पायी पंढरीची वारी
येता आषाढाचा मास।
विठू माऊली सावळी
दर्शनाची लागे आस।।
पंढरीच्या वारीमध्ये
नाही कधी भेदभाव।
चंद्रभागा नदीतीरी
सारा वैष्णवांचा गाव।।
वारीमध्ये भेटतात
ज्ञाना, सोपान, मुक्ताई।
गोरा, तुका, नामा, जनी
त्यांची सावळी “विठाई”।।
नाम अखंड मुखात
त्याला नाही काळवेळ।
दिवे घाट चढताना
उन-पावसाचा खेळ।।
खेळ मानाच्या अश्वांचा
गोल-उभ्याचे रिंगण।
मिटे शीणभाग सारा
होते भक्तीची शिंपण।।
शब्द अपुरे पडती
गुण गाण्या सोहळ्याचे।
डोळे भरुन पाहतो
रूप माझ्या सावळ्याचे।।
करा पंढरीची वारी
मुखे म्हणा हरी हरी।
फळा येउनी पुण्याई
झालो मी ही वारकरी।।
माझी पंढरीची वारी
माझी पोथी आणि गाथा।
“गजानन” ठेवीतसे
विठ्ठलाच्या पायी माथा।।
विठ्ठलाच्या पायी माथा।।
आषाढी एकादशीनिमित्त, सर्वांच्या लाडक्या विठुरायाच्या चरणी अष्टाक्षरी रचनापुष्प समर्पित..