मध्य प्रदेश पर्यटन मंडळातर्फे राज्यातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रचारासाठी करण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल टुरिझम कॉन्क्लेव्ह अँड ट्रॅव्हल अवॉर्ड्सच्या (आयटीसीटीए) कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाला ‘बेस्ट स्टेट प्रोमोटिंग डोमेस्टिक टुरिझम’ आणि ‘बेस्ट स्टेट प्रमोशन फेअर अँड फेस्टिव्हल्स’ या पुरस्कारांनी नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील पर्यटनस्थळांना चालना देणे, वार्षिक सण, मेळावे, उत्सवांच्या वेळी पर्यटकांना अनुभवात्मक पर्यटन उपलब्ध करून देणे, देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे अशा उल्लेखनीय कार्याबद्दल पर्यटन मंडळाला हा पुरस्कार देण्यात आला. मध्य प्रदेशच्या पर्यटन व संस्कृती विभागाचे प्रधान सचिव तथा पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशेखर शुक्ला म्हणाले की, पर्यटकांना आकर्षित करणे हाच आमचा उद्देश नसून त्यांना सहलीदरम्यान अविस्मरणीय अनुभव देणे हा आहे. आयटीसीटीएने दिलेली ही मान्यता आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देते.
मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.