Wednesday, October 16, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटइराणी करंडकावर पुन्हा...

इराणी करंडकावर पुन्हा मुंबईचा कब्जा!

भारतीय क्रिकेट विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल २७ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर बलाढ्य मुंबई संघाने पुन्हा एकदा करंडकावर कब्जा करण्याचा पराक्रम केला. लखनऊ येथे झालेल्या शेष भारत विरुद्ध मुंबई यांच्यातील इराणी करंडक सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील महत्त्वाच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदावर पुन्हा एकदा नाव कोरले. आपला लढाऊ बाणा आणि खडूस वृत्ती, या दोन महत्त्वाच्या बाबींची मुंबई संघाने प्रचिती देत शेष भारत संघावर विजय मिळवण्यात यश मिळवले. २०२४-२५च्या नव्या क्रिकेट मोसमाचा मुंबई संघाने ही स्पर्धा जिंकून जोरदार शुभारंभ केला. मुंबईने यापूर्वी १९९७-९८ साली इराणी करंडक जिंकला होता. तेव्हा शेष भारत संघावर मुंबईने ५४ धावांनी निर्णायक विजय मिळवला होता. योगायोग म्हणजे त्यावेळीदेखील ५ ऑक्टोबर हीच विजयाच्या दिवशीची तारीख होती. यंदादेखील तोच तारखेचा योग जुळून आला. मुंबईचे या स्पर्धेतील हे १५वे विजेतेपद होते. ८ वेळा मुंबईचा संघ ह्या स्पर्धेत उपविजेता राहिला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या पाचव्या दिवशी मंबईचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. परंतु दोन्ही दिवशी मुंबईने आपला लढाऊ बाणा दाखवून शेष भारत संघाला जेतेपदापासून दूर ठेवले. शेष भारत संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक जिंकली. सामन्याच्या पहिल्या दिवशी वातावरण काहीसे पावसाळी आणि ढगाळ असल्यामुळे गायकवाडने मुंबईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. सुरुवातीला त्याचा हा निर्णय काहीसा यशस्वी ठरला. मुंबईची ३ बाद ३७ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. शॉ ४ धावा, म्हात्रे १९ आणि तामोरे शून्यावर झटपट तंबूत परतले. मग या कठीण समयी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी ४थ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून मुंबईचा डाव सावरला. अजिंक्यचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले तर अय्यरला मात्र अर्धशतक झाल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. जानेवारी २०२४मध्ये आसामविरुद्ध रहाणेने प्रथम दर्जाच्या सामन्यातील शेवटची शतकी खेळी केली होती. त्यानंतर गेले नऊ महिने रहाणेला शतक हुलकावणी देत आहे.

हे दोघे बाद झाल्यानंतर युवा फलंदाज सर्फराझ खानने जबरदस्त नाबाद द्विशतकी खेळी करून मुंबईला पहिल्या डावात ५३७ धावाचा डोंगर उभारू देण्यात मोठी भूमिका बजावली. त्याला तनुष कोटियनने अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. इराणी चषक सामन्यात द्विशतक ठोकणारा सर्फराज खान मुंबईचा पहिला फलंदाज ठरला आहे. याअगोदर मुंबईतर्फे सर्वाधिक धावा रामनाथ पारकर यांनी केल्या होत्या. त्यांनी १९७२ साली पुण्यात झालेल्या सामन्यात १९५ धावांची मोठी खेळी केली होती. सर्फराझ खानने द्विशतकी खेळी करून पारकर यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकला. सर्फराझ खानने आपल्या नाबाद द्विशतकी खेळीत २८६ चेंडूंचा मुकाबला करताना २५ चौकर ठोकून नाबाद २२२ धावा फटकावल्या. शतकाजवळ असताना खानला एकमेव जीवदान मिळाले. याचा अपवाद वगळता त्याने शेष भारत संघाच्या गोलंदाजांना बाद करण्याची एकही संधी दिली नाही. मिळालेल्या जीवदानाचा खानने पुरेपूर फायदा घेतला. लढवय्याला नेहमीच नशिबाची साथ मिळते. तसेच काहीसे सर्फराझ खानबाबत झाले.

शेष भारत संघातर्फे वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने सुरेख मारा करताना ५ बळी टिपले. मुंबईच्या पहिल्या डावातील ५३७ या धावसंख्येला उत्तर देताना शेष भारत संघाचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला. शेष भारत संघातर्फे सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावांची जबरदस्त खेळी करून त्यांच्या पहिल्या डावातील आघाडी घेण्याच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. त्याने ध्रुव जुरेलसोबत ५व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून शेष भारताची झुंज कायम ठेवली. परंतु तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे शेष भारत संघ पहिल्या डावात आघाडीपासून वंचित राहिला. ५ बाद ३९३ धावा अशा सुस्थितित असलेला शेष भारत संघ मुंबईची मोठी धावसंख्या ओलांडणार असे काहीसे चित्र सामन्याच्या ४थ्या दिवशी निर्माण झाले होते. परंतु ईश्वरन (१९१ धावा), जुरेल (१३ धावा) हे दोघे धोकादायक फलंदाज परतल्यानंतर शेष भारत संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अवघ्या २३ धावांत त्यांचे ५ फलंदाज माघारी परतले.

फिरकी गोलंदाज मुलानीने ईश्वरन आणि जुरेल यांचे महत्त्वाचे बळी घेऊन मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जम बसलेल्या ईश्वरन तसेच जुरेल यांनी कारण नसताना स्वीप फटका मारण्याची जोखीम घेतली. तीच त्यांच्या अंगलट आली. कर्णधार ऋतुराज गायकवाड मात्र या लढतीत मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या ९ धावा काढून बाद झाला. ईश्वरनचे हे प्रथम दर्जाच्या सामन्यातील २६वे शतक होते. या स्पर्धेअगोदर झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत ईश्वरनने २ दमदार शतके काढली होती. २०१३ साली प. बंगालतर्फे पदार्पण करणारा ईश्वरन सातत्याने धावा करत असून भारतीय संघाचे दार ठोठावत आहे. मुंबईतर्फे मुलानी आणि कोटीयनने प्रत्येकी ३ बळी घेतले तर अवस्थीला २ बळी मिळाले.

सामन्यातील शेवटच्या दिवशी मुंबईची सकाळी ८ बाद १७१ धावा अशी काहीशी बिकट अवस्था झाली होती. सलामीवीर शॉने ७६ धावांची झटपट खेळी करून मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. परंतु तो बाद झाल्यानंतर मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतले. त्यावेळी मुंबईचा संघ अडचणीत असताना तनुष कोटीयन आणि मोहित अवस्थी या दोघांनी मुंबईची पडझड रोखली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करून नवा विक्रम केला. या स्पर्धेच्या इतिहासात ही आजवरची नवव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागिदारी होती. तनुषने शानदार शतक ठोकले. तर मोहितने अर्थशतकी खेळी केली. शेष भारत संघाचा फिरकी गोलंदाज सरनेश जैनने ६ बळी घेऊन आपली चुणूक दाखवली.

अभिमन्यू ईश्वरनप्रमाणेच मुलानी, कोटीयन हे दोघेदेखील मुंबईचे युवा खेळाडू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. याअगोदर झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेत मुलानीने अष्टपैलू खेळ करून भारतीय ‘अ’ संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. वेगवान गोलंदाज जुनैद खान याचादेखील मुंबई संघात समावेश होता. जुनैद हा मूळचा उत्तर प्रदेशचा. परंतु मुंबईत आपली क्रिकेट कारकीर्द घडविण्यासाठी २०१४मध्ये तो आला. सुरुवातीच्या काळात अंधेरीच्या एका जिन्स कंपनीत तो हेल्पर म्हणून कामाला लागला. त्यानंतर तो रिक्षादेखील चालवत असे. २०१९मध्ये तो वांद्रे येथील संजीवनी क्रिकेट अकादमीत दाखल झाला. येथूनच त्याची खऱ्या अर्थाने क्रिकेट कारकीर्द सुरु झाली. पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी अभिषेक नायर यांच्या नजरेस जुनैद पडला. मग त्यांच्या मार्गदर्शनामुळेच त्याने मुंबई क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले. आयपीएलमधील कोलकाता शिबिराच्या सराव शिबिरामध्येदेखील त्याची निवड झाली होती. आजही वांद्रे येथील चाळीत जुनैद राहतो. एकूण ६ जण घरात राहतात. मोहम्मद शमीला आदर्श मानणाऱ्या जुनैदला आता भविष्यात भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.

१९५९-६० साली इराणी चषक सामन्याला सुरुवात झाली. यंदाची या स्पर्धेची ६१वी लढत होती. पहिल्या चार लढतीत मुंबईने बाजी मारली होती. मुंबईचेच या करंडकावर वर्चस्व राहिले असून त्यांनी सर्वाधिक जास्त १६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. २०१५-१६नंतर पुन्हा एकदा या सामन्यासाठी मुंबई संघ पात्र ठरला होता. या स्पर्धेत वासिम जाफरने १२९४ धावा केल्या आहेत. मुंबईचे महान फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांनी सर्वाधिक ५१ बळी घेतले आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडक जिंकून देऊन मुंबईला शानदार दुहेरी यश मिळवून दिले आहे. आता लवकरच सुरू होणाऱ्या नव्या क्रिकेट मोसमात मुंबई क्रिकेट संघाची विजयी दौड अशीच कायम राहील, अशी आशा संघाचे तमाम चाहते करत असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

श्रीलंका क्रिकेट संघासाठी पुन्हा “अच्छे दिन”!

एका जमान्यात क्रिकेट विश्वात धोकादायक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा "अच्छे दिन" सुरु झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या तीन-चार महिन्यांच्या अवधीत श्रीलंकेच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. इंग्लंड क्रिकेट दौऱ्यात पहिल्या...

६४ घरांच्या पटाचा अनभिषिक्त सम्राट भारत!

हंगेरी, बुडापेस्ट येथे रविवारी संपन्न झालेल्या ४५व्या ऑलिंम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाने दुहेरी सोनेरी यश संपादन करताना नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या आजवरच्या ९७ वर्षांच्या मोठ्या इतिहासात भारताने प्रथमच पुरुष खुल्या आणि महिला गटाचे जेतेपद पटकावण्याचा अनोखा पराक्रम केला....

आशियात भारतीय हॉकी संघाचाच दरारा!

चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या स्पर्धेत भारतीय संघाने गतवेळचे अजिंक्यपद कायम राखताना जेतेपदाला साजेशी कामगिरी करुन...
Skip to content