Friday, September 20, 2024
Homeकल्चर +गणेशोत्सव जपानमधला...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला जातो. पण यंदा शनिवार-रविवारला जोडून सोमवारीही सु‌ट्टी असल्याने सर्वच आनंदले होते. यामुळे यावर्षी गणेशोत्सव अधिक जोरदार साजरा करण्याचे आराखडे आखले गेले.

योकोहामा मंडळाच्या परंपरेप्रमाणे मागील ३ वर्षांचा उपक्रम म्हणजे, गणपती स्थापनेपूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जपानमध्ये आपल्या मुला-मुलींकडे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन, महिलांना शाल व पुरुषांना मंडळाचा कुर्ता देऊन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले व कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी आशीर्वाद घेतले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे १-२ आठवडे अगोदर मुलांसाठी अनेक सांघिक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धिक उपक्रमात १२ वर्षांवरील मुलांसाठी Sustainable Development Goal activityचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलांना आपल्या वसुंधरेची काळजी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या सांघिक विकासातही भर पडावी म्हणून विविध विषयांवर ३० मिनिटांत जाहिरात कशी असावी हे सादर करायला शिकवले. तर १२ वर्षांखालील मुलांना इकोफ्रेंडली वाढदिवस कसा असावा ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

पहिला दिवस, शनिवार सकाळी ९.३० वाजता योकोहामा शहरातील किरीगाओका परिसर ढोल-ताशा, झांज, लेझीम आणि ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने दुमदुमला. भगवे झेंडे नाचवत, सुंदर सजवलेल्या पालखीतून बाप्पाची दोन तासांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आले होते. एवढेच नव्हे, तर जपानी नागरिकांचा उत्साह आणि कुतूहलही वाखाणण्याजोगे होते. प्रथेप्रमाणे पुरुष कार्यकर्त्यांनी एकसारखा पोशाख आणि फेटा परिधान करून ‘एकीचं बळ’ हा सुविचार पुन्हा एकदा सिद्ध केला. हे कुर्ते खास भारतातून मागविण्यात आले. स्त्रियांनी नऊवारी साडी, नथ परिधान करून सुबक रांगोळ्या काढून, ओवाळून बाप्पाचे स्वागत केले.

विलास आर्टस्, घाटकोपर, मुंबई येथून आणण्यात आलेली कोरीव, सुंदर मूर्ती निरांजनातल्या ज्योतीच्या प्रकाशात अजू‌नच तेजस्वी दिसत होती. माथ्यावरच्या रणरणत्या उन्हाच्या झळांना बाप्पाच्या आशीर्वादाच्या हातांनी पुरते झुगारून लावले होते. मुख्य म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी जपानमधील सर्व कडक नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे दणक्यात स्वागत केले. योकोहामा मंडळातर्फे साकारण्यात आलेला सुंदर व भव्य देखावा म्हणजेच… राममंदिर. अयोध्येत स्थापना झालेल्या राममंदिराची प्रतिकृती, रामायणातील प्रसंगांचा हलता देखावा आणि कारंजे यंदाचे विशेष आकर्षण ठरले.

हॉलमध्ये लावलेल्या पताका, झेंडूच्या माळा, विविध प्रकारचे नैवेद्य, धूप-उदबत्तीच्या सुगंधाने  चैतन्यमय झालेल्या वातावरणाने मनात एकच विचार येत होता.

स्वर्गातही जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या सानिध्यात आहे

संकटे कितीही असू दे बाप्पा

तुझ्या नामातच त्याचं समाधान आहे

बाप्पा तुझा हात सदैव आमुच्या शिरी असू दे

तुझी साथ जन्मोजन्मी आम्हा मिळू दे

पहिल्या दिवशी दुपारी सामूहिक आरतीच्या गजरात श्री गणेशाची स्थापना झाली. गणेश स्थापनेनंतर दुपारी स्त्री-पुरुषांच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले.

दुसऱ्या दिवशी मंडळाने सामूहिक प्रसाद भोजन म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन केले होते. श्रीगणेशाच्या कृपेने एकूण ८५० भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मंडळाचे ६०-७० कार्यकर्ते पहाटेपासून दुसऱ्या हॉलमध्ये महाप्रसादाच्या तयारीला लागले होते. कामांची वाटणी करून आपापले काम चोख करण्यात व चविष्ट प्रसाद करण्यात कार्यकर्ते गुंतले होते. महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी तोक्योमधील गणेशभक्तांनी आणि जापानी मित्रांनीही हजेरी लावली. त्याचवेळेस श्री गणेशासमोर मुलांसाठी श्लोक व स्तोत्रपठण, पौराणिक प्रश्नमंजुषा, बोधकथा सादर केल्या गेल्या. लहान मित्र-मैत्रिणींकडून श्रीगणपतीची आरती करण्यात आली.

महाप्रसादानंतर दुपारी गणेश विसर्जनाच्या आधीची सामूहिक महाआरती करण्यात आली. बाप्पाच्या स्वागताची आरती आणि निरोपाआधीची आरती…. किती फरक असतो ना दोन्हीत…. जड अंतःकरणाने पुनःपुन्हा बाप्पापुढे हात जोडत, बाप्पाचे फोटो काढत प्रत्येकजण बाप्पाला निरोप द्यायचा प्रयत्न करत होता. ३-४ महिने सुरू असलेली लगबग, धावपळ… काही क्षणात संपुष्टात येणार होती… प्रत्येक लहानग्यांच्या ओठांवर एकचं गाणं होतं… बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला, पुढल्या वर्षी यायचं तर जायचं कशाला…. खरंच होतं ते. बाप्पाला कितीही नावं असली तरीही आपल्यासाठी तो फक्त आपला बाप्पा असतो… फक्त आपला बाप्पा… जो पुढल्या वर्षी लवकर येणार याची खात्री असूनही ज्याला निरोप देताना पापण्या ओलावतात… असा आपला बाप्पा…

महाआरतीनंतर पुन्हा एकदा श्रींना पालखीत विराजमान करून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. प्रसाद म्हणून मिळालेला लाडू अजूनही हातात तसाच होता… कसा गोड लागणार होता तो बाप्पाशिवाय… बाप्पा त्याच्या गावाला परत गेल्यावर कशी बरं चैन पडणार होती…

जपानी नियमाप्रमाणे रात्री जागून कार्यकर्त्यांनी हॉलवर साफसफाई करून हॉल बंद केला. तोपर्यंत रात्रीचे १०-११ वाजून गेले. पहाटे ५ वाजता एकमेकांशी गप्पागोष्टी करता करता काम करणारे कार्यकर्ते आता मात्र एकदम शांत शांत वाटत होते…

तिसरा दिवस उजाडला, सर्वजण परत नवीन उत्साहाने संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले. पूर्वनियोजन असल्यामुळे जवळीलच भव्य सभागृहात व्यासपीठ उपलब्ध झाले होते. विविध कलागुणांचे प्रदर्शन, गायन, नृत्य, वादन, नाटिका अशा कार्यक्रमातही लहान-थोर सर्व उत्साहाने सहभागी झाले होते. भारतीय पोषाखात सर्वजण उठून दिसत होते. उत्तम साद‌रीकरणासाठी, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योकोहामा मंडळाचे कार्यकर्ते दिवस-रात्र उभे होते.

सभागृहाच्या काळोखातही उपस्थितांच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद स्पष्ट दिसत होताच, पण त्याहूनही अधिक तीन दिवसांचा बाप्पाचा आनंदोत्सव संपणार ह्याची हुरहुर दिसत होती. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती-

आस लागली तुझ्या दर्शनाची।

पुन्हा तुला डोळे भरून पाहण्याची।।

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट।

गणराया तुझ्या आगमनाची।।

योकोहामा मंडळ, जपानyokohamamarathimandal@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...
error: Content is protected !!
Skip to content