अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली. भाजपा नेते निलेश राणे यांनी आपला सक्रिय राजकारणातल्या निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
काल दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली ही भूमिका मांडताना कोणावरही दोषारोप न करता राजकारणात मन रमत नसल्याचे कारण पुढे करत निवृत्तीची घोषणा केली. या घोषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपा नेते आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आणि निलेश राणे यांचे वरचेवर खटके उडत असल्यामुळे तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकारणात निलेश राणेंना डावलले जात असल्यामुळे राणे यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा काल रंगली होती.

त्यानंतर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वतः रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी (अधीश बंगल्यावर) जाऊन भेट घेतली. यावेळी जवळजवळ तीन तास उभयतांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर हे दोघेही नेते एकाच गाडीतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारंग, या शासकीय निवासस्थानी पोहोचले. तेथे या तिन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ सव्वा तास चर्चा झाली. आपापसातले हेवेदावे आणि मतभेद तूर्तास बाजूला ठेवा. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा अशा विविध निवडणुका सध्या दृष्टीक्षेपात आहेत. या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशावेळी आपापसातले मतभेद योग्य नव्हेत, असे सांगत फडणवीस यांनी निलेश राणे यांचे मन वळवण्यात यश मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीनंतर माध्यमांशी कोणीही नेते काहीही बोलले नाहीत. मात्र त्यानंतर निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांचे एकत्रित छायाचित्र माध्यमांकडे पोहोचते झाले. त्याचबरोबर भाजपाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निलेश राणे यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याचे घोषित केले. त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली सिंधुदूर्गमध्ये भाजपा अधिक मजबूत होईल, अशी आशाही जठार यांनी व्यक्त केली असल्याचे समजते.

