जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे प्रतिपादन, विद्यादान सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा गीता शहा यांनी केले.
उत्तन इथल्या केशवसृष्टीच्या वतीने दिला जाणारा सामाजिक योगदानाचा १६वा पुरस्कार विद्यादान सहाय्यक मंडळाच्या गीता शहा यांना नुकताच देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यादान सहाय्यक संस्थेच्या वतीने आजपर्यंत ११००च्या वर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला आहे. यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कलादिग्दर्शक, वास्तुविशारद यांचा समावेश आहे. आज ही संस्था ६ शाखा, ८ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या, २० शिक्षण क्षेत्र, ११०० कार्यरत माजी विद्यार्थी या माध्यमातून ३५ जिल्ह्यांतील ८५० विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. याचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. गीता शहा यांचा सन्मान मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्याचं काम विद्यादान सहाय्यक मंडळ करत असल्याचं डॉ. जांभेकर यांनी सांगितलं.
हुशार असलेल्या पण गरीबीमुळे शिक्षणात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना इंग्रजी संभाषण, स्वावलंबन, व्यक्तिमत्वविकास, वाचन-लेखन-कला अशा विविध विषयांसाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचा नोकरी मिळवण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांच्या घरात असल्याचं गीता शहा यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं, तर डॉ. जांभेकर यांनी समाजात एक दिवा लावण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. गीता शहा यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याने ते पायावर उभे राहिल्यावर एका विद्यार्थ्याला उभे करावे आणि ज्योतीने ज्योत पेटवावी असंही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला ठाणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. केशवसृष्टी संस्थेच्या वतीने उत्तन भागात अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात याची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाला लोकांनी मोठी गर्दी करून भरभरून दाद दिली.