आगामी महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यास भारतीय जनता पक्षाने (भाजप) सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हा आणि या जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत असताना आतापासूनच भाजपने महायुती म्हणून न लढता स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात असा आग्रह सुरू केला आहे. ठाणे महानगरपालिकेत आमदार संजय केळकर आणि नवी मुंबई महानगरपालिकेत वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. या आव्हानाचा सामना एकनाथ शिंदे आणि त्यांची सेना कसा करणार हा प्रश्न गहन आहे. एकनाथ शिंदे हे आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत असले तरी भाजपने मात्र त्यांना फारशी भीक घातलेली नाही. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्याशी परस्पर युती करून खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला डिवचले होते. त्यातूनच आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केला आहे. बदलापूर नगरपालिका आमदार किसन कथोरे यांच्या मतदारसंघात येते तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे या चारही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात कोंडी केली आहे.

मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेने जास्तीतजास्त जागा लढवल्याचा इतिहास आहे. मात्र स्वतःला मूळ शिवसेना समजणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यावेळी बॅकफूटवर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत 150पेक्षा कमी जागा न लढवण्याचा निर्णय मुंबई भाजपने घेतला आहे. तशी तयारी त्यांनी विधानसभेनंतरच सुरू केली आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेनेशी युती न करता भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपने 80च्या पुढे मजल मारली होती. आता शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे गेल्या वेळच्या निवडणुकांपेक्षा परिस्थिती खूपच चांगली आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आले असले तरी मुंबईतील अमराठी कनिष्ठ मध्यमवर्गीय हिंदू हा सपशेल भाजपसोबत आहे. यापूर्वी हा मतदार काँग्रेससोबत होता. किंबहुना काँग्रेसचा तारणहार होता. काल छठपूजेच्या निमित्ताने हे मुंबईकर जनतेच्या लक्षात आले आहे. खरे म्हणजे छठपूजेचे राजकीयकरण हे संजय निरुपम यांनी शिवसेनेत असताना केले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर छठपूजेला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला. परंतु आता हा बिहारी आणि झारखंडचा मतदार भाजपने काबीज केला आहे.
सोमवारी केंद्रीय गृहमंत्री मुंबईत होते. भाजपच्या चर्चगेट परिसरातील प्रस्तावित नवीन कार्यालयाचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मित्रपक्षालाही इशारा दिला आहे. महाराष्ट्र भाजप कुणाच्या कुबड्यांवर नाही तर स्वबळावर वाटचाल करतो आहे, असे वक्तव्य करून त्यांनी आपल्या मित्रपक्षांना आपल्या हिशेबात राहण्याचे संकेत दिले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन आले. परंतु पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना शुभेच्छा देऊन पक्ष चालत नाही. आज ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संघटना असताना तेथे भाजपवाले त्यांना दाबत आहेत. मात्र मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेकडे संघटना अजिबात नाही. नेतेमंडळी भरपूर आहेत. ज्या नेतेमंडळींचा कल फक्त शिंदे यांच्या आगेमागे फिरणे एवढाच असतो. मात्र संघटनेच्या नावाने सध्यातरी मुंबई शहर आणि उपनगरात शिंदे यांची शिवसेना शून्य आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे यांच्या मंत्र्यांची प्रकरणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे कोण पोहोचवत आहे याची कल्पना उपमुख्यमंत्री शिंदे यांना होती. मात्र त्यानंतर मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला कोणी बळ दिले त्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आली होती. त्याचे पुरावे त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांचे प्राईम लँडवरील एसआरए प्रकल्प आणि जुहूमधील 800 कोटी रुपयांचा भूखंड ही प्रकरणे वृत्तपत्रांपर्यंत कुणी पोहोचवली हेसुद्धा मुख्यमंत्र्यांना ज्ञात आहे. परंतु या दोन महत्त्वाच्या बातम्या वृत्तपत्रात येऊनही दोन्ही प्रकरणे थंड झाली. जनतेची मेमरीही अल्पकालीन असते. या प्रकरणावर विरोधी पक्षांनीही फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे आपोआप ही प्रकरणे थंड झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना फक्त व्होटचोरीचा मुद्दा विरोधी पक्ष हाताळत आहेत. नागरी प्रश्नांबाबत सत्ताधारी किंवा विरोधक कोणीच बोलत नाही. दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत, याकडे प्रमुख विरोधी पक्षांचे दुर्लक्षही सुरू आहे.
संपर्कः 9820355612

