झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काही लोक आधी सुपरमॅन, त्यानंतर पूजनीय आणि नंतर देव बनू पाहत आहेत, अशा आशयाचे विधान भागवत यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीचे नेते खडबडून जागे झाले. महाराष्ट्रात भाजपाचे प्रभारी, सहप्रभारी पोहोचले. दोन-दोन दिवस बैठका झाल्या. संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही बैठक झाली आणि हे बैठकांचे सत्र अजूनही चालूच आहे. या सर्व प्रक्रियेत भाजपाला जो फायदा व्हायचा तो होईलच. मात्र, भाजपाच्या आमदार नितेश राणेंना दुसऱ्या फळीतले होण्याची बक्षिसी मिळाली.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून रोज सकाळी प्रसिद्धीमाध्यमांपुढे त्यांना हवे त्या विषयावर आपले मत मांडतात. यावेळी त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले जाते. त्याच्या जोडीने राऊत राज्यातले महायुतीचे सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्यावर वाट्टेल ती टीका करतात. प्रत्येक घडामोडीवर हवा तो, वाट्टेल तो आरोप त्यांच्याकडून केला जातो. यापैकी एकही तक्रार ते संबंधित तपासयंत्रणेकडे करत नाहीत. दुर्दैवाने आपल्याकडे काही वृत्तवाहिन्या आहेत ज्या याबद्दल राऊतांना विचारत नाहीत आणि ते जे आरोप करतात ते पूर्णपणे प्रसारित करतात. काही वृत्तवाहिन्या तर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना वृत्तपत्रातल्या अग्रलेखांवरही बातम्या करून सामन्याची मनमुराद जाहिरात करतात.
हे सर्व सुरू असतानाच सुरूवातीला संजय राऊतना फारसे महत्त्व न देण्याची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतली. राऊत यांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपाकडून नितेश राणे यांना नेमण्यात आले. शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि दीपक केसरकर उत्तर देऊ लागले. अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावतीने अमोल मिटकरी तसेच उमेश पाटील अधूनमधून बोलू लागले, पण तेही थेट नाही. लोकसभा निवडणूक होईपर्यंत हे सत्र रोजच चालले होते. संजय राऊत आरोप करायचे आणि महायुतीतले हे नेते त्यांना उत्तर द्यायचे. जशास तसे.. असा खाक्या वापरून नितेश राणे यांनी संजय राऊत यांना थोपवण्याचा बराच प्रयत्न केला. पण अनुभवाच्या जोरावर राऊत यांनी नितेश राणेंवर मात केली. अनेकदा नितेशच्या पावलावर पाऊल ठेवत तेव्हा केंद्रात मंत्री असलेले त्यांचे पिताश्री नारायण राणे पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरेंवर थेट टीका करू लागले. मात्र, यामुळे लोकांमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाबद्दल निर्माण होत असलेली प्रतिमा पुसट होण्याऐवजी ठळक होऊ लागली आणि लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती आली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तशी गरज उरली नसल्याचे भाष्य केले. आता आम्ही म्हणजे भाजपा स्वतःच्या पायावर उभे आहोत. त्यामुळे निवडणुकीत भाजपाच्या वाटचालीत संघाने सक्रिय सहभाग घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. नड्डा उत्साहाच्या भरात असे कोणतेही विधान करतील याची सूतरामही शक्यता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी मित्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यानंतरच नड्डांनी हे भाष्य केले असावे हे रा. स्व. संघाच्या वरच्या स्तरावरील नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी हा पक्ष म्हणून सामोरे न जाता नरेंद्र मोदी ही व्यक्ती म्हणून सामोरे जाण्याच्या भाजपा नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम संपूर्ण देशात झाला. संघाचे कार्यकर्ते तितके सक्रिय राहिले नाहीत जितके ते प्रत्येक निवडणुकीत राहतात. मात्र त्यांनी हे पाहिले की सरकार भाजपाचेच येईल. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चाप बसेल. आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालात हेच चित्र समोर आले. 400 पारचा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडीचशे पारही करू शकले नाहीत. त्यांनी सरकार बनवले. परंतु आजही या सरकारवर अनेक लहानमोठ्या, दोन-चार-पाच खासदार असलेल्या पक्षांचाही अंकुश आहे. पंतप्रधान मोदी पूर्वीप्रमाणेच आपले सरकार असल्याचे भासवत असले, त्याप्रमाणे मंत्रिमंडळाची रचना करून आपले विदेश दौरे आणि निर्णयप्रक्रिया कायम ठेवून आपणच केंद्र सरकारचे किल्लेदार आहोत हे दाखवत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही हे मात्र खरे…
लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि लगेचच रा. स्व. संघ सक्रिय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठेतरी आवर घालण्याची गरज त्यांना भासली. दोन-चार महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीचे सरकार सत्तेत राहवे असे संघालाही वाटते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतल्या दारूण पराभवानंतर दोन ते तीन वेळा संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. याच काळात संघाचे मुखपत्र समजले जाणारे नियतकालिक ऑर्गनायझर तसेच विवेक यामधून महाराष्ट्र भाजपाच्या त्रुटींकडे अंगुलीनिर्देशही करण्यात आला होता. पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र भाजपाने इतर पक्षांमधून घेतलेल्या नेत्यांबद्दल तसेच राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाबरोबर केलेल्या युतीवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. या सर्वातून महाराष्ट्रातल्या भाजपाने बाहेर यावे आणि स्वतःचा जो पूर्वीचा लौकिक, पूर्वीची प्रतिमा पुढे जोपासावी असा संदेश यामधून दिला गेला.
दरम्यानच्या काळात देशातल्या काही राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यामध्येही भाजपाने सपाटून मार खाल्ला. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा संघाला राष्ट्रीय स्तरावरच पुढे यावे लागले आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना ‘सुपरमॅन’चे भाष्य करावे लागले. या भाष्याचा धागा पकडत दुसऱ्याच दिवशी सकाळची रेकॉर्ड वाजवणारे संजय राऊत यांनी भागवत यांची ही टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडली आणि मोदी यांचे नाव न घेता त्यांनी एक नेते स्वतःला विष्णूचा अवतार समजतात, असा टोला लगावला. योगायोगाने तेव्हा प्रदेश भाजपाच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीत राऊत यांच्या या टोल्याचा गांभीर्याने विचार केला गेला.
संजय राऊत यांच्याबरोबर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते दस्तुरखुद्द शरद पवार आक्रमक होऊ लागल्यानंतर या आक्रमणावर उतारा म्हणून भाजपाच्या दुसरा फळीतल्या नेत्यांची फौज तयार करायचा निर्णय झाला. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, गिरीष महाजन, माधव भांडारी, अतुल भातखळकर आणि राम कदम हे भाजपा नेते रोज सकाळ-संध्याकाळ पत्रकार परिषद व मीडिया बाईट देऊन विरोधकांच्या आरोपांवर पलटवार करतील असे निश्चित करण्यात आले. रवींद्र चव्हाण, धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, मुरलीधर मोहोळ, संजय कुटे, प्रवीण दटके, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, अमित गोरखे, उज्ज्वल निकम, आशिष देशमुख, भारती पवार, देवयानी फरांदे, चित्रा वाघ, हिना गावित, अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे, अमित साटम, अनिकेत निकम यांच्यावर विभागीय स्तरावर माध्यमांसमोर विरोधकांवर निशाणा साधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
दुसऱ्या फळीतल्या या नेत्यांमध्ये नितेश राणे यांचा समावेश नाही. याआधी संजय राऊतना प्रत्त्युत्तर देण्यासाठी ते एकाकी किल्ला लढवत होते. आता त्यांना या जबाबदारीतून मोकळे करण्यात आले असले तरी भाजपाचा हिंदुत्वाचा चेहरा उजळून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्यात आली आहे. आजच त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन लव्ह जिहाद, लँड जिहादविरोधात महाराष्ट्रभर सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढण्याची घोषणा केली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी आज सकाळी केंद्रीय अर्थसंकल्पावर सडकून टीका करणाऱ्या संजय राऊतांवर पलटवार केला. भाजपाच्या अधिकृत प्रवक्त्यांच्या फोजेत समावेश असो की नसो.. संधी मिळाली की प्रहार केल्याशिवाय थांबतील तर ते नितेश राणे कसले? त्यांनी स्वतःहून दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये स्थान पटकावले. लोकसभा निवडणूक कधीही न लढलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी मात्र रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून विजयी झाले आणि भाजपाची झालेली महाराष्ट्रात झालेली वाताहत रोखण्यात थोडाफार हातभार लावला. असे असले तरी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांना स्थान मिळाले नाही. पर्यायाने नारायण राणे यांची राजकीय उंची कमी झाली असली तरी त्यांच्या चिरंजीवांची मात्र वाढली. हेही नसे थोडके…
योग्य विश्लेषण