Homeटॉप स्टोरीशेअर बाजारातल्या कोट्यवधी...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या कंपनीच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. सेबीने कंपनीचे बोनस शेअर्स आणि स्टाॅक स्प्लिटही थांबवली आहे. कंपनी प्रमोटर्सच्या शेअर खरेदी-विक्री व्यवहारांवरही सेबीने निर्बंध लादले आहेत. सेबीच्या कारवाईनंतर या कृषी कंपनीच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले आहे.

नाशिकमधील निर्माण अ‍ॅग्री जेनेटिक्स लिमिटेड (Nirman Agri Genetics Limited) या एसएमई कंपनीने हा गोरखधंदा केला आहे. सेबीने आयपीओ निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली निर्माण ॲग्रीच्या शेअर बाजारातील व्यवहारांवर बंदी घातल्याच्या बातमीनंतर 15 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कंपनीचे नाव बदलून ‘अ‍ॅग्रिकेअर लाईफ कॉर्प लिमिटेड’ असे नवे नाव देण्याच्या प्रस्तावालाही सेबीने स्थगिती दिली आहे. निर्माण अ‍ॅग्रीचे प्रमोटर प्रणव कैलाश बागल यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंपनीच्या  शेअर्स खरेदी, विक्री किंवा इतर कोणताही व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मार्च 2023मध्ये आला होता कंपनीचा आयपीओ

निर्माण अ‍ॅग्री जेनेटिक्स लिमिटेड आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 99 रुपये होती. कंपनीचा आयपीओ 15 मार्च 2023 ते 20 मार्च 2023पर्यंत खुला राहिला. कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2023 रोजी 102 रुपयांवर लिस्ट झाले. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 456 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 130.10 रुपये आहे. कंपनीच्या प्रमोटर्सनी आयपीओद्वारे उभारलेल्या एकूण निधीपैकी सुमारे 19 कोटी रुपयांचा म्हणजे तब्बल 93% सार्वजनिक निधीचा गैरवापर केला.

कोणतेही करार, बिले नसताना बोगस पेमेंट

सेबीच्या तपासात काल्पनिक, संशयास्पद, बोगस कंपन्यांना पेमेंट अदा करण्याचा फ्रॉड झाल्याचे आढळून आले. कंपनीने चार पुरवठादार संस्थांना 12 कोटी 14 लाख रुपये अदा केल्याचे दाखवले. परंतु सेबीच्या तपासात या संस्थांची विश्वासार्हताच शंकास्पद असल्याचे आढळून आले. या संस्थांना योग्य उद्देशाने पेमेंट दिले गेल्याचे कंपनीला सिद्ध करता आले नाही. या पेमेंटसाठी पूरक असे कोणतेही वैध करार किंवा बिले कंपनीला देता आली नाहीत.

दाखवलेल्या पत्त्यावर संस्थांचा मागमूसच नाही!

ज्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला गेला, तेदेखील या पुरवठादार संस्थांचे नव्हते. पूर्णपणे असंबंधित खात्यांमध्ये पेमेंट अदा केले गेले होते. या संस्थांचा जो रजिस्टर्ड पत्ता दाखविण्यात आला होता, त्या पत्त्यांवर कोणतीही संस्था, कंपनी किंवा कोणताही कृषी उपक्रम राबविला जात नसल्याचे सेबीच्या साईट व्हिजिटमध्ये आढळून आले.

प्रमोटर बागल, नातेवाईकांच्या खात्यातच पैसे ट्रान्स्फर

हे निधी एकतर काल्पनिक, संशयास्पद संस्थांना हस्तांतरित करण्यात आले. प्रमोटर बागल आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नियंत्रणाखालील संस्थांनाच हे पेमेंट अदा केले गेल्याचे सेबीला आढळून आले. याशिवाय, निर्माण अ‍ॅग्री जेनेटिक्सने निधी वापराबद्दल सेबीकडे परस्परविरोधी माहिती सादर केली. निधीच्या वापराबद्दल कोणत्याही खर्च किंवा व्यवहारांसाठी ठोस पुरावे किंवा पावत्या कंपनीने प्रदान केल्या नाहीत, असे सेबीने म्हटले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content