Homeन्यूज अँड व्ह्यूजवाघाची शेळी झाली...

वाघाची शेळी झाली की वाघ आहे तिथेच?

वाघाने हल्ला केल्यावर भरपाई पंचवीस लाख, तर वीज पडून माणूस मरण पावला तर चारच लाख रुपये भरपाई, या विसंगतीकडे बुधवारी विधानसभेत लक्ष वेधले गेले. तसेच, वीज पडण्याच्या संदर्भात पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेबद्दलच्या प्रश्नावरून विधानसभेत झालेल्या शेरेबाजीतून वाघाची शेळी झाली की वाघ मूळ स्थानी आहे की सध्या त्याचे स्थलांतर झाले आहे, याबद्दल दावे-प्रतिदावे केले गेले.

वीज कोसळण्यासंदर्भातील पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवण्याविषयीचा प्रश्न आमदार संतोष दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. या उत्तरावरील उपप्रश्नामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना मिळणारी नुकसानभरपाई आणि वाघाने हल्ला करून मृत्यू झाल्यास मिळणारी भरपाई, यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनाला आणले. वाघाने मारल्यास २५ लाख रुपये भरपाई आणि वीज पडून मृत्यू झाल्यास फक्त चार लाख रुपये भरपाई मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, वीज पडल्यानंतर पशुधनाचीही हानी होते आणि त्यामध्ये किती भरपाई दिली जाते, असे त्यांनी मंत्र्यांना विचारले.

त्यावर उत्तर देताना गायी-म्हशींना साडेसदतीस हजार रुपये दिले जातात, असे सांगून मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, वीज पडून बकरीचा वा कोंबडीचा मृत्यू ओढवल्यासही पैसे दिले जातात. पण ही रक्कम कमी आहे. कोंबडीचा मृत्यू झाल्यास भरपाई केवळ शंभर रुपये दिली जाते. मी काही कोंबडी खात नाही. पण भरपाई वाढवण्याबद्दल सरकार विचार करेल.

त्यांच्या उत्तरानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी जागेवर बसूनच वाघ कोणाकडे आहे, असे विचारले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हसतहसत उत्तर दिले की, ते सध्या अस्पष्ट आहे. त्यावर आपल्या जागेवर बसूनच भाजपा आमदार अतुल भातळकर यांनी प्रत्युत्तर दिले की, आम्ही वाघाची शेळी केलीय… शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेला दिले आहे. पण सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील दावा अद्यापही निकाली निघालेला नाही. त्यामुळे आपापल्या आसनांवर बसूनच सदस्यांनी आणि हसतहसत अध्यक्षांनीही केलेल्या शेरेबाजीमुळे सदस्यांची मात्र करमणूक झाली आणि सभागृहात हास्यलकेर उमटली.

वाघ

लोणीकरांचे गिरे तो भी टांग उपर…

शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधाने केल्याने टीकेचे धनी ठरलेले भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानांचे खापर माध्यमांवरच फोडले आणि आपली विधाने मोडूनतोडून दाखवली गेल्याचा आरोप केला. तसेच, शेतकऱ्यांची निःसंदिग्ध शब्दांत माफी न मागता, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी एकदाच काय, हजार वेळा माफी मागायला तयार आहे, अशी मल्लीनाथीही बुधवारी विधानसभेत केली.

बबनराव लोणीकर बोलायला उभे राहताच विरोधा बाकांवरील सदस्यांनी आधी शेतकऱ्यांची माफी मागा, अशा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर लोणीकर यांनी मी शेतकऱ्यांच्या विरोधात कधीही बोललेलो नाही, असा दावा केला. मी चाळीस वर्षे राजकारणात आहे, असे सांगून ते म्हणाले की, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्याच्या विरोधात कधीही बोलणार नाही आणि तरीही शेतकऱ्यांना तसे वाटत असेल तर मी एकदाच नाही तर हजार वेळा माफी मागेन. पण हे केवळ राजकारण केले जात आहे. मी शेतकऱ्यासाठी चाळीस वर्षे काम केले आहे. मी काही लोकांना उद्देशून बोललेल्या गोष्टी मोडूनतोडून दाखवल्या गेल्या, असा दावाही त्यांनी केला.

विरोधी सदस्यांनी घोषणा सुरूच ठेवल्या तेव्हा मंत्री शंभूराज देसाई उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांना सरकारची भूमिका ऐकून घ्यावी, अशी विनंती केली. तसेच, वर्तमानपत्रात, समाजमाध्यमातून जे आले त्याबद्दल सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य लोणीकर यांनी सांगितले आहे की, त्यांचाही उद्देश शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता. ते एका व्यक्तीचा संदर्भ देऊन बोलत होते. पण ते तोडून दाखवले गेले. त्यामुळे तोडूनमोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा त्यांनी खुलासा केला आहे. लोणीकर यांनी हेही स्पष्ट केले आहे की त्यांच्या बोलण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या असल्या तर एकदा नाही तर हजार वेळा ते माफी मागत आहेत.

देसाई यांच्या निवेदनानंतरही विरोधी पक्षांनी आपापल्या जागेवर उभे राहून घोषणा देत निदर्शने केली आणि लोणीकर आधी माफी मागा, अशा घोषणा दिल्या. माफी मागा.. माफी मागा.. शेतकऱ्यांची माफी मागा.. अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृहात निदर्शने केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य विरोधकांवर आरोप करत आपापल्या जागा सोडून सभागृहाच्या हौद्याकडे धाव घेऊ लागले. ऑपरेशन सिंदूरबद्दल हे लोक ज्याप्रकारे बोलतात हे लोक देशद्रोहाचे आरोपी आहेत, असे आरोप करत सत्ताधारी बाकांवरील आमदारही सभागृहाच्या हौद्यात येत घोषणा देऊ लागले. दोन्ही बाजूचे सभासद हौद्यात येऊन घोषणा देऊ लागल्याने सभागृहाची बैठक तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी दहा मिनिटांसाठी तहकूब केली.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content