प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील भाषणांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांत प्रकल्प स्थगितीच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, याकडे लक्ष वेधून फडणवीस म्हणाले की, प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही. त्यांच्या या वाक्यावर सत्ताधारी महायुती सरकारच्या घटक पक्षांमधील सदस्यांनी बाके वाजवून दाद

दिली. स्थगिती दिले जात असलेले प्रकल्प कशामुळे स्थगित केले जातात, याबद्दल फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षातील सदस्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की आपण अनेकदा प्रकल्प करतो. पण त्यात काही बाबी नंतर आढळून येतात. त्यामुळे त्याबद्दल निर्णय घ्यावे लागतात.
याआधीच्या एकनाथ शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमधील काही निर्णयांबद्दल ते म्हणाले की, काही निर्णयांबद्दल स्थगिती दिली आहे आणि प्रत्येक स्थगिती मुख्यमंत्री म्हणून मी दिलेली नाही. काही प्रकल्पांमधे विभागीय आयुक्त पातळीवर किंवा काही प्रकल्पांसंदर्भात केंद्राच्या निकषांमधील बदलांमुळे स्थगिती द्यावी लागली आहे. पण तरीही प्रत्येक निर्णयाच्या वेळी फडणविसांचा शिन्दे यांना दणका, अशा बातम्या दिल्या जातात. प्रकल्प रद्द करत सुटायला मी काही उद्धव ठाकरे नाही आणि शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये झालेल्या प्रत्येक प्रकल्पात मी आणि अजित पवारही सहभागी होतो. त्यामुळे ती सामूहिक जबाबदारीच होती आणि आजही आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.