नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या १२ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या युग पटेल, आरोही कांबळे, हर्ष कांबळे, आशनी नितीन काळे, मन पटेल, उत्कर्ष शाह, मन मारू, नम्र वासानी, नैती वासानी यांनी पदके जिंकली.
नम्र वासानीने १ सुवर्ण, ३ कांस्य पदके पटकावली. तर आरोही कांबळे, नैती वासानीने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदक जिंकले. मन पटेलने १ सुवर्ण, २ कांस्य पदकांची कमाई केली. युग पटेलला १ सुवर्ण, १ कांस्य पदक मिळाले. प्रशिक्षक विद्धेश मोरे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन मुंबई सबअर्बन जंप रोप संघटनेचे अध्यक्ष, स्वप्नील पहुरकर, सचिव, वर्षा काळे, खजिनदार, योगेश सांगळे यांनी केले.