पुढच्या जन्मी विधानसभेतील किती सदस्य फ्लेमिंगो पक्ष्याचा जन्म घेणार आहेत, हे मंत्रिमहोदयांनी सांगावे, अशी अजब मागणी आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. याचे उत्तर देण्यासाठी मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल, असे सांगून ही माहिती पटलावर ठेवता येणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तेव्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूच्या प्रश्नावरून आशिष शेलार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हास्यकल्लोळ उडवून दिला. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल सांगताना मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक जिवाला ८४ लाख जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे आपल्या विधानसभेतील कोणाही आमदाराला या
फ्लेमिंगोंसारखे पुढच्या जन्मी फ्लेमिंगो होऊन असे मरण यायला नको, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यावर आशिष शेलार यांनी उपप्रश्न विचारला की, मंत्रिमहोदयांनी फ्लेमिंगो पक्ष्यांचा प्रश्न अध्यात्मिक पातळीवर नेला आहे. त्यामुळे सभागृहातील किती सदस्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे हे मला माहीत नाही. पण पुढच्या जन्मी किती आमदार फ्लेमिंगो म्हणून जन्माला येतील, याची माहिती वनमंत्री देऊ शकतील का…
शेलार यांच्या प्रश्नावर सभागृहात हंशा उसळला. मुनगंटीवार यांनी पटकन उभे राहून उत्तर दिले की, पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळणार, हे सांगायला मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल. तो मिळू शकणार नसल्याने ही माहिती मी पटलावर ठेवू शकणार नाही.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून निर्देश दिले की, जी माहिती पटलावर ठेवता येणार नाही, त्यावर चर्चाही करू नका… त्यामुळे सभागृहात पुन्हा हंशा उसळला.