स्वतः शरद पवारांनी मग हा खेळ का केला? शिवसेनेसारख्या कॅडरबेस्ड पार्टीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना असलेले स्थान पाहता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा गद्दार म्हणून उल्लेख केला आणि बाळासाहेबांच्या अनुयायांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत त्याचा काही प्रमाणात फायदाही त्यांना झाला. चाणाक्ष पवारांनी हे हेरले आणि अजितदादांवर पक्ष फोडल्याबद्दल गद्दारीचा शिक्का मारत भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे पवार ठाकरेंचे अनुकरण करत असतानाच ठाकरेही थोरल्या पवारांचे अनुकरण करत मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषण करताना अचानक पाऊस सुरू झाला आणि पवारांनी त्या पावसातच उपस्थितांना संबोधित केले आणि जनतेची वाहवा मिळवली. साताऱ्यातली ही घटना. त्या निवडणुकीत साताऱ्यात भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आणि पवारांनी ज्यांच्यासाठी भिजत भाषण ठोकले होते ते श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. जनतेची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर अनेक पक्षांच्या कित्येक नेत्यांनी नंतर पावसात भिजत भाषणे ठोकली. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेही त्यात मागे राहिल्या नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
जनतेची सहानुभूती मिळविण्याचा असाच प्रयत्न शरद पवारांनी केला. ईडीच्या न आलेल्या नोटिशीचा गवगवा करत अचानक ते मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजर झाले. मी हजर आहे. माझी हवी ती चौकशी करा.. असे म्हणत पवारांनी तेथे ठिय्या दिला. ईडीचे अधिकारी नाही.. नाही.. म्हणत दमले. पण पवार काही हटेनात. शेवटी कशीबशी पवारांची समजूत काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले आणि पवार माघारी फिरले. तोपर्यंत त्यांचे काम झाले होते. जनतेत सहानुभूती निर्माण करण्यात त्यांना यश आले होते. आता तशीच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.

निवडणूक प्रचारात दोन वेळा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ठाकरेंच्या बॅगा तपासल्या आणि ठाकरेंनी एकच आकांडतांडव केले. स्वतः या तपासणीच्या प्रसंगांचे व्हिडिओ काढले. ते प्रसिद्धीमाध्यमांना दिले. या व्हिडिओदरम्यान त्यांनी तपसणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली. तुमचे नाव काय? कुठे राहता? नोकरीला कधी लागला? ओळखपत्र दाखवा. अपॉईंटमेंट लेटर दाखवा.. वगैरे वगैरे. असे असंख्य प्रश्न विचारल्यानंतर, व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी या तपासणीचा मुद्दाही बनवला. आपली तपासणी करता म्हणजे काय, असा त्यांच्या एकंदरीत बोलण्याचा सूर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅगांची तपासणी करा. जो कायदा मला लावता तो त्यांनाही लागला पाहिजे, असा कांगावा त्यांनी केला. पण या साऱ्या नाट्यात ठाकरे हे विसरले की आपण निवडणूक कर्मचाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांनी आपलेच हसे करून घेतले आहे. तपासणी कर्मचाऱ्यांकडे ठाकरेंनी अपॉईंटमेंट लेटरची विचारणा केली. कोणताही कर्मचारी खिशात अपॉईंटमेट लेटर घेऊन फिरत नाही, याचे भानही त्यांना राहिले नाही. जो कर्मचारी ओळखपत्र दाखवतो ते ओळखपत्र त्याला तो नोकरीत असलेल्या आस्थापनेकडूनच मिळालेले असते. ज्याला एखादी आस्थापना अपॉईंटमेट लेटर देते त्यालाच ओळखपत्र दिले जाते. इतके अज्ञान ठाकरेंनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले याचीच चर्चा आज होत आहे.
सहानुभूती मिळविण्याच्या अशाच एका प्रकारात याच ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदासोबतच आपल्या विधान परिषदेतल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. जनतेसाठी आणि शिवसैनिकांच्या आग्रहापोटी आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. आता जर शिवसैनिकांनाच जर मी त्या पदावर नको आहे तर मग मला त्यासाठी लागणाऱ्या आमदारकीचीही गरज नाही, अशी मल्लिनाथीही त्यांनी यावेळी केली होती. पण, प्रत्यक्षात विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण आमदारकीचा राजीनामा मात्र खिशातच ठेवला. आजही ते आमदार आहेत. जसे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम आपला राजीनामा आम्ही नेहमी खिशातच ठेवतो असे सांगायचे तसेच ठाकरे यांचा तो आमदारकीचा राजीनामा आजही त्यांच्या खिशातच आहे. सूज्ञांस अधिक काय सांगावे?