मुंबईत आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरतात याची जनतेला अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्यावतीने मात्र अमेरिकेकडून भारतीयांना दिल्या जात असलेल्या अमानवीय वागणुकीकडे साऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत असल्याचे सांगण्यासाठी राष्ट्रवादी शपचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड स्वतःच्या हाताला बेड्या ठोकून घेत बंधे हात दाखवत विधिमंडळाच्या आवारात आले. त्यामुळे मुंबईत होत असलेले हे अधिवेशन विधिमंडळाचे आहे की लोकसभेचे, असा प्रश्न अनेक पक्षांच्या सदस्यांनी परस्परांना विचारल्याचे समजते. याच पक्षाचे नेते आमदार रोहित पवार राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून झालेल्या कथित भ्रष्टाचारावर काढलेली पुस्तिका दलालांची दलदल, हातात घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडताना दिसत होते, तर त्यांचे इतर सहकारी एकमेकांकडे बघत कधी एकदा सभागृहात जाता येते, अशा संभ्रमावस्थेत उभे होते.
आज सकाळी साडेदहा वाजताच आव्हाड आपल्या हातांना बेड्या बांधून घेत हात उंचावत विधिमंडळाच्या आवारात आले. हातात जिंकलेला वर्ल्डकप ज्या दिमाखात दाखवावा तसे हात उंचावत ते थेट वृत्तवाहिन्यांसमोर हजर झाले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत विनापरवाना घुसलेल्या भारतीयांना (थोडक्यात सांगायचे तर ‘भारतातल्या बांगलादेशींप्रमाणे’) परत पाठवले जात आहे. या भारतीयांच्या हातापायात बेड्या ठोकल्या जातात. त्यांना खाऊपिऊ दिले जात नाही. शौचालयात जायलाही दिले जात नाही. इतक्या अमानवीय पद्धतीने त्यांना भारतात परत पाठवले जात आहे आणि त्यावर भाष्य करायला आम्हाला परवानगी दिली जात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आपण असे आलो आहोत, असे आव्हाड म्हणाले.

वास्तविक हे सारे भारतीय अवैध मार्गांनी अमेरिकेत घुसले होते. या मार्गांना डंकी मार्ग म्हणून ओळखले जाते. या मार्गांनी अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या कॅनडा, मेक्सिको आदी देशांमध्ये लोकांना नेले जाते. तेथून मग रस्तेमार्गे जंगलातून नदी-नाले ओलांडून रात्री-अपरात्री लपूनछपून त्यांचा अमेरिकेत प्रवेश करवला जातो. यासाठी एजंटकडून तब्बल २५ ते ४० लाखांपर्यंतची रक्कम उकळली जाते आणि अमेरिकेत जाऊन राहण्याच्या मोहापायी अशा मार्गांनी जाण्यासाठी अनेक तरूण तयार होतात. यासाठी जमीन विकली जाते. दागिने गहाण ठेवले जातात. पंजाब, हरयाणा, गुजरातमधल्या तरूणांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. ट्रम्प सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अशा सर्व नागरिकांना त्यांच्या-त्यांच्या देशात परत पाठविण्याची जबाबदारी त्यांच्या लष्कराकडे सोपवली. तेथील लष्कराकडून घुसखोरांना अशा पद्धतीनेच (हातापायात बेड्या ठोकून लष्करी विमानाने) पाठवण्याचा कायदा आहे. भारत सरकारनेही हे स्पष्ट केले आहे आणि हे परत पाठवण्यात आलेले भारतीय नागरिक असले तरी ते अमेरिकेतले घुसखोर आहेत. मानवी हक्कांबद्दल बोलायचे असेल तर संसदेचे अधिवेशन त्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग न करता राष्ट्रवादीच्या शप गटाने विधिमंडळ परिसर का निवडला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कालच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलाविलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बहिष्कार घातला होता. यामागचे कारण सांगताना एक पत्रकार परिषदेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळून आले तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. स्वारगेट एसटी बस डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर निषेध करण्याऐवजी गृहराज्यमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं असून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. बीडच्या सरपंच देशमुख हत्त्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी सेवा दिली जाते. देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देतेय. वाहनांच्या नवीन प्लेट नंबरसाठी इतर राज्यांच्या तुलनेत आकारण्यात येत असलेले जादा शुल्क, कृषी विभागात बदल्यांसाठी झालेला भ्रष्टाचार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता, लाडकी बहीण योजनेत सुरू असलेली कपात, लाडक्या भाऊ योजनेतील लाभार्थ्यांनाही पैसे न मिळणे अशा विविध प्रश्नांवर आम्ही या चहापानावर बहिष्कार घालत आहोत.
