मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, विहारपाठोपाठ आज पहाटे मोडक सागर आणि तानसा, हे तलावही ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची काळजी मिटल्यात जमा झाली आहे.
मुंबई महापालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव आज पहाटे ०३.२४ वाजता तर तानसा तलाव पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला. यानंतर मोडक-सागर तलावाचे २ तर तानसा तलावाचा १ दरवाजा उघडण्यात आला आहे.
मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तानसा तलाव २० ऑगस्टला सायंकाळी ०७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता. यंदा तुळशी व विहार तलाव तलाव अनुक्रमे १६ आणि १८ जुलै २०२१ रोजी पूर्ण भरुन वाहू लागले आहेत. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ४ तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत.
यापूर्वी वर्ष २०१९मध्ये मोडक सागर तलाव २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्षे हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. तानसा तलाव हा २०१९ मध्ये २५ जुलै रोजी, २०१८मध्ये १७ जुलै रोजी, २०१७मध्ये १८ जुलै रोजी आणि सन २०१६मध्ये ०२ ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार ७७,९५६.८ कोटी लीटर (७,७९,५६८ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ५३.८६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याअंतर्गत अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवणक्षमतेच्या ४.३१ टक्के अर्थात ९७८ कोटी लीटर (९,७८० दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावामध्ये पाणी साठवणक्षमतेच्या १०० टक्के अर्थात १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवणक्षमतेच्या ९९.६६ टक्के अर्थात १४,४५९.३ कोटी लीटर (१,४४,५९३ दशलक्ष लीटर), हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयमध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवणक्षमतेच्या ४७.७१ टक्के अर्थात ९,२३४.२ कोटी लीटर (९२,३४२ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवणक्षमतेच्या ५१.३५ टक्के अर्थात ३६,८१८.४ कोटी लीटर (३,६८,१८४ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवणक्षमतेच्या १०० टक्के अर्थात २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्येदेखील पाणी साठवणक्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

