Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींच्या हस्ते...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज गोरेगाव-मुलुंड जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. तेथे संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा)अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर; मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित असतील.

मुंबई महापालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळ्या बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

जुळा बोगदा प्रकल्पाविषयी थोडेसे..

• गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा. 

• जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर. 

• हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात असेल. 

• प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील.

• सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम.

• बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रणकक्ष आदी सुविधांचा समावेश. 

• पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था. 

• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार.

• प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही. 

• प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती. 

• कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणार. 

• मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार. 

• जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च- ६३०१ कोटी रुपये.

• जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी- ऑक्टोबर २०२८पर्यंत. 

• प्रकल्पाची सद्यस्थिती: एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर. 

• बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाविषयी-

• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित. 

• प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर. 

• संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च.

• पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे (आरओबी) रुंदीकरण. 

• दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण. 

• टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम.

• टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (३ बाय ३) असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा. 

•  चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाकापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भुयारी मार्ग (व्हीयूपी) या कामांचा समावेश.  

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे फायदे-

• गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा.

•  या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे वाहतूककोंडीपासून दिलासा. 

• या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.   

• नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा.

• जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल.

• गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल.

• इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होईल.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content