Homeबॅक पेजभारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उलगडले...

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उलगडले विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे!

विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे आता उलगडले आहेत. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी ११.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूचा शोध लावला आहे.

दीर्घिका, या विश्वाच्या मूलभूत रचनेच्या उत्क्रांतीशी संबंधित आधुनिक सिद्धांतांमध्ये असा अंदाज वर्तवला गेला आहे की, या दीर्घिका वायू आणि गडद पदार्थांच्या विशाल, अदृश्य प्रवाहांनी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. यालाच आपण ब्रह्मांडाचे जाळे म्हणतो. या ब्रह्मांडीय जाळ्याचे सूक्ष्म तंतू एकप्रकारे दीर्घिकांच्या संगोपनगृहांसारखे काम करत असतात. यातच त्यांचा विस्तार होत असतो. यासाठी त्या ताऱ्यांच्या निर्मितीसाठी इंधनाप्रमाणे काम करणाऱ्या वायुंच्या एकसंधीकरणाची आणि त्याला आकार देण्याची प्रक्रिया घडवून आणतात. हे तंतू अतिशय सूक्ष्म आहेत आणि त्यांची घनता आपल्या वातावरणापेक्षा १०० अब्ज ट्रिलियन पटीने कमी असते, त्यामुळेच त्यांचे निरीक्षण करणे अत्यंत कठीण आहे.

अलिकडेच आंतर विद्यापीठस्तरीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्सच्या पीएचडीधारक अभ्यासक इशिता बॅनर्जी आणि त्यांचे पर्यवेक्षक डॉ. सौगत मुजाहिद यांच्या नेतृत्त्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने ११.७ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या प्रकाशाचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून त्यांनी सुमारे साडेआठ लाख प्रकाशवर्षे विस्तारलेल्या विशाल ब्रह्मांडीय जाळ्यातील तंतूचा शोध लावला आहे. त्यांच्या विश्लेषणात आढळलेली तंतूची लांबी आपल्या दीर्घिकेच्या म्हणजेच आकाशगंगेच्या तारकीय चकतीच्या आकाराच्या अंदाजे दहापट इतकी आहे. तिच्यात आणि तिच्यापासून सर्वात जवळच्या असलेल्या अँड्रोमेडा या दीर्घिकेमध्ये जितके अंतर आहे, त्या अंतराच्या एक तृतीयांश जास्त इतकी ही लांबी आहे. या संशोधनासाठी या चमूने चिलीमधील व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा वापर केला. या खगोलीय दुर्बीणीचे कार्यन्वयन युरोपीय दक्षिणी वेधशाळा म्हणजेच युरोपियन सदर्न ऑब्जर्वेटरीद्वारा केले जाते.

ही मायावी रचना शोधण्यासाठी संशोधकांनी आपली दुर्बिण उच्च-लालवर्णी क्वासर Q1317–0507च्या दिशेने वळवली होती. त्यानंतर क्वासरपासून मिळालेल्या उच्च प्रतिच्या प्रकाशाचे इतर विकिरणीय विभाजनाचे विश्लेषण केले. या विश्लेषणाअंती त्यांनी z ~ ३.६च्या रेडशिफ्टवर हायड्रोजनने समृद्ध असे तटस्थ क्षेत्र निश्चित केले. हे क्षेत्र आंशिक लायमन लिमिट सिस्टम म्हणूनही ओळखले जाते. संशोधकांना या क्षेत्रात जड मूलद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. या क्षेत्राची धात्विकता त्याच्या सौर परिसरापेक्षा दहा हजार पटीने कमी असल्याचे त्यांना दिसले. ही स्थिती प्राथमिक ब्रह्मांडीय तंतूंच्या सैद्धांतिक भाकितांशी सुसंगत अशी होती.

दुसरीकडे या चमूने आपल्या संशोधनाला जोड दिलेल्या पूरक निरीक्षणांसाठी व्हीएलटी बहुघटकीय विभाजनात्मक निरीक्षकाचा वापर केला. या निरीक्षणांमध्ये त्यांना एकाच रेडशिफ्टवर सात लाइमन अल्फा उत्सर्जक दीर्घिका असल्याचेही आढळले. या विश्वाच्या पसाऱ्यातील इतक्या छोट्याश्या अवकाशात आढळून आलेल्या दीर्घिकांची संख्या ही सध्याच्या कोणत्याही अभ्यासात्मक निरीक्षणांमध्ये सामान्यतः आढळून येणाऱ्या दीर्घिकांच्या संख्येपेक्षा दहापट जास्त असल्याचे मत इशिता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय, अंतराळात या दीर्घिका जितक्या क्षेत्रात विस्तारल्या आहेत, त्यातून एक दुर्मिळ संरचनाही दिसून येते आणि या संरचनेतूनच ब्रम्हांडीय तंतूची एक मोठ्या स्वरुपातील संरचनाही अस्तित्त्वात असल्याचे ठळकपणे अधोरेखित होते असा निष्कर्षही डॉ. इशिता बॅनर्जी यांनी काढला आहे.

व्हीएलटीवरील बहुघटकीय विभाजनात्मक निरीक्षकाचा वापर करून सलग दहा तास केलेल्या सखोल निरीक्षणांमुळे ब्रम्हांडीय तंतूंच्या रचनेसह विस्तारित लायमन-अल्फा उत्सर्जनाचा शोध घेणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. हा नेब्युला म्हणजे प्रचंड मोठा, तेजस्वी आंतरतारकीय वायू आणि धूलिकणांचा समूह सामान्यत: प्रकाशमान क्वासरभोवती आढळतो. यातून होणाऱ्या तीव्र किरणोत्सर्गामुळे त्याच्या आसपास पसरलेला वायू प्रकाशमान होत असतो. मात्र या अभ्यासात आढळलेल्या कोणत्याही दीर्घिकेत क्वासरसारखे गुणधर्म आढळले नाहीत आणि त्यामुळेच हा शोध खऱ्या अर्थाने अपवादात्मक असल्याची प्रतिक्रिया इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सौगत मुजाहिद यांनी व्यक्त केली आहे. विस्तारित अल्फा उत्सर्जनाला चालना देणारी प्रक्रिया नेमकी काय आहे याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. असे असले तरी या अभ्यासात शोध लागलेल्या दीर्घिकांच्या किरणोत्साराच्या क्षेत्राद्वारे संचलित होणारा पुनर्संयोजित किरणोत्सर्ग हाच यामगाचा प्राथमिक योगदान देणारा घटक असल्याचा आमचा प्रस्तावित निष्कर्ष असल्याचेही डॉ. मुजाहिद म्हणता. या संशोधन चमूने पहिल्यादांच केलेल्या उत्सर्जन आणि शोषण रेषा या दोन्हींच्या अभ्यासाच्या माध्यमातून, ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूंविषयी पूरक माहिती एकत्रित करण्याची अद्वितीय क्षमता प्रभावीपणे दाखवून दिली आहे. या संशोधनासाठी केलेल्या शोषण रेषांच्या अभ्यासातून, उत्सर्जनात आढळलेल्या तंतूच्या प्राथमिक स्वरूपाचे अंतरंग जाणून घेण्यासाठीचा महत्त्वाचा मूलभूत दृष्टिकोन मिळू शकला आहे. अशाप्रकारच्या संवर्धक दृष्टिकोनामुळेच या अभ्यासालाही वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे. कालांतराने या तंतूंमधला हा अगदी सुरुवातीचा अर्थात प्राथमिक  पातळीवरचा हा वायू या दीर्घिकांमध्ये प्रवाहित होऊन नवीन ताऱ्यांच्या निर्मितीला चालना देण्याची आणि दीर्घिकांच्या उत्क्रांतीला आकार देण्याची प्रक्रिया पार पाडेल असे अपेक्षित असते. अलिकडेच अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकाने या संशोधनाचा स्वीकार  केला आहे. या शोधामुळे खगोलीय निरीक्षणाच्या आधुनिक सुविधांच्या क्षमताही समोर आल्या आहेत. त्याचवेळी या शोधामुळे अशा संशोधनांसाठीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्वही अधोरिखित झाले आहे, अशी भावना डॉ. मुजाहिद यांनी व्यक्त केली आहे. हे संपूर्ण संशोधन नेदरलँड्समधील लेडेन विद्यापीठ, इटलीमधील मिलान-बिकोका विद्यापीठ आणि अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने पूर्ण केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content