सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला “फिल्मी कथा” हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील रमा) कवयित्री साहित्यिका लता गुठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात अशोक मुळ्ये यांनी पुस्तकाविषयी व प्रकाशन संस्थेविषयी रोचक माहिती उपस्थितांना दिली. रसिका धामणकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, प्रकाश गजानन राणे यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकला. कांचन अधिकारी यांनी आपल्या भाषणात, राणे यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविले. प्रकाश राणे, भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक असून, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सल्लागारदेखील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंगला खाडिलकर यांनी आपल्या भाषणात फिल्मी कथा, या पुस्तकावर प्रकाश टाकत, त्यातील काही कथांवर विवेचन केले. राणे यांच्या लेखनशैलीवर विस्तृत टिप्पणीही त्यांनी केले. राणे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्रथितयश निर्माती व निवेदिका, अक्षदा भालेकर-विचारे यांनी केले. लीना रेडकर यांनी स्वागतपर भाषण व आभार प्रदर्शन केले.
चित्रपटासाठी ज्या कथा लिहिल्या जातात, त्या संक्षिप्त स्वरूपात असतात आणि त्यांना वन लाईनर असे म्हणतात. ही वनलाईनर चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर, त्या वनलाईनरचा विस्तार होऊन, चित्रपटांची कथा तयार होते. थोडक्यात म्हणजे चित्रपटाचे कथा बीज आणि ठळक मुद्दे या वनलाईनरमध्ये असतात. वनलाईनर वाचून कथेचा सार व सारांश लक्षात येतो. अशा वनलाईनर चित्रपट निर्मात्यांना ऐकवायची प्रथा आहे. कुणी लेखक एका वेळेला दोन ते तीन वन लाईनर निर्मात्याला ऐकवू शकतो. अशा या कथांचे हे पुस्तक आहे.