Homeपब्लिक फिगरगेली ५ वर्षे...

गेली ५ वर्षे तो फक्त शूटिंगला गेला..

मागील खासदारामुळे पाच वर्षे वाया गेली. तो फक्त शूटिंगला गेला. मतदारसंघातील रस्ते, धरणे, रेल्वे असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला केंद्राची, राज्याची मदत लागणार आहे. त्यामुळे काम करणारा माणूस म्हणून आढळराव पाटलांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केले.

महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घोडेगाव येथे आयोजित प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, जिल्हा पदाधिकारी भानुदास काळे, तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले, उपाध्यक्ष राजेश काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, युवक अध्यक्ष निलेश थोरात, पंचायत समिती माजी सभापती कैलासबुवा काळे, नंदकुमार सोनवले, बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच अश्विनी तिटकारे, माजी सरपंच क्रांती गाढवे,उपसरपंच कपील सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही. आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कांदा निर्यातबंदी उठविण्याचा प्रश्न आम्ही सर्वांनी एकत्रित असल्याने मार्गी लावला. दुधाच्या दरवाढीचा प्रश्न आता सुटेल. सत्तेत राहिलो तर विकासकामे मार्गी लागणार आहेत, हे पक्कं ध्यानात ठेवा आणि आढळरावांना निवडून द्या, असेही अजितदादा म्हणाले.

खेड आंबेगावची कामे मार्गी लावणार..

कळमोडी धरण, चासकमान धरणांचे प्रलंबित प्रश्न अल्पसंख्यांकांचे वक्क बोर्डाचे प्रश्न, हरिश्चंद्र देवस्थानचा विकास, पीर देवस्थानचा विकास अशी विविध कामे मार्गी लावायची आहेत. हे सर्व करण्यासाठी दिलीप वळसे पाटील, आढळराव हे आहेतच. त्यांना निधी देण्याचं काम आम्ही करणार. कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, समोरचा उमेदवार म्हणतो बैलगाड्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न मी मार्गी लावला. मधु दंडवतेंना कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणायला २८ वर्षे लागली. मी पुणे-नाशिक रेल्वेसाठी १३ वर्षे पाठपुरावा करतोय. बैलगाडा सुरु करण्यासाठी २५ ते ३० वर्षे मी लढतोय. ३ केसेस अंगावर घेतल्या. हायकोर्ट सुप्रिम कोर्टांपर्यंत लढलो. पैसे खर्च केले आणि बैलगाड्याचा लढा जिंकला. समोरच्या महाभागाने पाच वर्षे काय केले?,

बनकरफाटा-घोडेगाव-भिमाशंकर-तळेघर-राजगुरुनगर या रस्त्याचा प्रश्न नितीन गडकरींच्या माध्यमातून मार्गस्थ केला. वाडा घोडा रस्त्याला अडीच कोटी निधी दिला. संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाचं १९० कोटींतून काम सुरु झालं. कोल्हे खासदार असताना त्यांनी त्यांच्या कोपरे दत्तक गावाला पाने पुसली. तेथील महिलांना २ ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, माझ्या संस्था आणि कार्यकर्त्यांकडून २ महिन्यापासून टॅंकर सुरु आहेत. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणाऱ्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवा. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content