संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संगीत दिन साजरा करत आहे. असे असताना, मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड राज्याची जीवंत संगीत शैली जगाला दाखवत आहे. कलात्मक संरक्षणाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या ग्वाल्हेर शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कने (यूसीसीएन) क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक म्हणून नुकतेच घोषित केले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विकासात ग्वाल्हेरचे मोठे योगदान अधोरेखित करणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
ग्वाल्हेरचे सिंधिया शासक महाराजा श्रीमंत दौलतराव सिंधिया यांनी १८२५मध्ये हिंदू स्थापत्य शैलीत बांधलेला ग्वाल्हेरचा मोतीमहल किंवा मोती पॅलेस ही ग्वाल्हेरच्या इतिहासातील प्रमुख वास्तूंपैकी एक आहे.मध्य प्रदेश पर्यटन मंडळ या वारसास्थळाचे रूपांतर संगीत संग्रहालयात करण्यासाठी प्रयत्नशील आहे जेथे ग्वाल्हेरच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. या प्रकल्पाचे रूपांतर ग्वाल्हेरमधील सर्वाधिक भेट दिलेल्या सार्वजनिक जागेत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाने संगीत संग्रहालयासाठी अनुदान मंजूर केले आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने संगीत संग्रहालयासाठी पाठविलेल्या प्रस्तावांना संग्रहालय अनुदान योजनेंतर्गत तज्ज्ञ समितीने शिफारस केलेल्या आर्थिक मदतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. म्युझियममध्ये संगीत आणि कलाप्रेमींसाठी प्राचीन वाद्ये प्रदर्शित केली जाणार आहेत.
मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रधान सचिव आणि मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशेखर शुक्ला म्हणाले की, ग्वाल्हेरला युनेस्कोक्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिकचा दर्जा मिळणे हा मध्य प्रदेशच्या समृद्ध संगीत वारशाचा पुरावा आहे. संगीत प्रेमींसाठी मध्य प्रदेशात प्रवासाचा अनोखा अनुभव आहे. ग्वाल्हेर तानसेनच्या वारशाला वाहिलेल्या तानसेन समारंभाच्या माध्यमातून आपला सांगीतिक वारसा साजरा करते. राजधानी भोपाळमध्ये लोकरंग महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात राज्याच्या वैविध्यपूर्ण लोक आणि आदिवासी संगीताचे दर्शन घडते.