मुंबईतल्या केईएम रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागातल्या म्हणजेच ओपीडीतल्या रूग्णांना केसपेपर काढण्यासाठी लागणारी लाईन कमी करण्याच्या प्रयत्नात आता तेथे कर्मचारीवर्ग वाढवण्यात येणार आहे.
राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा ओघ अधिक असतो. अशा स्थितीत त्यांना केसपेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी बाह्यरुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नेमावे, असे निर्देश मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
केईएम रुग्णालयाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गगराणी यांनी काल रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी रुग्णालयातील विविध विभागांनाही त्यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी रुग्णखिडकीजवळ रुग्णांशी संवाद साधत असताना त्यांनी केसपेपर संदर्भातील निर्देश दिले. अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी रुग्णालयाच्या विविध कक्षातील सुविधांची बारकाईने पाहणी केली. सध्या रुग्णालयात सहा कक्षांची कामे सुरू आहेत. त्याचीही त्यांनी माहिती घेतली. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचादेखील त्यांनी सविस्तर आढावा घेतला. जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे रुग्णालयात आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये पालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी होण्यासाठी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केईएम रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हिस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. रुग्णालयाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमवारी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.