सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता दिला. विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश विश्वातील केवळ १८ वर्षीय आणि योगायोग म्हणजे १८वा खेळाडू ठरला आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतर जागतिक स्पर्धेवर विजयाची मोहोर उमटवणारा गुकेश केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. तब्बल १२ वर्षानंतर हे विजेतेपद पुन्हा एकदा भारतात आले. २०१२मध्ये आनंदने ही जागतिक स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळीदेखील शेवटच्या १४व्या डावात आनंदच्या काळ्या मोहऱ्या आणि प्रतिस्पर्धी टोपोलोवच्या पांढऱ्या मोहऱ्या होत्या. आतापण गुकेश-डिंग लढतीत तशीच स्थिती होती. बुधवारी आनंदने ५५व्या वर्षात पदार्पण केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुकेशने जागतिक स्पर्धा जिंकून आपल्या गुरुला विश्वविजेतेपदाची आगळी भेट दिली.
आनंदने तब्बल ५ वेळा ही स्पर्धा जिंकून “न भूतो न भविष्यती’ असा विक्रम अगोदरच करुन ठेवला आहे. योगायोग म्हणजे आनंद हा गुकेशचा आदर्श खेळाडू, त्याच्याचसारखी कामगिरी करुन दाखवण्याचे स्वप्न गुकेशने वयाच्या १२व्या वर्षी बघितले होते. अथक मेहनत आणि परिश्रम करुन गुकेशने अवघ्या ६ वर्षांत या स्वप्नाची पूर्तता करण्यात यश मिळविले. आनंदच्याच वेस्टब्रिज या अकादमीत गुकेश या खेळाचे धडे घेत होता. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने रशियाचा नामवंत बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोवचा अगोदरचा विक्रम मोडीत काढला. १९८५ साली गॅरीने ही स्पर्धा जिंकली होती तेव्हा तो २२ वर्षांचा होता. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जेतेपदाची पसंती या खेळातील बहुतेक जाणकारांनी गुकेशलाच दिली होती. कागदावर गुकेशचेच पारडे जड होते. गुकेशने हा अंदाज सार्थ ठरवून जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताची पत आणखी उंचावली. १४ डावांच्या या अंतिम लढतीत १३ डाव झाल्यानंतर दोघांचे गुण साडेसहा असे समान होते. त्यामुळे चौदावा डाव दोघांसाठी अत्यंत निर्णायक होता. त्यातदेखील बरोबरी झाली असती तर जेतेपदाची लढत टायब्रेकमध्ये गेली असती. कदाचित तेव्हा त्याचा फायदा डिंगला झाला असता. कारण डिंग रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन प्रकारात गुकेशपेक्षा उजवा आहे. जागतिक क्रमवारीत देखील तो या दोन्ही प्रकारात खूपच पुढे आहे.
रॅपिड प्रकारात डिंग पहिल्या तर गुकेश ४६व्या क्रमांकावर आहे. तर ब्लिट्झ विभागात डिंग ६व्या आणि गुकेश १२व्या स्थानावर आहे. एकंदरच या लढतीत डिंगचा खेळ जगज्जेत्याला साजेसा असा झाला नाही. सुरुवातीपासूनच त्याने बचावाचे आणि सावधपणे खेळण्याची योजनाच आखली होती. मानसिकदृष्ट्यादेखील डिंग तेवढ़ा सक्षम वाटत नव्हता. त्यामुळे १४वा डाव बरोबरीत सोडवून विजेतेपदासाठी सामना टायब्रेकमध्येच नेण्याचीच योजना डिंगने आखली होती. परंतु ती त्याच्या शेवटी अंगलट आली आणि गुकेशची सरशी झाली. विशेष म्हणजे या डावात डिंगकडे पांढऱ्या मोहऱ्यादेखील होत्या. त्याचा फायदा घेऊन सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ डिंगने १४व्या डावात करायला हवा होता. परंतु सुरुवातीपासूनच तो बरोबरीसाठीच खेळतोय हेच चित्र दिसत होते. ५५व्या चालीत डिंगकडून मोठी चूक झाली. मग त्यानंतर गुकेशने सामन्यावर आपली हुकूमत गाजविण्यास प्रारंभ केला. वजिराचा वापर करताना डिंगने खूप मोठी चूक केली. त्याचाच फायदा गुकेशने उठवून ५८व्या चालीत डिंगवर बाजी उलटवून आपण ६४ घरांच्या पटावरील नवा सम्राट असल्याचे बुद्धिबळ विश्वाला दाखवून दिले. शेवटची फेरी जिंकून गुकेशने ही फेरी, हा सामना जिंकून विश्वविजेतेपदाचा मुकूट मिळवला. त्याने १४ केन्यांच्या या सामन्यात ३ विजय मिळविले. ९ सामने बरोबरीत सोडवले, तर २ सामन्यात गुकेशला हार खावी लागली. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत डिंगने विजय मिळवून शानदार सुरुवात केली. परंतु या पराभवामुळे गुकेश खचला नाही. त्याने नंतरच्या फेऱ्यामध्ये आपला खेळ अधिक सफाईदार करुन डिंगच्या अडचणीत वाढ करत नेली. २०२३मध्ये इयान नेपोनियाचीला नमवून डिंगने पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा जिंकली होती. यंदा मात्र ते जेतेपद कायम राखण्यात डिंग यशस्वी ठरला नाही. या जेतेपदाची ११.४५ कोटी रुपये एवढी भरभक्कम रक्कम गुकेशला मिळाली.
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच विजेतेपदासाठी दोन आशियाई देशांमधील खेळाडूंमध्ये मुकाबला झाला. गुकेशच्या या शानदार कामगिरीचे वर्णन करायला शब्दच नाहीत. त्याची ही खडतर वाटचाल आजच्या युवा खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. एवढ्या लहान वयात त्याने मिळविलेले जबरदस्त यश निश्चितच कौतुकास्पद आहे. सध्याची त्याची खेळण्याची शैली आणि पद्धत त्याच्या वयाच्या तुलनेत खूपच प्रगल्भ आहे. एखादा गेम चांगला झाला नाही तर तो कधी निराश होत नाही. पराभवातूनच शिकण्याची खिलाडीवृत्ती तो दाखवतो. पराभव म्हणजे शिकण्याची नवी संधी हा गुकेशचा दृष्टिकोन असून तोच त्याला भावी स्पर्धांसाठी अधिक कणखर करतो. सहजासहजी तो कधीच हार मानत नाही. बरोबरीसाठीदेखील तो फारसा उत्सुक नसतो. सामना जिंकणे हेच एकमेव उद्दीष्ट ठेवून गुकेश नेहमी आक्रमक खेळतो.
७ मे २००६ रोजी गुकेशचा चेन्नई येथे जन्म झाला. शाळेत असतानाच तो या खेळाच्या प्रेमात पडला. वयाच्या ७व्या वर्षी त्याने बुद्धिबळाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय खेळाडू भास्कर नागैय्या यांच्याकडे त्याने या खेळाचे धडे गिरवले. त्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला आपल्या अकादमीत दाखल करुन घेतले आणि गुकेशच्या बुद्धिबळातील कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. वयाच्या १२व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. त्यानंतर मग गुकेशने मागे वळून बघितलेच नाही. गेली ६ वर्षे त्याच्या खेळाचा आलेख सतत उंचावत आहे. त्याचे वडिल रजनीकांत कान, नाक, घश्याचे डॉक्टर होते तर आई पद्मकुमारी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. गुकेशसोबत स्पर्धांसाठी सतत जावं लागत असल्यामुळे वडिलांनी डॉक्टरकी सोडली. मग घराचा सारा आर्थिक भार आईनेच सांभाळला. सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचणदेखील या कुटुंबियांना जाणवली. तरीदेखील आईवडिलांनी गुकेशच्या मागे ठाम उभे राहून त्याच्या कारकीर्दीला नवी झळाळी मिळवून दिली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात चेन्नईत झालेली ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकून गुकेश कँडीडेस स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्या स्पर्धेत त्याने कारुआना, नाकामोरा, प्रज्ञानंद यांना पराभूत करुन विश्व बुद्धिबळ स्पर्धेसाठी डिंगचा आव्हानवीर म्हणून पात्रता मिळवली. आता बुद्धिबळ विश्वात रशियाप्रमाणेच भारताने आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या शतकात २ दशकात भारतात अवघे ४ ग्रँडमास्टर आनंद, प्रविण ठिपसे, दिवेंदू बारुआ, अभिजित कुंटे हे होते. परंतु गेल्या अडीच दशकांमध्ये तब्बल ८० भारतीय बुद्धिबळपटूंनी हा मानाचा किताब संपादन करुन बुद्धिबळ विश्वाला आपली ताकद दाखवून दिली. याअगोदर झालेल्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने प्रथमच पुरुष आणि महिला गटाची जेतेपद पटकाविण्याचा आगळा पराक्रम केला. त्या स्पर्धेतदेखील गुकेशने भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली होती. त्याने वैयक्तिक सुवर्णपदकदेखील जिंकले होते. आता जागतिक स्पर्धा जिंकून गुकेशने २०२४, या वर्षाचा गोड शेवट भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी केला आहे असेच म्हणावे लागले. गुकेशने जागतिक स्पर्धा जिंकली. परंतु राष्ट्रीय स्पर्धेत मात्र त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली. आता राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यासाठी गुकेश नक्कीच प्रयत्नशील असेल. येणाऱ्या नविन वर्षात गुकेश बुद्धिबळातील नवनवी शिखरे सर करेल अशी आशा करुया.