Thursday, September 19, 2024
Homeडेली पल्ससार्थ ठरावा मराठी...

सार्थ ठरावा मराठी भाषेचा गौरव दिन!

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आणि कविवर्य कुसुमाग्रजांची जन्मतिथी इंग्रजी तारखेनुसार पाठोपाठ याव्यात हा मराठी भाषेचा गौरव आणखी वाढवणारा योगायोग आहे. मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून 1 मे 1960पासून दर्जा मिळाला खरा, पण मराठीचा वापर राज्यशासनाच्या कारभारात होत नव्हता. तो व्हायला अनेक दशके जावी लागली. तरीही अनेक विषयांच्या मंत्रालयीन नोंदी आधी इंग्रजीत होतात आणि नंतर त्यांचे भाषांतर मराठीमधून प्रसृत केले जाते. तरी स्थिती बरीच सुधारलेली आहे. कारण कविवर्य कुसुमाग्रजांनीच एकदा लिहून ठेवले होते की मराठी भाषा मंत्रालयाच्या दरवाजात भिकाऱ्यासारखी उभी आहे.

मराठी पदनाम कोष सरकारने तयार केला. राज्य सरकारचा मराठी भाषा हा स्वतंत्र विभाग गेले दशकभर कार्यरत आहे. पण शासकीय मराठी आणि जनतेची मराठी यात मोठे अंतर आहे, ते का? कारण आपण इंग्रजी संज्ञा आणि शब्दांना पर्याय कोणता याचा विचार करून मराठीत संस्कृतप्रचूर शब्द घडवले, घोटून तयार केले. ते पुरेसे अर्थवाही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लोकांना नस्ती म्हणजे काय हे कोडं पडतं आणि फाईल म्हटले की अर्थ कळतो. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांतून व्यक्त होताना या विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या विभागाला असे आदेश दिले आहेत की, शासकीय मराठी शब्दांना बोलीभाषेचा काही साज चढवता येतो का हे पाहा.

देसाई म्हणतात की, कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, खानदेशी आणि कोल्हापुरी मराठी बोली भाषांतील काही शब्द शासकीय मराठी शब्दांना पर्याय म्हणून स्वीकारता येतील का याचा विचार करू. ते काम कधी होईल व कसे होईल हे सांगणे कठीण आहे. या अनुषंगाने स्वा. विनायक दामोदर सावरकरांचे मराठी भाषेसाठीचे योगदान उठून दिसते. त्यांना कोणत्याही भाषा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले नव्हते, तरीही त्यांनी सहज वापरात येतील, असे सोपे आणि अर्थवाही पर्यायी शब्द, डझनावारी दिले आहेत. त्याचे हे भाषाकार्य किती लक्षणीय आहे याचा प्रत्यय ते शब्द पाहिले तर सहजच येतो.

आजच्या मराठीत रूढ झालेले अनेक शब्द त्यांची देणगी आहे. अनेक इंग्रजी, फारसी आणि ऊर्दू शब्दांना नेमके मराठी शब्द सावरकरांनी दिले आहेत. इंग्रजीतील मेयरला पर्याय महापौर हा किती सुंदर किती अर्थवाही शब्द आहे की नाही! तेच म्युनिसिपालीटीसाठी महापालिका. तो सावरकरांनी दिलेला शब्द आहे. आता आपल्याला मेयरची फारशी आठवणही होत नाही, इतका महापौर शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे. इंग्रजीतील असेंब्लीला पर्यायी विधिमंडळ हा सुरेख शब्दही त्यांचाच. विधिमंडळाच्या कामकाजात व्हिप, चीफव्हिप ही संकल्पना येते. सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या बाजूचा हा असा एक सदस्य असतो जो पक्षाच्या अन्य सदस्यांना शिस्त लावणे, त्यांची वैधानिक जबाबदारी सांगणे हे काम करतो. व्हिप याचा एक अर्थ चाबूक असाही आहे. कदाचित ज्या इंग्लंडमधील लोकशाही पद्धतीवरून आपली संसदीय सभागृहे बेतली आहेत, तिथे जुन्या काळात सदस्यांना शिस्त लावण्यासाठी चाबकासारखे शब्दांचे फटकारही लगावण्याचे काम एखाद्या वरिष्ठ सदस्याला नक्कीच करावे लागले असेल. त्या व्हिपसाठी प्रतोद हा सुदंर व पुरेसा अर्थवाही शब्द ही सावरकरांची देणगी आहे.

सिनेमा आणि नाट्य जगतासाठी चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, नेपथ्य… असे कितीतरी शब्द सावरकरांनी दिले आहेत. फारसी तारीखसाठी दिनांक आणि इंग्रजी नंबरसाठी क्रमांक हे शब्द मूळचे मराठी नाहीत हेही आपण आता विसरून गेलो आहोत. हे सावरकरी शब्द जसे रुळले, तसे काम शासकीय मराठी शब्दकोषांमध्ये करण्याची गरज होती. ते झाले असते तर आचार्य अत्र्यांना पदनाम नव्हे बदनाम कोष असे शासकीय कोषाला हिणवण्याची वेळ आलीच नसती.

मराठी

मराठी भाषा गौरव दिवसाच्या काही दिवस आधी या विभागाचे मंत्री व सचिव दिल्लीत डेरेदाखल होते. तिथे त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला. केंद्रीय भाषा विभागाचे राज्यमंत्री म्हणाले की, मराठीला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय तत्त्वतः झालेला आहे. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली की मराठी भाषेला एक आणखी झळाली प्राप्त होईल. ही भाषा दोन हजार वर्षे महाराष्ट्र व परिसरात बोलली जात आहे, लिहिली जात आहे. ही भाषा कोणत्याही अन्य भाषेतून उद्भवलेली नाही, तर ती स्वतंत्र अन् जिवंत भाषा आहे, अशा प्रकारचे पुरावे हा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक होते.

या विभागाचे मागील सरकारमधील मंत्री विनोद तावडे आणि सध्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी या विषयात बरेच काम केले आहे. मराठी भाषा, तमिळ भाषेच्या आधीही बोलली, लिहिली जात होती याचे पुरावे तामिळ ग्रंथांतूनच उपलब्ध आहेत, हेही मराठी भाषा विभागाने दाखवून दिले. त्यामुळेच जर तमिळ भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळतो तर तो मराठीलाही मिळायलाच हवा हा आपला आग्रह होता व तो यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे.

अनेकांना प्रश्न पडतो की, इतका का आग्रह मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी? काय फायदा त्याचा? एखाद्या भाषेला अभिजात असा दर्जा मिळतो तेव्हा सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये तसेच केंद्रीय मदतीने चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचे अभ्यासवर्ग सुरू होतात. देशात व देशाबाहेरच्या दोनशे विद्यापीठांमधून मराठीचा अभ्यास होणे, हे आपली भाषा अधिक समृद्ध होणेच आहे. भाषा विकासाच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपयांचा वार्षिक निधी दरवर्षी मिळतो. यातून मराठी भाषा विकाससंस्था, मराठी लेखक-कविंना प्रोत्साहन, जगभरातील मराठी अभ्यासाला चालना या गोष्टी साध्य होऊ शकतील. असे जेव्हा होईल तेव्हा भाषा विकासाची गती आणखी वाढेल.

भाषा बोलणारे, वाचणारे व लिहिणाऱ्यांच्या संख्येवरही अवलंबून असते. आज तेरा कोटी लोक ही भाषा बोलत आहेत, असे आपण गृहित धरतो. पण ही ज्ञानार्जनाची व उपजीविकेच्या साधनाची भाषा बनली तर ती टिकून राहील असे तज्ज्ञ मानतात. ते होण्याच्या दृष्टीनेही अभिजात दर्जाबरोबर येणाऱ्या योजना कामी येऊ शकतील. जर ही लोकांच्या कमाईचे साधन देणारी भाषा बनली तर, “माझिया मराठीचा बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके”, हे वचन सार्थ करता येईल. ही भाषा अधिक तंत्रस्नेही होण्याची गरज आहे. मराठी शुद्धलेखन संगणकीय छपाईत थोडे बदल झालेलेच आहेत. ते आणखी सोपे व्हावे, यासाठी भाषा विभाग, साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य संमेलन अशांनी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. आजचा मराठी वाचक हा प्रत्यक्ष पुस्तकाची पाने चाळणारा कमी आणि व्हॉट् एसपची पाने भरणारा अधिक आहे. व्हॉट् एसप, ट्विटर, फेसबुक, विविध संगणकीय स्थळे, ब्लॉग यावरची मराठी शुद्ध की अशुद्ध यात न पडता ते तंत्र स्वीकारूनच पुढे जाणे हेही अपिरहार्य आहे. मागील दोन हजार वर्षांच्या वापराचा माग काढून आपण अभिजात दर्जा मिळवणार असलो, तरी पुढची दोन हजार वर्षे भाषा टिकवण्याचीही जबाबदारी आपलीच आहे…

Continue reading

विरोधकांसाठी आजही ‘दिल्ली बहोत दूर है’!

दिल्लीत गेली बारा वर्षे आम आदमी पक्षाचेच राज्य आहे. अरविंद केजरीवाल या पक्षाचे संयोजक व सर्वोच्च नेते असून तेच दिल्लीच्या गादीवर राज्य करत आहेत. सरत्या सप्ताहात त्यांनी दीर्घकाळ गाजवलेले मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच राजधानीच्या राजकारणात मोठीच खळबळ...

अमेरिकेत कोण ठरणार भारी? कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रंप??

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा कितीतरी लहान पण भौगोलिक आकारात आपल्यापेक्षा किती तरी मोठा देश आहे. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत देशही अमेरिकाच ठरतो. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपल्यापेक्षा दशपटींनी अधिक भरतो. आपण जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी...

25 वर्षांपूर्वी मसूदने केलेल्या भारतीय विमान अपहरणामागचे वास्तव!

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका झाल्या, याचे पाढेही वाचायला सुरूवात केली आहे. या चर्चेचे निमित्त...
error: Content is protected !!
Skip to content