कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला कोरोना सेंटर देणाऱ्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत, अशा शब्दांतही त्यांनी उबाठा नेत्यांना खडे बोल सुनावले.
राईट टू रिप्लायच्या अधिकारावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणायुद्ध सुरू केल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. नियम २९३ची चर्चा सुरू करताना विरोधकांकडून चर्चा सुरू करणारे आमदार आदित्य ठाकरे यांनाच राईट टू रिप्लायच्या अंतर्गत भाषण करता येईल, अशी नियमात तरतूद आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांना राईट टू रिप्लायच्या अंतर्गत भाषण करता येणार नाही, असा निर्वाळा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला. त्यावर जाधव यांनी हरकत घेतली. त्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंच्या आमदारांनी गदारोळ केला.

विधानसभेतील चर्चेला सविस्तर उत्तर देताना शिन्दे यांनी महायुती सरकारने केलेल्या विविध क्षेत्रांमधील कामांचा आढावा घेतला. गेली पंचवीस वर्षे मुंबईला आणि मुंबई महापालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून त्यांनी राज्य केले, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्याचा विषय असो की कापड गिरण्यांच्या जागेवरील पुनर्विकास, युती शासनाने या सर्व घटकांना घरे देण्यासाठी विविध योजना आणल्या. पायाभूत सुविधा वाढवताना अटल सेतू असो की नव्या विमानतळाला जोडणारी मेट्रो असो, युती सरकारने पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवले आहे, याकडेही शिन्दे यांनी लक्ष वेधले.
स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना उबाठाची खिल्ली उडवली. शिन्दे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेन्द्र आव्हाड सभागृहात आले. त्याकडे निर्देश करत शिन्दे म्हणाले की, आव्हाड आता आलेत, त्यांना विचारा. त्यांच्या फायलींवर मी लगेच सह्या करायचो की नाही ते… त्यावर आव्हाड उठून म्हणाले, माझ्या एका फायलीवर तर या माणसाने रात्री साडेतीन वाजता सही केली. त्यावर शिन्दे म्हणाले, केली ना… शिन्दे बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जागेवरून उठले आणि आव्हाड यांना उद्देशून म्हणाले, अहो त्याला रात्री साडेतीन नाही, पहाटे साडेतीन म्हणतात… असे हसत हसत म्हणत अजित पवार सभागृहातून बाहेर गेले आणि सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक झाल्यावर अर्ध्या तासाने प्रवासाचा वेळ वाचणार असून दरमहा एक कोटी रुपये इंधनापोटी वाचणार आहेत, असेही शिन्दे यांनी सांगितले. मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला त्यावेळी या लोकांनी त्यांच्यासाठी काहीही केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पायऱ्यांवर आंदोलने करण्यापेक्षा सभागृहात या आणि प्रश्नांची उत्तरे घ्या, असं विरोधकांना सुनावून शिन्दे म्हणाले की, आम्ही बघतो.. पाहतो.. असे न सांगता किंवा अडवून दाखवतो, अशी वृत्ती न ठेवता आम्ही करून दाखवतो. खोट्या आरोपांचा सिलसिला सुरू ठेवलात तर लोक तुम्हाला विरोधी पक्ष असे म्हणण्याऐवजी विनोदी पक्ष म्हणून संबोधू लागतील, असंही शिन्दे म्हणाले.