संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटना / जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सने सध्या सुरू असलेल्या कामांवर नियुक्त केलेल्या अस्थायी कामगारांसाठी (CPLs) समूह (मुदत) विमा योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत कामगाराचा विमा म्हणून हमी असलेली 10 लाख रुपयांची रक्कम, अस्थायी कामगाराचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला / वारसाला दिली जाईल.
धोकादायक प्रकल्पस्थळ, विपरित हवामान, दुर्गम भाग आणि व्यवसायसंबंधित आरोग्यविषयक जोखमी आणि त्यांच्या कामादरम्यान होणारे / नोंद होणारे मृत्यू विचारात घेऊन या सीपीएलसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून देण्यात येणाऱ्या विमा छत्रामुळे त्यांचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. देशाच्या दुर्गम आणि अतिदूरवर असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या सीपीएलसाठी ही योजना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपाययोजना म्हणून काम करेल. त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी ही योजना दीर्घ काळ उपयुक्त ठरेल. अलीकडेच संरक्षणमंत्र्यांनी सीपीएलच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी दिली होती, ही बाब विचारात घेतली पाहिजे. यामध्ये खालील उपाययोजनांचा समावेश होता.
- अटेंडंटच्या पार्थिवाचे जतन आणि वाहतुकीचा आणि प्रवासाचा भत्ता.
- अंत्यसंस्कारासाठी मदतीच्या रकमेत रु.1000 वरून रु. 10,000 इतकी वाढ.
- मृत्यू झाल्यास तातडीची मदत म्हणून रु. 50,000 इतकी सानुग्रह भरपाई.