शिवसेना (उबाठा) पक्षाची बाजू सणसणित मांडणारे संजय राऊत दिसेनासे झालेले असताना निवडणुका जाहीर झाल्या आहेत, हा योगायोग आहे हे मानयाला लोक तयार नाहीत. निवडणुकांमध्ये पक्षासाठी अडचण नको म्हणून सेना उबाठाने मुख्य प्रवक्त्यांना बाजूला केले आहे का, हा सवाल लोकांना सतावत आहे. बऱ्याच लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होत आहेत. पहिला टप्पा अपेक्षेप्रमाणे नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या असून त्याचे मतदान २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. २८४ नगराध्यक्ष थेट निवडणूक पद्धतीने निवडून येतील आणि सहा हजार आठशे एकूणसाठ इतक्या नगरसेवकांचीही निवड केली जाईल. मतदारांची संख्या एक कोटी सात लाखांच्या घरात आहे. एकूण ९ कोटी मतदार महाराष्ट्रात आहेत. त्यातील एक कोटी म्हणजे दहा-पंधरा टक्के मतदार या पहिल्या टप्प्यात आपला हक्क बजावणार आहेत. पण हे जे एक कोटी सात लाख मतदार आहेत ते खरे आहेत की नाही असा हास्यास्पद सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. त्यांनी दुबार मतदारांची नावे शोधण्याचा आग्रह धरला तो निवडणूक आयोगाने मान्य केला. मात्र तरीही यादीत असणाऱ्या मृत मतदारांची नावे कायम राहणार आहेत. आधीच लांबलेल्या निवडणुका या अशा कारणांसाठी लांबवणार नाही, अशी भूमिका न्यायालयानेही घेतल्याने जळफळाट व्यक्त करण्यापलीकडे उद्धव व राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व काँग्रेस पक्षाला काही करता येणार नाही.
मुळात दुबार नोंदणीची प्रकरणे किती असतील? एक कोटी मतदारांत एक-दोन लाखांची नावे दुबार आलेली असणे शक्य आहे. पण ते काही दोन-दोन वेळा मतदान करत नाहीत. त्यामुळे त्यांना मतचोरीचा दोष देत ठोकून काढा वगैरे विरोधकांनी म्हणणेही साफ चूक आहे. नावे असताना वा नसताना बोगस नावांवर आपले कार्यकर्ते मतदान करतील अशी व्यवस्था फार कमी प्रमाणात केली जाते. केवळ नाव दोन ठिकाणी आहे म्हणून दोनदा मतदान करणारे सर्वसामान्य मतदार नसतातच. राज ठाकरे बहिष्काराची भाषा जरी बोलत असले तरीही उद्धव व राज दोघेही बहिष्कार टाकण्याचा वेडेपणा करणार नाहीत. कारण आता चार-चार वर्षे नगरपालिका, जिल्हा परिषदा व मनपातील सदस्यपदांसाठी वाट पाहणारे कार्यकर्ते तुमच्या बहिष्कारामुळे थांबणार नाहीत. ते पक्ष सोडून अन्यत्र संधी शोधतील. अशावेळी राऊतांसारख्या धडाकेबाज प्रवक्त्याची उणीव सेना (उबाठा)ला जाणवेल की नाही? या टप्प्यावर संजय राऊतांना मुद्दाम बाजूला केल्याचा संशय त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. त्यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वी एक पत्र एक्स, फेसबुक, व्हॉट्सएप आदी समाजमाध्यमांतून प्रसृत केले. ते लगेचच व्हायरल झाले. त्या पत्रात राऊत म्हणतात की, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काही दिवस गर्दीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. सबब राऊत नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी २०२६नंतर पुन्हा सार्वजनिक जीवनात कार्यरत होतील. राऊतांच्या विधानावरून लगेचच वादळ उठले. जसे राऊत सकाळी काहीही बोलले तरी त्यावर तातडीने देशभरातून दिवसभर विविध प्रतिक्रिया उमटतात तसेच या पत्राचेही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राऊतांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या पत्राची दखल घेतली आणि राऊतांना लवकर आराम पडावा अशी सदिच्छा व्यक्त केली.

राऊत माध्यमांपासून दूर का झाले याचा खुलासा मात्र त्या पत्रातून होत नाही. वैद्यकीय कारणांसाठी गर्दीपासून दूर राहवे लागत असले तर सभा-संमेलनांतून, पक्षाच्या जाहीर प्रचारांतून, मोर्चांतून लांब राहवे लागणे सहाजिकच आहे. पण जनतेच्या मनात मविआ तसेच सेना (उबाठा)विषयी ज्या शंकाकुशंका उत्पन्न होत असतात, त्यांना व्हीडिओच्या माध्यमांतून राऊत उत्तर नक्कीच देऊ शकले असते. पण ते तसे करत नाहीत. ते माध्यमांवर दिसतही नाहीत. यातून निराळ्या चर्चा सुरु होतात आणि त्यातून असे ध्वनित होते की, संजय राऊत यांना मुद्दामच उद्धव ठाकरेंनी दूर केले असावे. संजय राऊतांचे तिखट आणि झोबंणारे उद्गार केवळ भाजपालाच घायाळ करतात असे नाही किंवा केवळ एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यांना रक्कबंबाळ करतात असे नाही, तर ते कधीकधी काँग्रेस नेत्यांवरही तुटून पडतात. ते शरद पवारांच्या सहकाऱ्यांनाही ठोकून काढतात. राऊतांनी त्यांच्या स्वभावानुसारच रोखठोक हे वृत्तपत्रातल्या सदराचे नाव घेतले आहे. त्यातून ते नावानिशी विविध प्रश्नांवर गेली दोन दशके भाष्य करतच आहेत. या काळात ते केवळ ‘सामना’चे कार्यकारी संपादक न राहता शिवसेनेचे नेते बनले आणि सहाजिकच त्यांच्यावर पक्षाच्या निराळ्या जबाबदाऱ्याही येत गेल्या. ते शिवसेनेच्या विविध विभागीय बैठकांचे नेतृत्त्व करू लागले. ते सेनेच्या नाशिक विभागाचे प्रभारी राहिले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून प्रचार व प्रसाराचे काम तर राऊत दररोजच करत होते. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या पक्षफुटीनंतर राऊतांच्या जिभेलाही एक निराळी धार चढली. गद्दार, गद्दार व खोके, बोके, ४० रेड्यांचे बळी, रेडा कापून त्याची शिंगे वर्षा बंगल्यावर पुरली गेली.. वगैरे वगैरे कथा त्यांनी ज्या पद्धतीने रंगवल्या त्याने शिंदेंच्या शिवसेनेला काय बोलावे, काय नाही हे सुचेनासे होत असते.
गेल्या सहा-आठ महिन्यांपासून राज-उद्धव यांच्यातील जवळीकीचे नाट्य रंगू लागले. त्यावेळी प्रत्येक चित्रात, प्रत्येक दृष्यात राज व उद्धव यांच्यामध्ये संजय राऊत चमकताना दिसत होते. राज ठाकरे यांनी २००५मध्ये ‘मातोश्री’चा निरोप घेताना “बाळासाहेबांना बडव्यांनी घेरले आहे” अशी टीका केली होती. बडव्यांच्या त्या यादीत उद्धव यांच्या टीममधील राऊतांचाही समावेश राज करत होते असे मानायला जागा आहे. तेव्हा उद्धव यांच्या तसेच मातोश्रीच्यावतीने दादरच्या शिवाजी पार्कातील राज ठाकरेंच्या घरी संजय राऊत चर्चा करायला, समजूत घालायला गेले होते. मात्र तेव्हा राज यांच्या घराजवळ जमलेल्या राज समर्थकांनी संजय राऊतांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. मराठीच्या मुद्द्यावर दोघा भावांच्या ऐक्याच्या चर्चेला सूर सापडला तेव्हा राऊत त्यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदेत राज-उद्धव एकत्र आल्यास काय काय होईल, याची चित्रे रंगवत होते. मात्र त्याहीवेळी सामनातील त्यांच्या रोखठोकमधून राज यांना इशाराही देण्यात आला होता. राज यांची सत्तारूढ पक्षाबरोबरची घसट, त्यांच्या मनसेची धरसोडीची धोरणे वगैरेबाबत राऊतांनी लिहिले होते. नंतर उद्धव राज यांच्या घरी लागोपाठ दोनवेळा गेले. राज सहकुटुंब मातोश्रीवर गेले तेव्हा मग युतीच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या शक्यता राऊत व्यक्त करत होते. त्यावरूनही मनसेचे नेते अस्वस्थ झाले होते. मनसेची धोरणे राज स्वतः जाहीर करतात, ते काम संजय राऊतांनी करू नये असेही मनसेने सुनावले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर मनपा निवडणुकांच्या तारखा काही आठवड्यातच जाहीर होणार असे वातावरण असताना अचानक राऊतांनी राजकीय घडामोडींपासून लांब राहण्याचा जो निर्णय जाहीर केला त्यामागे राज ठाकरेंचा काही हात तर नव्हता ना, अशा शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत. शरद पवारांनीही मध्यंतरी संजय राऊतांच्या बोलण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसलाही संजय राऊतांचे आपल्या पक्षाच्या धोरणांवरील टिप्पणी करणे मान्य नव्हते व नाहीही. नाना पटोले यांनी पूर्वी संताप व्यक्त केला होता. विजय वडेट्टीवार तसेच नवे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मनात राऊतांच्या बोलण्या-वागण्याबाबत अढी आहे हे जाणवते. संजय राऊतांचे बोलणे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादानेच जरी सुरु असले तरी त्यांनाही कुठेतरी लगाम घालावा असे वाटले होते का, हा खरा सवाल आहे. निवडणुकांच्या प्रचाराच्या ऐन रणधुमाळीतच राऊत नामे सेना (उबाठा)ची मुलुखमैदान तोफ थंडावली आहे. यामागे नेमके काय राजकारण शिजले आहे? संजय राऊतांचे बोलणे भाजपाला इतके बोचत होते की भाजपाने खास नवा प्रवक्ताच राऊतांच्यावर सोडला. गेली दीड-दोन वर्षे नीतेश राणे हे काम जहालपणाने करत होते. ते मंत्री झाल्यानंतर आता नवनाथ बन यांच्याकडे ही जबाबदारी भाजपाने दिली आहे. पण राऊतच दिसेनासे झाल्याने सहाजिकच नवनाथ यांचाही बार फिका पडायला लागला आहे. आता राऊतांचे राजकीय शत्रूच मागणी करतील की, राऊत लवकर बरे होऊन या, म्हणजे शाब्दिक युद्ध खेळायला मजा येत राहील.

