Friday, February 14, 2025
Homeकल्चर +पु. ल. कला...

पु. ल. कला महोत्सवाला शानदार सुरूवात!

महाराष्ट्र हा सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना घेऊन आपण सांस्कृतिक धोरण तयार करत आहोत. त्याचबरोबर पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधान सचिव खारगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, मिलिंद रायकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण यावेळी उपस्थित होते.

पु. ल.

दिनांक ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत या महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होणार आहेत. रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. या माध्यमातून नव्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम होत आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी संचार केला. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या अकादमीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सातत्याने सुरू राहतील, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक चळवळीला हातभार लावण्याची भूमिका विभाग बजावत असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ कवी म्हात्रे म्हणाले की, साहित्य पर्यावरणात कवितांचा बोलबाला असतो. यावेळी त्यांनी  पु.ल. यांच्यासह मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य, ग्रेस यासह अनेक कवी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या साहित्य रसिकांवर गारूड केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक श्रीमती जोगळेकर म्हणाल्या की,  गेल्या १३ वर्षापासून हा कला महोत्सव सातत्याने सुरू आहे. बहुआयामी .पुल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी हा महोत्सव आहे. दिग्गज आणि नवोदित कलाकार यांची कला या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशेष मुलांनी तयार केलेल्या भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. त्यालाही रसिकांनी छान प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तरा मोने यांनी केले तर आभार स्नेहल शिंदे यांनी मानले.

गुरुवार, दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या ‘शतदीप उजळले’ या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरेल पहाट सजली. त्यासोबतच संध्या. ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांबाचे नेत्रदीपक सादरीकरण केले. तर सायं. ७:३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, वाशी यांच्यावतीने कलांगण येथेच गायन, वादन व नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात ‘संगीत संध्या’ रंगणार आहे.

शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५:३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगीतिक भावबंध उलगडणारा ‘शोंगित शिल्पी पी. एल. बाबू’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर होईल. यात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होणार असून जेष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यकमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत. सायं. ७:३० वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी ‘पु. ल. एक आनंदस्वर’ या पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित कार्यक्रमाद्वारे रसिकांची संध्याकाळ सुरेल करणार आहेत.

शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं. ७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत.

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेचे कलाकार ‘संग्रहापलिकडचे पु. ल.’ हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. तद्नंतर उत्स्फूर्त, ठाणे यांचे कलाकार अभिवाचन, नाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून ‘स्त्री व्यक्तिरेखा…. पु. ल. यांच्या लेखनातल्या’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर करणार आहेत.

विक्रम संवत्सर २०८०च्या प्रतिपदेला अर्थात मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव – दीपावली पहाट’ कलांगण येथे रंगणार आहे.

तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, ‘फुलवा मधुर बहार’ हे संगीत बालनाट्य कलांगण, मुंबई ही संस्था सादर करणार आहे.

सायं. ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहात, भारतीय मूर्तीकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ‘भगवती’ हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा  कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत.

पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे होणार आहे.

‘पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Continue reading

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...

जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या राहणार बेस्टच्या ३ कालबाह्य डबलडेकर!

मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍ता दुभाजकाचे संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्‍वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावी, एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत,...
Skip to content