Monday, December 23, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूज‘नवरात्री’चा इतिहास, महत्त्व आणि...

‘नवरात्री’चा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र! 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते।।

अर्थ: सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी, अशा हे नारायणी देवी, तुला मी नमस्कार करतो.

श्री दुर्गादेवीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. जीवनाला परिपूर्ण करणारे जे-जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे आदिशक्ती श्री दुर्गादेवी. श्री दुर्गादेवीला सर्व जगताची जननी म्हटले आहे. जगताची जननी आपणा सर्वांचीच ती आई असल्याने लेकरांच्या हाकेला सत्वर धावून येते.

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे म! नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. या वर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे. या उत्सवात हिंदूंना देवीतत्त्वाचा लाभ होतो; मात्र हल्ली नवरात्रोत्सवाला आलेल्या विकृत स्वरूपामुळे त्यातून देवीतत्त्वाचा लाभ तर दूरच; पण त्याचे पावित्र्यही घटले आहे. या उत्सवातील अनुचित प्रकार रोखून त्याचे पावित्र्य राखणे, हेही काळानुसार धर्मपालनच! नवरात्र व्रतामागील इतिहास, या व्रताचे महत्त्व आणि ते साजरे करण्यामागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

तिथी: आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.

इतिहास: रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

महिषासूर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासूरमर्दिनी म्हणू लागले.

महत्त्व: जगात जेव्हा जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः।’ हा नामजप अधिकाधिक करावा.

व्रत करण्याची पद्धत: नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा. पूजकाला उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा. या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढीमिशीचे केस आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्यपालन, पलंगावर अन् गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राणे न वापरणे अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.

नवरात्राच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. हे शक्य नसल्यास दुसर्‍या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा. देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वाहतात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात. नवरात्र बसवताना आणि उठवताना देवांचे ‘उद्वार्जन’ अवश्य करावे. उद्वार्जनासाठी नेहमीप्रमाणे लिंबू, भस्म इत्यादी वस्तू वापराव्यात. रांगोळी किंवा भांडी घासायचे चूर्ण वापरू नये. शेवटी स्थापित घट आणि देवी यांचे मनोभावे उत्थापन (विसर्जन) करावे.

नवरात्र किंवा इतर धार्मिक विधींत दिवा अखंड तेवत राहणे, हा पूजाविधीचा महत्त्वाचा भाग असताना तो वारा, तेल न्यून (कमी) पडणे, काजळी धरणे इत्यादी कारणांमुळे विझल्यास ती कारणे दूर करून दिवा परत प्रज्वलित करावा आणि प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्या देवतेचा एकशे आठ किंवा एक सहस्र आठ वेळा नामजप करावा.

देवीची पुढीलप्रमाणे प्रार्थना करतात: हे देवी, आम्ही शक्तीहीन झालो आहोत, अमर्याद भोग भोगून मायासक्त झालो आहोत. हे माते, तू आम्हाला बळ देणारी हो. तुझ्या शक्तीने आम्ही आसुरी वृत्तींचा नाश करू शकू.

घागरी फुंकणे: अष्टमीला स्त्रिया श्री महालक्ष्मीदेवीची पूजा करतात आणि घागरी फुंकतात.

प्रांतभेद: गुजरातमध्ये मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मातीच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पूजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतेचे प्रतीक म्हणून नऊ दिवस पूजल्या जाणार्‍या ‘दीपगर्भ’मधल्या ‘दीप’ शब्दाचा लोप होऊन गर्भ-गरभो-गरबो किंवा गरबा असा शब्द प्रचलित झाला.

भावार्थ: असुर या शब्दाची व्युत्पत्ती आहे – ‘असुषु रमन्ते इति असुरः।’ म्हणजे प्राणातच, भोगातच रममाण होतात ते असुर होत. अशा महिषासुराचा आज प्रत्येक मनुष्याच्या हृदयात अल्प वा अधिक प्रमाणात वास असून त्याने मनुष्याच्या आंतरिक दैवीवृत्तींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या महिषासुराची माया ओळखून त्याच्या आसुरी विळख्यातून मुक्त होण्यासाठी शक्तीच्या उपासनेची आवश्यकता आहे. यासाठी नवरात्रीतील नऊ दिवस शक्तीची उपासना करावी. दशमीला विजयोत्सव साजरा करावा. त्याला दसरा म्हणतात.

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा!

पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतांनी रचलेली गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून गरबा खेळला जातो. गरब्याच्या निमित्ताने महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडतात. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण इत्यादी अपप्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण,धार्मिक उत्सव आणि व्रते’

Continue reading

उद्या परशुराम जयंती!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील. भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र...

नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे!

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय देवीच्या 9 रूपांविषयी आज आपण या लेखातून जाणून...
Skip to content