गणपतीच्या दिवसात गिरगावात जाणे होतेच! कारण सर्व आयुष्य गिरगांवात गेले. अख्खं तारुण्य गिरगावात गेलं. मध्यमवयीन होईतोर्यन्त गिरगावशी नातं घट्ट होतं. त्यानंतर दोन्ही उनगरात संक्रमण केलं. परंतु गणपतीत गिरगावची वारी कधी चुकवली नाही. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून गिरगावात जाणं बरंच जिकरीचं झालं आहे. याला कारण अर्थात मेट्रोचं रेंगाळलेलं काम आणि त्यामुळे रया गेलेले गिरगाव मुळीच बघवत नव्हते. बघवत नव्हते हे ठीकच म्हणावे. कारण बघण्यापेक्षा आता गाडीत बसा किंवा पायी चाला, तुम्हाला चालताच येणार नाही अशी दयनीय परिस्थिती सर्वच यंत्रणांनी करून ठेवलेली आहे आणि कधी नव्हे इतका गिरगावकर त्याकडे हताश नजरेने पाहत आहे.
चीड आणणारी गोष्ट म्हणजे सत्तारूढ राज्यकर्ते तसेच विरोधी पक्ष हाताची घडी घालून मूकपणे त्यांचे हताशपण पाहत आहे. (खरंतर हताशपणाची मजा घेत आहेत असंच म्हणावं लागेल.) खरं पाहता गिरगावकारांना लहानपणापासूनच त्रास काढायची सवय लागलेली असते. अगदी सकाळी उठल्यापासून त्याच्या त्रासाला सुरुवात होते. गेली तब्बल 75 वर्षे गिरगावात सकाळी जेमतेम एक तास पाणी येते. तेही तिसऱ्या व चवथ्या मजल्यावर चढतच नाही. मुंबई महापालिकेत कित्येक राजवटी झाल्या. अनेक नवीन रस्ते झाले, विकास नियमांत बदल घडवून गगनचुंबी इमारती झाल्या. उड्डाणंपूल आले. मोटार कंपन्यांनी आपल्या मोटारींची मॉडेल्स बदलली. इतकेच काय जगही बदलले, पण गिरगावातील पाणीसमस्या आहे तिथेच कटीवर हात घेऊन उभी आहे.
म्हणे आम्ही गिरगावकर. गिरगावकरांच्या समस्या सांगण्यासाठी थोडा विस्तार केला इतकेच. तर यावेळी गिरगावात प्रवेश करतानाच ‘आम्ही गिरगांवकरांच्या’ एका बॅनरने लक्ष वेधून घेतले. खरंतर हा बॅनर पाहून संताप झाला होता. कोण हा टिनपाट आम्ही गिरगावकर समस्त गिरगावकरांना बदलाचे महत्त्व पटवून देत आहे, तर त्या बॅनरवर कुणाचे नाव नाही. प्रकाशकाचे नाव नाही. या अनौरस बॅनरचे प्रयोजन काय हेच ध्यानात येत नव्हते. अखेर यातही संदेश दडला असल्याचे समजते. तसे ते उघडच होते. मेट्रोचे काम लांबले आहे. त्रासाबद्दल क्षमस्व असे यंत्रणाना म्हणायचे आहे. परंतु सरळ सांगता येत नाही म्हणून कुठल्यातरी सेवाभावी संस्थेला हाताशी धरून हा बॅनर लावल्याचे गिरगावकरांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून गिरगावकरांनी बदलच पाहिलेले आहेत आणि या भल्याबुऱ्या बदलाचे स्वागतच केलेले आहे. ‘बदल घडवावा लागतो’ असे हा टिकोजीराव कोण सांगणारा?
“जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा…
कंबर मोडूनी चाटीत तारा” (मर्ढेकर)
यात कंबर मोडते हे मात्र शंभर टक्के खरं आहे. कारण प्रिन्सेस स्ट्रीटपासून गिरगावात प्रवेश केल्यापासून धड चालताही येत नाही आणि गाडीही नीट चालवता येत नाही अशी जमिनी परिस्थिती आहे. आणि सामान्य माणूस जेव्हा या रस्त्याने जातो तेव्हा त्याच्या पुढेमागे ‘सायरन’च्या गाड्या नसतात तसेच त्यांना कुणी रस्ता मोकळाही करून देत नाही. ठाकुरद्वारच्या पुढे तर परिस्थिती याहून कठीण आहे. कारण तेथे तर मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेला भाग बाईक्स आणि स्क्कूटरनी अडवलेला असतो.
याहीपेक्षा प्रार्थनासमाज नाका व सिक्कानगरचा परिसर तर किचकट झालेला आहे. कारण रस्त्यांची रुंदी न वाढवता जुन्या इमारतींचे पुनर्वसन झाल्याने ना धड विकास ना धड पुनर्वसन, असा सर्व प्रकार आहे. त्यातच अनेक बिल्डर्सनी जुन्या इमारतींचा विकास करताना नियमांना पायदळी तुडवून जुन्या रहिवाशांना एका इमारतीत कोंबले आहे. तेथे धड शरीर हलवायलाही जागा नाही. (खरंतर येथे कोकणी शब्द फिट आहे.) गाड्या पार्किंगची सोय जुन्या रहिवाशांना नाही. मात्र नवीन, बहुमजली इमारतीत मात्र पार्किंगची चकाचक सोय, मोकळी जागा सोडलेली असा दुजाभाव जागोजागी दिसत होता.
काहीजण परधार्मियांची गर्दी वाढल्याची हाकाटी करत आहेत. मात्र गिरगावात आजच्या घडीला परप्रांतीयांची गर्दी अतोनात वाढलेली आहे हे खरे. गर्दीही वाढली आहे आणि दादागिरीही.. गिरगाव आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराने आतापर्यंत सर्वच जाती व धार्मियांना सामावून घेतलेले आहे. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका व नंतर लगेचच मुंबई महापालिकेची निवडणूक आलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांसमोर गाजरे फेकणारच! पण मतदारांनी जागरूक राहवे इतकेच सांगणे. एकमात्र नक्की करा. या भंपक ‘आम्ही गिरगावकरांना’ लांब ठेवा. न जाणो हीच मंडळी महिलांवरील अत्याचाराबाबतही समाजच ‘कमांध’ झाला आहे. सरकार काय करणार, असाही बॅनर लावतील…
गिरगावची सांप्रत अवस्था ही प्रातिनिधिक आहे. संपूर्ण मुंबईची अशीच दूरावस्था आहे. मूळ मुंबईकरांनी बहुसंख्येने स्वतः मधे बदल घडवून परप्रांतीयांचा अतिक्रमणाचा, दादागिरीचा गुणधर्म अंगी बाणवून तसेच मध्यमवर्गीय लाज सोडून तसे आचरण नाईलाजाने करण्याशिवाय तरणोपाय नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही, कारण public memory is short.