Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसउद्यापासून हिंदूंचा पितृपक्ष...

उद्यापासून हिंदूंचा पितृपक्ष सुरू

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ यावर्षी उद्या,  18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे.

प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचाही आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म-शक्ती सामावलेली असते. श्राद्धाचे इतके महत्त्व असतानाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास आदींमुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला वा अवास्तव अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे. म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास, पितृपक्षात श्राद्ध आणि दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व, श्राद्धविधी करण्यामागील उद्देश, श्राद्ध कोणी करावे?, श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग आदीविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखामध्ये दिली आहे.

1. श्राद्ध शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ: ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते, ते ‘श्राद्ध’ होय.

2. श्राद्ध शब्दाची व्याख्या: ब्रह्मपुराणाच्या ‘श्राद्ध’ या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिली आहे.

देश काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्।

पितॄनुदि्दश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम्।।

अर्थ: देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे (अन्नादी) दिले जाते, त्याला श्राद्ध म्हणावे.

पितृपक्ष

3. श्राद्धविधीचा इतिहास: श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची आहे. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात. लक्ष्मण आणि जानकी यासह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो अन् त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर ‘राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो’, असा उल्लेख रामायणात आहे. ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन केलेली पितृपूजा म्हणजे अग्नौकरण, पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त केलेली पूजा म्हणजे पिंडदान (पिंडपूजा) आणि ब्राह्मणभोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था आहेत. सांप्रत काळातील ‘पार्वण’ श्राद्धात या तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.

4. श्राद्ध करण्याचे उद्देश:

१. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे.

२. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.

5. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि पद्धत: पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात.

पितृपक्षातही श्राद्ध करणे शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. योग्य तिथीवरही महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.

6. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व: दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीतजास्त नामजप करावा. या काळात प्रतिदिन न्यूनतम 72 माळा नामजप करण्याचा प्रयत्न करावा.

पितृपक्ष

7. श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला ‘संधी न देणारा हिंदु धर्म!- मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्‍या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्‍याने श्राद्ध करावे. एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत. प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने सिद्ध केली आहे. ‘एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते’, असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे.

8. श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग:

  • योग्य असे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे.
  • मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत, तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे.
  • अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत, तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावे आणि देवस्थानी शाळिग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करावे अन् ते पान गायीला घालावे किंवा नदी, तळे, सरोवर, विहीर इत्यादींमध्ये सोडावे.
  • राजकार्य, कारागृहात, रोग किंवा इतर काही कारणे यांमुळे मृताचे श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे श्राद्ध करावे.
  • संकल्पविधी करावा, म्हणजे पिंडदानाविना बाकी सर्व विधी करावेत.
  • ब्रह्मार्पणविधी करावा, म्हणजे ब्राह्मणाला बोलावून हात-पाय धुतल्यावर त्याला आसनावर बसवून पंचोपचारे पूजा करून भोजन घालावे.
  • होमश्राद्ध करावे, म्हणजे द्रव्य आणि ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून ‘उदीरतामवर’ या सूक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून होम करावा. (हे उत्तरक्रियेच्या वेळी पाहण्यास मिळते.)

9. वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने पुढील प्रकारे श्राद्ध करावे:

  • उदकपूर्ण कुंभ द्यावा.
  • थोडे अन्न द्यावे.
  • तीळ द्यावेत.
  • थोडी दक्षिणा द्यावी.
  • यथाशक्ती धान्य द्यावे.
  • गायीला गवत घालावे.
  • विधी इत्यादी काही न करता केवळ पिंड द्यावे.
  • स्नान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे.
  • श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी उपवास करावा.
  • श्राद्धाच्या दिवशी श्राद्धविधी वाचावा.
  • या सर्व प्रकारांवरून प्रतिवर्षी येणार्‍या श्राद्धादिवशी पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केले पाहिजे, त्याविना राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश असल्याचे लक्षात येते.

संदर्भ:  सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्ध’ आणि ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’
संपर्क क्र.: 9920015949

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content