राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांना महाविकास आघाडीमध्ये बरोबर घ्यायचे की नाही ह्यावरून आता आघाडीतल्या सर्व घटकपक्षांची उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसने गेल्या आठवड्यात बैठक घेऊन महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला ह्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड ह्यांनी तोडो फोडो, ह्याला मारा, त्याला झोडा, अशी भाषा करणार्या मनसेबरोबर जायचे नाही असा निर्णय घेतला. दोन दिवसांत त्यांना काय उपरती झाली, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार ह्यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाशी आणि वेळ पडली तर उद्धव ठाकरे ह्यांच्या शिवसेनेशी आघाडी करण्याची तयारी दर्शविली. पण उबाठाने मनसेबरोबर जाता कामा नये अशी त्यांनी अट घातली. आता त्यांच्याच पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार ह्यांनी संगितले की, महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि मनसे ह्यांची आघाडी झाली आहे, तर पवारही मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास उत्सुक आहेत.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना ह्यांची युती तोडण्यात यशस्वी झालेल्या पवारांनी, काँग्रेसने शिवसेनेला बरोबर घ्यावे यासाठी थेट काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांना मनविले होते. तेच पवार आता पुन्हा महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेला बरोबर घेण्यासाठी काँग्रेस हायकमांडशी बोलून मध्यस्थी करताना दिसतात. खरेतर पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे मुंबई महापालिकेत अवघे दोन माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पक्षाची मुंबईत ताकद नाही. पण भाजपाविरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांनी आघाडी करावी ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मुळातच राज आणि उद्धव ठाकरे ह्यांनी गेल्या काही महिन्यांत सतत एकत्र येऊन, एकत्र भेटून, कुटुंबियांसाहित भेटून दोन्ही भाऊ तब्बल २० वर्षांनी एकत्र आल्याचा

माहोल निर्माण केला आहे. मुंबईतल्या मराठी जनतेपुढे एक भावनिक साद घातली आहे. पण २० वर्षांनी ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना ही उपरती का झाली? शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा वेगळा पक्ष काढून इतक्या वर्षांत राज ठाकरे ह्यांचे काहीच झाले नाही तर शिवसेनेत शिंदे ह्यांनी फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे ह्यांनाही भावाच्या आधाराची गरज वाटली. त्यामुळे दोघे भाऊ पहिल्यांदा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढला. नंतर मतचोरीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील झाले. ह्यादरम्यान कधी उद्धव ह्यांचे कुटूंब शिवतीर्थवर राज ह्यांच्या घरी जेवायला तर कधी राज ह्यांचे कुटूंब मातोश्रीवर जेवायला, असे प्रकार चालू झाले. मात्र जेव्हा राज ह्यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीला उभा होता तेव्हा हे बंधुप्रेम कुठे गेले होते? असा प्रश्न सामान्यजनांना पडल्याशिवाय राहत नाही. जो स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकत नाही तो काय इतर उमेदवारांना निवडून आणणार? असा प्रश्न विचारला जातोय.
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा अंत्ययात्रा निघाली, तेव्हा राज ह्यांना साहेबांच्या ट्रकवरुन खाली उतरविण्यात आले होते. हा अपमान विसरून राज, उद्धव ठाकरे ह्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला हजार राहिले होते. त्यांनी आदित्य ठाकरे ह्यांच्याविरोधात वरळी मतदारसंघातून उमेदवारही दिला नव्हता. मात्र राज ह्यांचे धरसोड धोरणच त्यांच्या ह्या अवस्थेला कारणीभूत आहे. कधीही भूमिकेत सातत्य नाही. कधी पवारांच्या बाजूने निवडणूक सभा घ्यायच्या आणि लावरे तो व्हिडिओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर टीकेची झोड उठवायची. तर पुढच्याच निवडणुकीत मोदी ह्यांना पाठिंबा जाहीर करून मोदी ह्यांच्यासाठी प्रचारसभा घ्यायच्या. नुसते खल्ळखट्ट्याकचे नारे द्यायचे. मराठी बोलत नाही म्हणून कधी दुकानदाराला मारहाण तर कधी बँकेच्या अधिकार्यावर हल्ला. ह्याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या लोकल गाडीत एक मराठी मुलगा हिंदी बोलला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. आणि त्या मुलाने नंतर आत्महत्त्या केली. कधी टोलनाक्यांवर आंदोलन तर कधी मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लागत नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध आंदोलन. कधी मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ महाग दराने विकले जातात म्हणून आंदोलन. ह्यातला एकतरी मुद्दा, एक तरी आंदोलन तडीस नेले आहे का? ना मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना जास्त शो मिळाले, ना तेथे विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वस्त झाले. टोलमाफी तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करून टाकली. ह्या पार्श्व्भूमीवर ठाकरे बंधूंनी केवळ निवडणुकीसाठी मराठीच्या नावावर एकत्र येऊन काय होणार आहे? परिणामी राज आणि उद्धव ह्यांचे हे बंधुप्रेम किती काळ टिकते, हे येणारा काळंच ठरवेल!

