इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. किरकोळ लोकांच्या समोरसुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायची म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो. पण मत गादीला देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते. शशिकांत शिंदे कष्टकरी कुटुंबातले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील. हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात, मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारवाई केली गेली. त्यांना धडा शिकवण्याची ताकद सातारकरांमध्ये आहे, असे ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले गेले, त्यांच्या सासऱ्यांची हत्त्या करण्यात आली. यात ११ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रियांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.
देशातील शेतकरीवर्ग आज अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरायची असते. सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. १० वर्षांपूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षांत त्यांनी शेतीसाठी काय केलं? आज देशातील शेती संकटात आली आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पंजाबचा शेतकरी बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले. पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही, असेही शरद पवार म्हणाले.

