महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी पुण्याच्या चिंचवडमध्ये पानाची टपरी चालवली आहे. पानाची टपरी चालवणारा अण्णा यांच्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते विधानसभेचा उपाध्यक्ष या पदांपर्यंत पोहोचतो, हा भारतीय संविधानाचा गौरव आहे.
अण्णा २००९मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि २०१४मध्ये आमदारकीला पराभूत झाले, हे सांगून अजितदादांनी त्यांच्या २०१९च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला.

अण्णा बनसोडे यांना २०१९ला तिकीट दिले गेले नाही, तेव्हा मी जयंतरावांना (पाटील) विचारले की, अण्णांचं तिकीट का कापलंय? जयंतराव म्हणाले की, सगळंच काही माझ्या हातात नाही. मग मी रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे संपतो तेथे रात्री २ वाजता अण्णांना बोलावले. जयंतरावांनी माझ्याकडे दोन-तीन अतिरिक्त एबी फॉर्म दिले होते. त्यातला एक फॉर्म अण्णांना दिला. त्यांना सांगितले की, सकाळी अकरा वाजताच अर्ज भरा. अण्णांनी विचारले- पण, तिकीट तर शिलवंत मॅडमना जाहीर झाले आहे. मी त्यांना दरडावून सांगितले की, तुम्हाला काय करायचेय? तुम्ही फॉर्म भरा.. अकरा वाजता बरोब्बर. अण्णांनी फॉर्म भरला आणि नंतर सव्वाअकराला शिलवंत मॅडम गेल्या फॉर्म भरायला. तेव्हा त्यांना निर्वाचन अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अधिकृत अर्ज तर दाखल झाला आहे. त्यानंतर अण्णा १७ हजार मतांनी निवडून आले. आज ते उपाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे अजित पवारबरोबर राहिले तर कसे कल्याण होते, ते मी आमच्या, राष्ट्रवादीच्या समोरच्या बाकांवर बसलेल्या सदस्यांना सांगू इच्छितो, असे अजितदादांनी म्हणताच त्याला सभागृहाने हास्यकल्लोळात दाद दिली.
कितीही काड्या घातल्या, बांबूची लागवड केली तरी…
विरोधकांनी कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरी आम्ही तिघे एकत्रच आहोत आणि एकत्रच राहू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ते, अजित पवार आणि एकनाथ शिन्दे यांची महायुती अभंग राहील, असा विश्वास काल व्यक्त केला. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यांच्या या वाक्याचे बाके वाजवून स्वागत केले.

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळी आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीवरून लोकशाही कोसळली, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, केतकी चितळे, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी, राहुल कुलकर्णी अशांवर कारवाई केली गेली तेव्हा लोकशाही कोसळली नव्हती. आव्हाड यांच्या घरी गेलेल्या आणि मारहाण झालेल्या आनंद करमुसे यांच्यासह ही वर घेतलेली नावे आठवतात का, असा सवालही फडणवीस यांनी केला. विरोधी बोलला की मिळेल त्या पत्रकाराला अटक कर असे प्रकार झाले तेव्हा राष्ट्रावर, महाराष्ट्रात लोकशाहीवर संकट नव्हते का, असा सवाल त्यांनी केला.
विरोधी पक्षांनी महायुतीत कितीही काड्या घालायचा प्रयत्न केला तरी परिणाम होणार नाही, हे सांगताना फडणवीस म्हणाले की, अजितदादा आक्रमक असल्याने त्यांच्यावर हे लोक घसरत नाहीत. पण मी आणि शिन्दे, आम्ही दोघेही तसे मवाळ आहोत. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जातो, लेकुरवाळे असल्यासारखे… फडणवीस असे म्हणताच सभागृहाने त्यांना दाद दिली.