Homeपब्लिक फिगरलॉकडाऊनमध्ये शेतकरी व...

लॉकडाऊनमध्ये शेतकरी व ग्राहकांची लूट!

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. परिणामी शेतकऱ्यांना आतापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर भयानक प्रमाणात वाढवले आहेत. भरमसाठ विजबिले भरणे अशक्य होत चालले आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन काळात भरडल्या गेलेल्या आदिवासी भागासाठी खावटी अनुदान मंजूर केले असले तरी ते अटीशर्तींच्या चक्रात फसले असून अद्याप कोणालाही याचा लाभ मिळालेला नाही. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी अजूनही अत्यंत असमाधानकारक आहे. उलट फॉरेस्ट खाते ठिकठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांना त्रास देत सुटले आहे.

केंद्र व राज्य सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधून ते धसास लावण्यासाठी येत्या १७ जून रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर मोर्चे काढत निदर्शने करण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. नवले म्हणाले.

आंदोलकांच्या मागण्या

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, आगामी काळात अशा प्रकारची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा कायदा करा, दूध व्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरींग व किमान हमी दर असे दुहेरी संरक्षण लागू करा.

खरीप हंगामाच्या तयारीसाठी राज्यभर सर्वत्र पुरेसे खत, दर्जेदार बियाणे, शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी विमा योजनेची सक्षम व पारदर्शक अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या काळात थकलेली वीजबिले विनाशर्त माफ करा, आदिवासी शेतकऱ्यांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, मात्र अद्यापही राज्यभरातील लाखो आदिवासी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान सर्व श्रमिक आदिवासींना तातडीने द्या.

वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वत्र चालना द्या, वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता, यांना लॉकडाउन काळात अतिरिक्त एक हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, या घोषणेची अंमलबजावणी करा व या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढवा, कोविड महामारीचे संकट अद्यापही संपलेले नसल्याने, सर्वत्र पुरेशा आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध करा आणि सर्वांचे मोफत व त्वरित लसीकरण करा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

येत्या १७ जून रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर कोविडची नियमावली पाळत करण्यात येत असणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content