मुंबईत घर नाही. असहाय्य आहात. अजिबात चिंता नको. मुंबई महापालिका तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. उद्यापासून पालिकेचा खास टोल फ्री नंबर फिरवा. त्यांच्या पात्रतेचे निकष पूर्ण करत असाल तर तुमचे आधार कार्ड काढण्यापासून कोरोनावरच्या लसीकरणापर्यंतचे सगळे काम पालिका करेल, तेही तात्पुरत्या निवाऱ्यासह.. अगदी तुम्ही सक्षम होईपर्यंत!
मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यासाठी लवकरच सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे. बेघर व्यक्तिंना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता निवारा देणे, त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवून पुन्हा समाजामध्ये सन्मानजनक स्थान मिळवून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या बेघरांबाबतच्या धोरणामध्ये समाविष्ट असतील. त्यादृष्टीने शहरी बेघर व्यक्तिंच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांकदेखील सोमवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२१पासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये कार्यरत होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) किरण दिघावकर यांनी दिली आहे.
संपूर्ण जगभरात सन २०१०पासून १० ऑक्टोबर, हा दिवस जागतिक बेघर दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. पालिका प्रशासनाकडून आजपर्यंत विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यापुढे जाऊन आता धोरण निश्चिती करुन उपक्रम राबविले जाणार आहेत. बेघरांना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता आश्रय दिल्यानंतर, त्यांना स्वावलंबी होता यावे, स्वरोजगार व स्वनिवारा मिळवता यावा, यादृष्टीने कामकाज करण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे असेल. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून सर्वप्रथम शहरी बेघरांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.

शहरी बेघर निवारा केंद्रात पालिकने हाती घेतलेल्या नवीन उपाययोजना
• शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यासाठी सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. पालिका क्षेत्रात रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठा, प्रार्थनास्थळे इत्यादी ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
• शहरी बेघर व्यक्तिंच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांकदेखील सोमवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये कार्यरत होणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधून सर्वसामान्य नागरिक, बेघरांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था, माहिती देऊ शकतील.
• बेघर निवारा केंद्रांची पुरेशी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आणखी ४ निवारा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी या ठिकाणी ही केंद्र असतील.
• माहूल येथील म्हाडा वसाहत डी सेक्टर इमारतीमध्ये २२४ खोल्या बेघर निवाऱ्याकरिता उपलब्ध करुन या ठिकाणी जवळपास १५०० व्यक्तिंची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. याच ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्रही सुरू केले जाणार आहे. परिणामी, बेघर व्यक्तिंना निवाऱ्यामध्ये आश्रयास आल्यानंतर, स्वरोजगारक्षम व स्वावलंबी होऊन समाजात पुन्हा स्थान मिळेल.
• बेघर निवारा केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी विविध शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून संबंधित नागरिकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी आवश्यक ती शासकीय ओळखपत्र बनविण्याची योग्य प्रक्रिया करण्यात येत आहे.
• बेघर निवारा केंद्रांमध्ये विविध शासकीय यंत्रणांच्या भेटी घडवून आणण्यात येत आहेत. जसे की, पालिकेचे संबंधित विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महिला बचत गट, वस्ती इतर संघ, शहर संघ यांना निमंत्रित करुन बेघरांना विविध योजनांचा लाभ मिळेल, त्यांना रोजगार प्राप्ती होवून स्वावलंबी होता येईल, स्वनिवारा मिळवता येईल, याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
• केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या, पात्र नागरिकांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणदेखील करण्यात येत आहे.
• जागतिक बेघर दिनाच्या पार्श्वभूमीवर, बेघर निवारा केंद्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मनोधैर्य वाढीसाठी आरोग्य तपासणी व सांस्कृतिक उपक्रमदेखील होणार आहेत. तसेच त्यांना मास्क व सॅनिटायझर वितरित केले जाणार आहेत.
• बेघरांसाठी असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना तसेच बेघर निवाऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील रेल्वेस्थानकांबाहेर व सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे, दृकश्राव्य माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा उपयोग करुन जनजागृती करणे, हे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

शहरी बेघर निवारा केंद्रांसाठी पालिकेकडून आतापर्यंत केलेल्या उपाययोजना
• मुंबई महानगरात सद्यस्थितीत शहरी बेघर असलेल्या प्रौढांसाठी एकूण १२ निवारा केंद्र सुरू आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता ३४२ व्यक्ती सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत २३९ नागरिक वास्तव्यास आहेत.
• मुंबई महानगरात सद्यस्थितीत शहरी बेघर असलेल्या १८ वर्षे वयाखालील मुलांसाठी एकूण ११ निवारा केंद्र सुरू आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता ५९० मुले सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत ४८८ मुले वास्तव्यास आहेत.
• दरवर्षी, पावसाळ्याच्या कालावधीपुरते म्हणजे १ जून ते ३१ ऑक्टोबर हा कालावधी ग्राह्य धरुन अतिरिक्त बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात येतात. सध्या मुंबईत ठिकठिकाणी मिळून असे १२ केंद्र सुरू आहेत. त्यांची क्षमता ९३० व्यक्ती इतकी असून त्यात २६९ नागरिक राहत आहेत.
• या विविध निवारा केंद्रांचे कामकाज चालवून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी निरनिराळ्या संस्थांची मदत होत असते. या संस्थांना दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत निधी देण्यात येतो. या संस्थांसमवेत पालिकेचे त्या-त्या विभागातील समाज विकास अधिकारी (नियोजन) समन्वय साधून देखरेख करतात.

