कोल्हापूरच्या विशाळगडावर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबाबत राज्यातल्या काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख व अमिन पटेल यांनी काल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख म्हणाले की, अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी नियम व कायदे आहेत. एका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर एवढे अकांडतांडव करण्याची काय गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराजांपासून सबंध जग प्रेरणा घेते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला. मात्र आज त्याच शिवरायांच्या भूमित महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलिसांना मारहाण होत आहे. जर पोलिसांचं खच्चीकरण झाले तर जनतेने कोणाकडे अपेक्षेने बघायचे?

त्यानंतर विशाळगड हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह होते.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ४० ते ५० कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता. पण तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान आहे.