आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) शह देण्यासाठी कंबर कसली असून पुणे जिल्ह्यातले शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्याकरीता येत्या १४ जुलैला दुपारी १ वाजता बारामतीत अभूतपूर्व अशी जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे खासदार तटकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात तसेच राज्यात इतर ठिकाणीही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचाच वरचष्मा दिसून आला. बारामतीत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
या जाहीर सभेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांच्या वीजमाफीची योजना, तरुण-तरुणींना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना, सोयाबीन व कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय, ई-पिंक रिक्षा, अशा सरकारने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्यासाठी पक्षाकडून वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
मागील आठवड्यात पक्षाच्या विविध सेल, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या दोन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात त्यांचे मत जाणून घेण्यात आले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पाचे मोठया प्रमाणात कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. याची जाणीव मनात ठेवत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता काम करणार आहे. आज सकाळीही राष्ट्रवादीचे नेते पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे यावर चर्चा करणार असल्याचे कळते.