मुंबईतल्या अभिनेत्री गौहर खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘के पश्चिम’ विभागाअंतर्गत ओशिवरा परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री गौहर खान यांच्यावर कोविडविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री गौहर खान यांना कोविडची बाधा झालेली असतानाही त्या सार्वजनिक परिसरांमध्ये वावरल्या, एवढेच नव्हे तर त्यांनी चित्रिकरणांमध्येही भाग घेतला. परिणामी कोविड संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविडविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
कोविडविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. तरी व्यापक हिताच्या दृष्टीने कोविडविषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
विविध कलमांखाली अभिनेत्री गौहर खानविरूद्ध गुन्हा दाखल
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गौहर खानविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री गौहर खानला ११ मार्चलाच झाला कोविड
या अभिनेत्री गौहर खानच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच कोविडने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात त्या कोविडबाधित आढळून आल्या होत्या. सदर पोलीस तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार अभिनेत्री गौहर खान यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. ज्यानुसार त्यांना कोविड बाधा झाली असल्याचे दि. ११ मार्च २०२१ रोजी निष्पन्न झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहणे बंधनकारक असताना, नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला असल्याचे समजले.
अभिनेत्री गौहर खानच्या हातावर मारला शिक्का
या अनुषंगाने के पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी दि. १४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा गौहर खान यांच्या घरी गेले असता वारंवार विनंती करूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासही त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर परिसरातील एका समाजसेवकांच्या मदतीने त्यांना विनंती केला केली असता, त्यांनी दरवाजा उघडला. ज्यानंतर विलगीकरणाचा शिक्का त्यांच्या हातावर नियमानुसार उमटविण्यात आला.
बाधा असूनही अभिनेत्री गौहर खानने केले चित्रिकरण
कोविडची बाधा असूनही सार्वजनिक परिसरांमध्ये वावरणे, चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये सहभाग घेणे आणि परिणामी इतर लोकांना कोविड संसर्ग होऊ शकेल व कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकेल असे कृत्य केल्यामुळे अभिनेत्री गौहर खान यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांद्वारे त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अभिनेत्री गौहर खानच्या विषयावरून पुन्हा एकदा आवाहन
अभिनेत्री गौहर खानच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी कोविडविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक परिसरात वावरताना मास्क वापरावा, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे यासह कोविड बाधा झाली असल्यास विलगीकरणविषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

