Homeमाय व्हॉईसअंतिम निर्णय राजसाहेबांचा!...

अंतिम निर्णय राजसाहेबांचा! मग दुसरी फळी हवी तरी कशाला?

दि. ९ मार्च २०२६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे)चा २०वा वर्धापनदिन. या दिवशी  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळीच रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन मनसेच्या सदस्यनोंदणीला त्यांनी प्रारंभ केला. राज यांच्या पत्नी शर्मिलाही याप्रसंगी उपस्थित होत्या. महाराष्ट्राला हेवा वाटणारा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात यावा, अशी  त्यांनी मनीषा व्यक्त केली. राज यांनी स्वत: पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. मी महाराष्ट्र धर्माचे स्वाभिमानाने पालन करीन, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटना, नियम, ध्येयधोरणे, शिस्त यांचे पालन करून पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे वचन देत आहे. मी पक्षाचे विचार समाजापर्यंत प्रत्यक्ष संपर्काव्दारे अथवा समाजमाध्यमांव्दारे पोहोचवण्याकरीता प्रयत्नशील राहीन. सन २०२६-२८ या दोन वर्षांकरीता मला पक्षाचे प्राथिमिक सदस्यत्व मिळावे, ही विनंती करीत आहे… असा मजकूर या अर्जावर आहे.  या अर्जावर विचार महाराष्ट्राचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा, असे घोषवाक्य लिहिलेले आहे.

वीस वर्षांपूर्वी १९ मार्चला दादरच्या शिवतीर्थावर मनसेची पहिली सभा झाली. यंदा १९ मार्चला गुढीपाडवा आहे, आजही मनसेची जाहीर सभा होणार आहे. एका राजकीय पक्षाचा दोन दशकांचा कालवधी, हा कमी नाही आणि फार मोठाही नाही. या काळात मनसे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरातच मर्यादित राहिला. मनसेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांना सारा महाराष्ट्र ओळखतो. राज यांच्याकडे वीस वर्षांनंतरही करिष्मा आहे, सभांना सर्वाधिक गर्दी खेचणारा व आपल्या भारदस्त व आक्रमक शैलीने गर्दीला खिळवून ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र, नाशिक महापालिकेचा एक विजय वगळता, राज्यात कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत मनसेला सत्ता स्थापन करता आली नाही किंवा सत्तेच्या जवळपास जाता आले नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी लढणारी संघटना म्हणजे मनसे हीच या पक्षाची वीस वर्षांची कमाई आहे. पण या कमाईतून महापालिका, नगर परिषदा किंवा विधानसभेत मनसेला अपेक्षित संख्याबळ साध्य करता आलेले नाही.

राज

राज ठाकरे यांच्या सभांना खचाखच विराट गर्दी होते, पण त्या गर्दीचे रूपांतर मतदानात होत नाही. म्हणूनच दोन दशकांनंतरही सर्वसामान्य लोकांचा व मतदारांचा मोठा विश्वास संपादन करणे मनसेपुढे मोठे आव्हान आहे. मराठी भाषा व मराठी माणूस यांच्या हितासाठी झटणारी संघटना म्हणून मनसेकडे बघितले जाते. पण महाराष्ट्रातील मराठी माणूस भाजपा, शिवसेना,  उबाठा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप व अप, वंचित बहुजन महासंघ अशा विविध पक्षांत विभाजित आहे. याचे भान ठेऊनच मनसेला भविष्यातील रणनिती आखावी लागणार आहे. विधानसभेत किंवा महापालिकेत मनसेला फारच कमी यश लाभलेले असले तरी राज ठाकरेंच्या सभा, मनसेची आंदोलने यांना सर्वाधिक प्रसिद्धी मीडियातून मिळते व सर्वभाषिक जनतेत त्याची चर्चा होते. असे भाग्य अन्य राजकीय पक्षांच्या वाट्याला येत नाही. शिवसेनेला रामराम करून राज ठाकरे हे दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. काँग्रेस किंवा भाजपामध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवली नाही. या दोन पक्षात जाऊन त्यांनी मंत्री, उपमुख्यमंत्री किवा मुख्यमंत्रीपदासाठी सौदेबाजी केली नाही. राज ठाकरे हा एकच नेता असावा की त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला व नवनिर्माण घडविण्याचे स्वप्न बघितले.

तेरा आमदार ते तेरा नगरसेवक हा प्रवास मनसेला मुळीच भूषणावह नाही. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे असे जाहिरपणे सांगून राज ठाकरे यांनी डिसेंबर २००५मध्ये अविभाजित शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि मार्च २००६मध्ये मराठी माणसाच्या हितासाठी मनसेची स्थापना केली. सुरूवातीला विधानसभेत मनसेने १३ आमदार निवडून आणले. नंतर नाशिक महापालिकेची सत्ताही मिळवली. मनसेची सुरूवात तर दणक्यात झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातून मनसेचे १३ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई हे मनसेचे प्रमुख कार्यक्षेत्र. पण मुंबईत त्यातले ६ जण  निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती केली, जागावाटप केले. ठाकरे ब्रँड म्हणून मोठा गवगवा झाला. मग मनसेची अशी अवस्था का झाली? मनसेची दुसरी फळी बाळा नांदगावकर, नितीश सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव अशी निवडक नावे चर्चेत असतात. पण अंतिम निर्णय राजसाहेब घेतील यापलिकडे त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य नसते. का?

राज

शिवसेनाप्रमुखांनी जातपात न बघता, नेते व उपनेत्यांची दमदार फळी उभी केली. तशी टीम मनसेमध्ये का उभी राहिली नाही? वसंत गीते, वसंत मोरे, शिशिर शिंदे, राम कदम, प्रवीण दरेकर, संतोष धुरी अशा अनेकांनी मनसेची साथ का सोडली? २००९च्या निवडणकीत हर्षवर्धन जाधव, उत्तमराव ढिकळे, नितीन भोसले, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, राम कदम, नितीन सरदेसाई, रमेश वांज‌ळे, रमेश पाटील, प्रकाश भोईर, वसंत गीते असे कार्यक्षम आमदार निवडून आले. नंतर वांजळे व ढिकळे यांचे निधन झाले. बाकीचे वेगवेगळ्या पक्षात सत्तेच्या परिघात गेले. सन २०१२मध्ये राज्यात मनसेचे १०७ नगरसेवक होते. आज १३ आहेत. मुंबई महापालिकेत तेव्हा मनसेचे २७ नगरसेवक होते. आज ६ आहेत. पुण्यातही मनसेने दहा-बारा वर्षांपूर्वी चांगला प्रभाव निर्माण केला होता. आज सारे पुणे भाजपाने काबिज केले आहे. का व कसे?

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ठाकरे बंधुंमध्ये कटुता होती. वीस वर्षे सलोख्याचे संबंध नव्हते. यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने व हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी निकालानंतर पुन्हा दोघांत तडे गेलेच. २०१३ मध्ये राज यांनी गुजरातचा दौरा करून मोदींना पाठिंबा दिला व त्यांच्या गुजरात मॉडेलचे कौतुक केले होते. २०१४मध्ये त्यांनी आपण स्वत: निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पण नंतर त्यांनी भूमिका मागे घेतली. २०१७मध्ये महापालिका निवडणुकीत उद्धव व राज एकमेकांना टाळी देणार, या विषयावर महिनाभर निव्वळ चर्चा झाली. नंतर उद्धव यांनी मनसेचे निवडून आलेले ७ नगरसेवक फोडले व शिवसेनेत घेतले. २०१३-२०१४मध्ये राज यांनी मोदींचे कौतुक केले व नंतर विरोधात प्रचार केला. २०१९मध्ये राज यांनी भाजपाला विरोध केला. मध्यंतरी त्यांनी अंगावर भगवी शाल पांघरून हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा बनवली. मशिदींवरील भोंग्यांना कठोर विरोध दर्शवला. २०२४मध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला व २०२६मध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उद्धवबरोबर एकाच मंचावर आले. मोदींचे कौतुक, मोदींना विरोध, लाव रे तो व्हि़डिओपासून ते देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंशी मैत्रीचे संबंध…, अशा बदलत्या भूमिकांनी लोक संभ्रमात राहिले.

मराठी भाषा गौरव दिन मनसेने अन्य कोणाहीपेक्षा धुमधडाक्यात साजरा केला. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या दिसतात त्या मनसेच्या दणक्यामुळेच. टोलविरोधी आंदोलनात सरकारची झोप उडवली व मुंबईच्या प्रवेशव्दारावरील टोल घेणे बंद झाले ते राजगर्जनेनेच. संख्याबळ नसताना मुंबईत व महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा कायम ठेवणारे राज व त्यांचा पक्ष मनसे यांना निवडणुकीच्या राजकारणात वारंवार अपयश का येते, याचे सखोल आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जमिनीवरील वास्तव समजावून घेण्यासाठी मनसैनिक व आम आदमीच्या भेटीसाठी राज यांना आपले दरवाजे रोज काही तास खुले ठेवण्याची नितांत गरजआहे. या पार्श्वभूमीवर आज शिवाजीपार्कवरच्या जाहीर मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका माडतात ते पाहायचे!

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्रातले विरोधी पक्ष देवाभाऊंच्या दावणीला?

‌‌महाराष्ट्रात गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. मुंबईसह सर्व लहानमोठ्या शहरांत व ग्रामीण भागात गॅस सिंलिंडरची प्रतिक्षायादी रोज वाढत आहे. दुसऱा सिलिंडर पंचवीस दिवसांनी नोंदवता येईल अशा सूचना असल्यातरी ग्रामीण भागात हीच अट ४५ दिवसांची आहे. वृत्तपत्रातून रिकामे...

फडणवीसांचे एका दगडात तीन पक्षी!

 राज्यसभेवर महाराष्ट्रातून झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते, ज्योती वाघमारे, पार्थ पवार आणि शरद पवार यांची पुढील सहा वर्षांकरीता खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली. गेली सात वर्षे संसदीय कारकिर्दीपासून दूर असलेल्या विनोद तावडेंना भाजपाने...

महाराष्ट्र मोजतोय दर मिनिटाला ९ कोटींचे व्याज!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७चा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. पण अजितदादांचे अर्थ खाते मुख्यमंत्र्यांनी त्यांना न देता स्वत:कडे ठेवले व...
Skip to content