अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकाने ‘गृहमंत्री’ असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा ‘नाही’ असे असते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या कित्येक स्त्रियांचे आर्थिक व्यवहार त्या स्वतः पाहत नाहीत. असे का? आर्थिक नियोजन, आर्थिक वेळापत्रक आखणे स्त्रियांना जमत नाही, जमणार नाही, असे खुद्द स्त्रियांसह सर्व समाजाला का वाटते? स्त्री-पुरुष समानतेच्या काळात हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्याकरिता स्त्रियांनी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घातले पाहिजे. कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या अद्ययावत गुंतवणूक क्षेत्राची माहिती घेतली पाहिजे. यासाठी महिलांचे अर्थभान, हे पुस्तक सर्व स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल. केवळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाच नव्हे तर गृहिणींनीदेखील आर्थिक व्यवस्थापनकला शिकून घ्यावी, या उद्देशाने हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
अवघड विषय गप्पांच्या ओघात मांडून सर्वांना लक्ष्मीच्या रक्षणासाठी साक्षर बनवणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकात एकूण ४४ लेखांमधून गुंतवणुकीचे सर्व पैलू घेतले आहेत. चार पैसे बाजूला ठेवण्याची विचारसरणी स्त्रीकडे असतेच, पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास ‘गरजा’ आणि ‘मागण्या’ यामधील लक्ष्मणरेषा स्त्रिया आखू शकतात. मुलांना आर्थिक संस्कारांचे वळण देण्यापासून ते व्याजदर कसे ठरतात त्याची माहिती व आपली गुंतवणूक दुप्पट, तिप्पट व चौपट होण्यासाठी किती अवधीत गुंतवणूक करावी, याचे सूत्र या पुस्तकात खूप छान दिले आहे. साधे, सरळ आर्थिक जीवन जगायची सप्तपदी नीट समजून घेऊन महिलांनी एकेक पाऊल टाकले तर त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार सुलभ होतील, हे ‘सप्तपदी’तून छान समजावले आहे.
‘घरकामाचे श्रममूल्य’ लेख सुंदर आहे. भविष्यातील आर्थिक खर्च लक्षात घेऊन उत्पन्न, खर्च आणि बचतीचे गणित कसे मांडावे तेही यात सांगितले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी एकाच गुंतवणूक साधनावर कधीही अवलंबून न राहता तीन-चार प्रकारे गुंतवणूक कशी विखरून ठेवली पाहिजे, ते यातून छान समजते. अठरा वर्षे वयाच्या मुलाचे पॅन कार्ड (Pan Card) काढणे, मेडिक्लेमची माहिती, नेमके वैद्यकीय विमा संरक्षण आणि त्याचा नेमका हप्ता याची माहिती तर यात खूपच चांगल्या पद्धतीने दिली आहे.
‘लाभ’ आणि ‘लोभ’ यामध्ये एका मात्रेचा फरक आहे, असे सांगून त्यातून गुंतवणूकदारांनी घ्यावयाची काळजी विशद केली आहे. बँक कर्जदारांना ‘गॅरेंटर’ राहताना घ्यावयाची काळजीसुद्धा पुस्तकात विशद करण्यात आली आहे. ‘वेडिंग बेल इन्शुरन्स’ योजनेंतर्गत विवाह समारंभाचा विमा कसा उतरवावा याची माहिती आजकालच्या थाटामाटात लग्न साजरे करणाऱ्यांना उपयोगी पडेल. ‘गुंतवणुकीचा अष्टसूत्री कार्यक्रम’ आजच्या नव-नोकरदारांना उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल. बोनसरूपाने आलेल्या अधिक पैशांचा उपयोग कसा करावा हे सांगताना गृहकर्जाची माहिती, ‘सिबील’ची माहिती, वीज बिलासंबंधी जागरूकता याचे धडेही या पुस्तकात महिलांच्या गप्पागोष्टी वाचत आपण कधी शिकतो ते कळतही नाही. चलनवाढीचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम यात सहज-सोप्या शब्दांत सांगितला आहे. शेअरमधील गुंतवणुकीत ‘व्यावहारिक’ निर्णय कसा घ्यावा, ‘भाऊबीज भेट’ गुंतवणुकीच्या रूपात कशी असावी, हे वाचल्यावर वाटते आपणही आपल्या भावांना जागे करावे.

‘ई गोल्ड’, ‘ई-सिल्व्हर’, ‘ई-प्लॅटिनम’ या गुंतवणुकींची माहिती यात फार चांगली दिली आहे. महिलांना जात्याच दागिन्यांचा सोस असतो. पण हे वाचताच त्यांचे विचार नक्कीच बदलतील. पर्यायाने योग्य रीतीने गुंतवणूक होईल. अॅप्रिसिएशन ऑफ अॅसेट्स, चांगला हिरा कसा ओळखावा, या महिलांच्या गप्पागोष्टी वाचताना आपणास नकळतच कितीतरी ज्ञान मिळते.
शेतीविषयक गुंतवणुकीत काय दक्षता घ्यावी, वस्तू आणि वास्तू (जमीन) भेट म्हणून देताना किंवा घेताना काय काळजी घ्यावी, तेही यातून चांगले समजते. इतकेच काय; तर पोस्टल आयुर्विमा, गुंतवणुकीसाठी विविध कंपन्या कशा ओळखाव्यात, म्युच्युअल फंड गुंतवणूक या साऱ्यांची माहिती या पुस्तकातून होते.
पन्नाशीनंतरच्या गुंतवणुकीचे ‘दहा मुद्दे’ तर फारच महत्त्वाचे आहेत. कायदेशीर वारसासाठी मृत्युपत्राचे महत्त्व, वेल्थ टॅक्स रिटर्नची माहिती, रिव्हर्स मॉर्गेज, आय.टी. पासवर्ड हे सारे वाचून आपण चक्रावून जातो. इतकेच काय; तर परदेशी नोकरी कशी काळजीपूर्वक निवडावी, देशाबाहेर नोकरी करताना काय काळजी घ्यावी, हेही वाचनीय आहे. रिटायर्ड लोकांसाठी ‘रिजूव्हिनेटेड’ हे नाव उत्तम आहे. ‘No stone unturned’ प्रमाणे कोठलेही विभाग न विसरता खूप आकर्षकपणे, ओघवत्या भाषेत व सर्वांना लक्षात राहील, अशी माहिती कुळकर्णीनी दिली आहे. विनायक कुळकर्णीचे ‘महिलांचे अर्थभान’ हे पुस्तक विशेषतः महिलांमधील आर्थिक निरक्षरता दूर करील यात शंकाच नाही, अशी प्रस्तावना सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या माजी महाव्यवस्थापक उर्वशी धराधर यांनी लिहिली आहे.
महिलांचे अर्थभान
महिलांसाठी आर्थिक नियोजन मार्गदर्शिका
लेखक: विनायक कुळकर्णी
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
मूल्य: १९९/- रुपये, टपालखर्च: ५० /- रुपये

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9702070955)

