Homeचिट चॅटपुराणिक चषकावर अखेर...

पुराणिक चषकावर अखेर ‘वेंगसरकर’चे नाव!

पूनम राऊत आणि श्वेता कलपाथी यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह दुसर्‍या विकेटसाठी केलेली ८२ धावांची भागिदारी आणि रेशमा नायकने २२ धावांत टिपलेल्या ३ विकेटस् या कामगिरीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने राजावाडी क्रिकेट क्लबचे जेतेपद राखण्याचे स्वप्न १८ धावांनी धुळीस मिळवले आणि प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरले. गेल्या वर्षी प्रथमच झालेल्या या स्पर्धेत राजावाडीने स्पोर्टस् फिल्डचा पराभव करत बाजी मारली होती.

माहिम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ महिला क्रिकेटला प्रोत्साहन आणि त्यांच्या खेळाला मानाचा मुजरा करण्यासाठी आयोजित केलेली टी-२० क्रिकेट स्पर्धा संस्मरणीय ठरली. महिला खेळाडूंची फटकेबाजी आणि विजयासाठी केलेला थरारक संघर्ष पाहाण्याची मेजवानी मुंबईकरांना लाभली. स्पर्धेच्या साखळी सामन्यांप्रमाणे अंतिम सामनाही जोरदार झाला.

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या १५४ धावांचा पाठलाग करताना वृषाली भगतच्या ५६ धावांची झुंजार खेळीने सामन्यात चुरस आणली. रेश्मा नायकने  किमया राणे (०) आणि सलोनी कुष्टे (११) यांनी बाद करून सनसनाटी निर्माण केली. पण वृषालीने एकहाती किल्ला लढवताना तुशी शाहबरोबर ३५, शेरल रोझारियोबरोबर ३९ आणि निविया आंब्रेबरोबर ३० धावांची भागी करत संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. पण तो अपुरा ठरला. ४५ चेंडूंत ५६ धावांची संघर्षपूर्ण खेळी करून वृषाली बाद होताच वेंगसरकरचा विजय निश्चित झाला. राजावाडीला २० षटकांत ९ बाद १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. रेश्मा नायकने २२ धावांत ३ तर पूनम राऊतने २२ धावांत २ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी पूनम राऊतने फलंदाजीतही आपली चमक दाखवताना ४४ चेंडूंत ५३ धावा काढल्या होत्या. श्वेता कलपथीसह दुसर्‍या विकेटसाठी ८२ धावांची भागी रचताना संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. श्वेतानेही ५३ धावा काढल्या. तसेच पूनमने सिमरन शेखबरोबरही ३७ धावांची भागी करत संघाला दीडशेसमीप नेले. सिमरनने १५ चेंडूंत २६ धावा चोपल्या. त्यामुळेच वेंगसरकर फाऊंडेशन १५४ धावांचे लक्ष्य उभारू शकला होता. ५३ धावा आणि ३ विकेट टिपणारी पूनम राऊत संघाच्या विजयाची मानकरी ठरली.

क्षमा पाटेकर ठरली सर्वोत्तम खेळाडू

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार भारत क्रिकेट क्लबच्या केतकी धुरेला मिळाला तर वेंगसरकर फाऊंडेशनची निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज ठरली. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणार्‍या राजावाडीच्या क्षमा पाटेकरने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविला. महिला संघांचे कौतुक करण्यासाठी हिंदुस्थानी संघाचे माजी कसोटीपटू बलविंदरसिंग संधू, अभिषेक नायर आवर्जुन उपस्थित होते. तसेच माहिम ज्युवेनाईलचे अध्यक्ष विजय येवलेकर, सचिव सुनील पाटील, कोषाध्यक्ष महेश शेट्ये, शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन यांच्या उपस्थितीत विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: २० षटकात ४ बाद १५३ (पूनम राऊत ५३, श्वेता कलपाथी ५३, सिमरन शेख  २६; क्षमा पाटेकर ३०/२, कोमल परब १७/१)

राजावाडी क्रिकेट क्लब: २० षटकात ९ बाद १३५ (वृषाली भगत ५६, तुशी शाह १९; रेशमा नायक २२/३, पूनम राऊत २२/२)

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content