संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाचवेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार, घराघरात पाईप गॅसची जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी असा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केले.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात एक कोटी महिलांचे आयुष्य लखपती दीदी योजनेतून उजळले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तेव्हा देशातील तीन कोटी महिला लखपती दीदी बनतील हा आमचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते.

बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करणारी काँग्रेस आज बाबासाहेबांच्या नावाने मते मागत घराघरात फिरत आहे. पण याच काँग्रेसने पाच दशके सत्तेवर असूनही बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, त्यांचा सातत्याने अपमान केला. भाजपा सरकारने बाबासाहेबांशी संबंधित असलेल्या पाचही ठिकाणांना पावित्र्य देऊन युगानुयुगांचे अमरत्व दिले आहे, असे ते म्हणाले.
भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण संपुष्टात आणणार असा संभ्रम जनतेमध्ये काँग्रेसकडून पसरविला जात आहे. आमच्याकडे बहुमत आहे. पण आम्ही बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटविण्यासाठी केला नाही. पण कलम 370, तिहेरी तलाक हटविण्यासाठी निश्चितच केला. जोपर्यंत भाजपा सत्तेवर आहे, तोवर आरक्षण रद्द करणार नाही आणि रद्द करू दिले जाणार नाही, ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे, असे शाह म्हणाले.

70 वर्षात काँग्रेसने कलम 370ला अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून ठेवले. 5 ऑगस्ट 2019ला मोदींनी हे कलम हटवून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत ठेवला. मोदींनी राम मंदिराचा संकल्प पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर बाबा विश्वनाथ कॉरिडॉर, बद्रीनाथ-केदारनाथची नूतन नगरी, सोमनाथ मंदिराला सोन्याची झळाळी, गुजरातेतील शक्तिपीठाची 400 वर्षांनंतर पुनर्स्थापना करून नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचा प्रत्येक सांस्कृतिक मानबिंदू पुनरुज्जीवित केला, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी कधीच वाचन करत नाहीत. आता पुन्हा ते गरीबी हटविण्याची घोषणा करत आहेत. हीच घोषणा इंदिराजींनी केली. त्या गेल्या, राजीव गांधी गेले, सोनियाजींनी काहीही केले नाही. पण नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत देशातील 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. 80 कोटी लोकांना पाच वर्षे मोफत धान्य देऊन त्यांचे जीवन सुरक्षित केले, असेही शाह म्हणाले.