Homeटॉप स्टोरीहुश्श... दोन दिवसात...

हुश्श… दोन दिवसात मान्सूनचा महाराष्ट्राला टाटा.. बायबाय!

सततचा पाऊस, अतिवृष्टी, नुकसान यामुळे कंटाळलेल्या राज्यातील शेतकरी बांधव आणि तमाम जनतेसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून परतणार असल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे. “ऑक्टोबर हीट”चा उकाडा चालेल; पण हा पाऊस आता घेऊन जा”, अशा घायकुतीला आलेले अनेकजण आता हुश्श… म्हणत सुटकेचा निःश्वास सोडतील. आयएमडीच्या ताज्या बुलेटिननुसार, आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून पाऊस परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागासह महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सून माघारी जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. माघारीची रेषा वेरावल, भरूच, उज्जैन, झाशी, शाहजहांपूरमधून जात आहे. त्यामुळे पुढील एक–दोन दिवसात राज्यातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

दोन आठवडे आधी येऊनही जाता जाईना!

गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजीच नंदुरबारमधून मान्सूनने माघार घेतली होती. दक्षिण राजस्थान, कच्छमधून 23 सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशातून 15 ऑक्टोबर रोजी मान्सूनने माघार घेतली होती. यंदा मात्र दोन आठवडे आधीच 25 मे रोजीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. 29 जून रोजीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. साधारणतः दरवर्षी 8 जुलै रोजी मान्सून देशभर पोहोचतो. यंदा लवकर सुरू होऊनही तो परतायचे नाव घेत नव्हता. राजस्थानमधून माघारीनंतर गेले दोन आठवडे मान्सूनच्या परतीचा प्रवास ठप्प झाला होता.

शक्ति चक्रीवादळ, वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा खोडा

यंदा राजस्थानमधून 14 सप्टेंबर रोजी, नियमित वेळीच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. पश्चिम राजस्थानमधून वेळीच माघारी झाली. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर भारताच्या काही भागांमधूनही पाऊस परतला. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या परतीची शक्यता वर्तवली गेली होती. धुंवाधार सप्टेंबरनंतर तर पाऊस नकोसा झाला होता. परंतु, त्यानंतर शक्ति चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि त्यातच जोडीला हिमालयीन वेस्टर्न डिस्टर्बन्सेस यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवसाला ब्रेक लागला. गेल्या 10-12 दिवसांपासून मान्सून विड्रॉवल रेषा म्हणजेच परतीची आगेकूच एकाच जागी खोळंबली होती. त्या प्रवासाला आता गती मिळणार आहे.

देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स

* उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरूच राहील.

* उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मान्सून परतला. रात्री थंडी पडली. या राज्यांमध्ये आज काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. दिवाळीपूर्वी उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता.

देशातील बहुतांश भागात “करवा चौथ”चा चांद झाकोळलेला राहण्याची शक्यता!

* 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू आणि आंध्रसह अनेक दक्षिणी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ज्यामुळे थंडी वाढेल. आयएमडीने जारी केला इशारा.

* पुढील 2-4 दिवस दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम या राज्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content