Thursday, January 23, 2025
Homeमाय व्हॉईसराज ठाकरेंच्या सहमतीनेच...

राज ठाकरेंच्या सहमतीनेच सदा सरवणकर मैदानात?

मुंबईतला माहीम मतदारसंघ आज सर्वात जास्त चर्चेचा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे तेथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेड म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच उतरत असलेल्या अमित ठाकरेंना मदत करावी अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार यांनी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची री ओढली. त्यादृष्टीने त्यांनी शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही केली. शिंदे यांनी सरवणकरांबरोबर दोन-तीन वेळा चर्चाही केली. परंतु सरवणकर यांनी आपली उमेदवारी काही मागे घेतली नाही.

वास्तविक पाहता, माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना भवन असलेला दादर परिसरही येतो. राज ठाकरेंचे वास्तव्यही दादरच्याच शिवाजी पार्कमध्ये आहे. अमित ठाकरेही त्यांच्यासोबतच राहतात. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय झालेले अमित ठाकरे मनसेमध्ये एक नेते म्हणूनच दिसू लागले. मात्र, सर्वसामान्यांमध्ये रुळलेले हे नेतृत्त्व नाही. या मतदारसंघात अमित ठाकरेंचे जे काही काम असेल तर ते मनसेचे. मनसेच्या कामाच्या जोरावर आणि राज ठाकरेंचे चिरंजीव या भांडवलावरच ठाकरेंची मदार आहे. याऊलट सदा सरवणकर पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेचे कार्यकर्ते. गटप्रमुखपासून नगरसेवक ते आमदार असे मागील ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. इथल्या प्रत्येक घराशी त्यांचा परिचय आहे. सतत तीन वेळा ते या परिसरात आमदार म्हणून निवडून आले आहेत. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारालाही येथे मते मिळतील. त्यामुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी व्हावी आणि अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा व्हावा, असा प्रयत्न राज ठाकरेंकडून केला गेला. याकरीता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दोनदा चर्चाही केली, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्षात सरवणकर अमित ठाकरेंच्या तुलनेत मजबूत उमेदवार ठरल्याने ही खेळी अंगाशी येऊ शकते असे वाटल्यानेच पुढे भाजपाच्या माध्यमातून मनसेकडून सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी असा दबाव टाकण्यात आला. हा दबाव तर इतका टोकाला गेला की भाजपा नेते प्रसाद लाड यांनी तर भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार असल्याचे जाहीरही केले.

सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमदेवार सरवणकर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने अर्ज माघारीबाबत चर्चा झाली नाही. या दरम्यान सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना सोशल मीडियातून वारंवार विनंती केली. मात्र राज ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे महायुतीचे मित्र असून आपसातल्या चर्चेतून मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सरवणकर यांना दिले. त्यानुसार सरवणकर आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील शिवसेना शाखेत ठाकरेंच्या भेटीची वाट पाहत होते. राज यांनी भेट नाकारल्याचा निरोप सरवणकर यांचे चिरंजीव समाधान यांनी आणला आणि सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिली.

राज ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. बाळासाहेबांनी ज्याप्रकारे कार्यकर्त्यांना न्याय दिला तसा न्याय राज ठाकरेंकडून अपेक्षित होता. मात्र भेट नाकारल्याने त्यांच्याशी संवाद झाला नाही. ते भेटले असते तर काही वेगळा निर्णय झाला असता. आता भेट नाकारल्याने जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवणे हाच पर्याय उरल्याचे सदा सरवणकर यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मी माझ्या नावाने नाही तर केलेल्या कामांवर मतं मागत आहे. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. राज ठाकरेंशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील, असा विश्वासही सरवणकर यांनी व्यक्त केला.

सरवणकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरवणकर यांच्या उमेदवारीबद्दल आपले मौन सोडले आहे. राज ठाकरेंबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी दोन जागांवर विशेष भर दिला होता. शिवडी आणि भांडुप. अमित ठाकरेंसाठी भांडुपच्या जागेवर विचार झाला होता. परंतु त्यांनी परस्पर माहीममधून अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर केली. शिवडीत महायुतीने मनसेच्या बाळा नांदगावकरांविरूद्ध उमेदवार दिला नाही. माहीममध्ये आम्ही उमेदवार दिला नसता तर ठाकरे गटाच्या उमेदवाराला फायदा झाला असता. आता आमचा किंवा मनसेचा उमेदवार निवडून येईल. त्यातूनही आपल्या सांगण्यानुसार सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे पुढची चर्चाच होऊ शकली नाही, असे शिंदे म्हणाले.

आदित्य ठाकरे मागच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा हा मतदारसंघ. त्यांना उमेदवारी नाकरून आदित्य यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी तेथील माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतले. भाजपाचे वरळीतले नेते सुनील राणे यांना बोरीवलीतून विनोद तावडे यांचे तिकीट कापून उमेदवारी दिली. पुढे सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेतली जागा देऊन त्यांच्या कुर्बानीची दखल घेतली गेली गेली तो भाग वेगळा. पण सांगायचे हे की आपला पुतण्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्यामुळे राज ठाकरेंनीही वरळीतून आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या खेपेला उद्धव ठाकरेही तशीच भूमिका घेतील अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु त्यांची अपेक्षा फोल ठरली. उद्धव ठाकरेंनी माहीममधून अमित ठाकरेंविरूद्ध उमेदवार दिला. त्यामुळे पुढचे सदा सरवणकरांचे माघारी प्रकरण रंगले. आतातर मनसेने आदित्य ठाकरेंविरूद्ध संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. राज ठाकरेही तेथे प्रचारसभा घेत आहेत.

असे असले तरी आता उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंनी माहीममध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला जायचे नाही असा निर्णय घेतला आहे. ठाकरे गट मुंबईत २२ जागा लढवत आहे. १८ तारखेपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईत फक्त दोनच प्रचारसभा घेणार आहेत. प्रचारासाठी आदित्य ठाकरे वडाळा, कुर्ला, शिवडी, कालीना, भायखळा, वरळी, चेंबूर, वर्सोवा, घाटकोपर, गोरेगाव, दहिसर, मागाठाणे अशा अनेक ठिकाणी जाणार आहेत. पण या दौऱ्यात ते माहीममध्ये मात्र फिरकणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. याबद्दल ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता आम्हाला माहीमध्ये प्रचारासाठी जाण्याची आवश्यकता वाटत नाही असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळेच ठाकरे गटाकडून अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा दिला जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मनसेने मुंबईत २५ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मागील अनेक निवडणुकीत मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय मनसेच्या मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजाविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांना मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती-मारवाडी मते मिळणार नाहीत. त्यामुळे मनसेचे उमेदवार यावेळी कोणासाठी फायदेशीर ठरतात हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सैफ अली हल्लाप्रकरणातला आरोपी बोगस?

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला कालच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो हसतखेळत, अत्यंत उत्साहित मुद्रेत स्वतःच्या वांद्र्यातल्या घरी जाताना वृत्तवाहिन्यांवर दिसला. त्यामुळे सैफवर गंभीर चाकूहल्ला झाला होता की नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे...

महाराष्ट्रात सरकार (तेही फडणवीसांचे) आहे?

महाराष्ट्रात एक स्थिर म्हणण्यापेक्षा, पाशवी बहुमत असलेले, प्रमाणापेक्षा जास्त स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे अत्यंत क्लेशदायक आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी गेल्या २० नोव्हेंबरला मतदान झाले. २३ नोव्हेंबरला...

एकनाथ शिंदेंचा भाजपाने केला ‘करेक्ट कार्यक्रम’?

नाकापेक्षा मोती जड.. चाय से किटली गरम.. अशा काही म्हणी माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यातलीच एक म्हण काल शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवली असावी. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही इथपासून उपमुख्यमंत्रीपद...
Skip to content