भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या मागणीनुसार तिला प्ररिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक द्यायचे की नाही यावर पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे आज दुपारी दीड वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात फायनलमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यानंतर विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील करत आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी केली आहे. रौप्यपदकाच्या सामन्यापर्यंत प्रत्येक सामन्यात आपले वजन
निर्धारीत वजनापेक्षा जास्त नव्हते. त्यामुळे आपण फायनलमध्ये मिळवलेले स्थान वैध आहे. हे लक्षात घेता आपल्याला फक्त फायनलसाठी अपात्र ठरविण्यात यावे आणि आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक देण्यात यावे, अशी मागणी विनेशने केली आहे. यावर आज सुनावणी अपेक्षित असून तिला रौप्यपदक मिळणार का, याकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे विनेशची बाजू लवादापुढे मांडणार असल्याचे कळते.
अपात्र ठरविली गेल्यानंतर विषण्ण मानसिकतेतच विनेश फोगटने काल कुस्तीला रामराम करत आंतरराष्ट्रीय कुस्तीतून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. एक्सवर ट्विट करत तिने ही घोषणा केली. आईला उद्देश्यून केलेल्या ट्विटमध्ये तिने कुस्ती जिंकली, मी हरले.. असे म्हटले आहे.
Bad luck. Let us hope for the best!