Tuesday, April 1, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटनैराश्याच्या गर्तेतही सुखाची...

नैराश्याच्या गर्तेतही सुखाची स्वप्ने बघा.. ‘मरीपुडीयुम’!

लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असताना, फक्त सरकारी दूरदर्शन बघायला मिळायचं. रविवारी सकाळी “साप्ताहिकी”मध्ये आठवड्याचे सगळे कार्यक्रम सांगितले जायचे.(साप्ताहिकी सांगणारी अंजली मालणकर ही माझ्या कॉलेजमधल्या मित्राची म्हणजे सुमुख मालणकरची आई होती.) संपूर्ण आठवड्याचे कार्यक्रम जवळपास तोंडपाठ असायचे. युवदर्शन कधी आहे? छायागीत कधी आहे? फुल खिले है गुलशन गुलशन.. कधी आहे? हे माहीत असायचं. रविवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा न चुकता बघायचो. पण शनिवारी मात्र वेगवेगळ्या भारतीय भाषांमधले सिनेमा दाखवले जायचे. कधी मराठी, कधी तामिळ, कधी तेलगू तर कधी कन्नड. सिनेमा बघण्याचं वेड एवढं होतं की न कळणाऱ्या भाषेतला सिनेमासुद्धा पाहायचा, असा खाक्या झाला होता… आयुष्यात जेव्हा सगळं काही संपलेलं असतं, तेव्हा त्या नैराश्याच्या अवस्थेत सुखाची स्वप्न पाहायची असतात. त्यालाच म्हणतात ”मरीपुडियुम”…

स्कूलमास्टर, सप्तपदी, शंकराभरणम (तेलुगू ), इरू कोडूघळ, वंजीकोट्टे वाळीबन, पुदू वसंतम, संसारम, इनितालै इनिक्युम (तामिळ), गज्जे पुज्जे (कन्नड) हे साउथ इंडियन भाषेतले सिनेमे मी त्यावेळी पाहिलेले आठवतात. हेच सिनेमे, मी नंतरही यूट्यूबवर पाहिले आणि त्यांचा आस्वाद घेतला. यामुळे मला सर्व दाक्षिणात्य भाषांमधले सिनेमे पाहण्याचाही नाद लागला. भाषा “कळो किंवा न कळो” पण मला तामिळ, कन्नड, तेलगू भाषेतले सिनेमे आवडू लागले. साउथ इंडियन पिक्चर्समधली सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी, स्क्रिप्ट, म्युझिक, डायरेक्शन हे सगळं मला खूप आवडायला लागलं. मी हिंदी सिनेमांबरोबरच मध्ये मध्ये “साउथ इंडियन सिनेमे” यूट्युबवर बघायला लागलो. त्यातूनच अलीकडे एक १९९३मधला पिक्चर पाहिला. “मरीपुडीयुम” असं त्या पिक्चरचं नाव. याचा अर्थ “पुन्हा”… या पिक्चरची आणि हिंदीतल्या “आखिर क्यूँ?” या पिक्चरची स्टोरी सारखीच होती. दोन्ही पिक्चर्स खूप छान आहेत. परंतु तामिळ पिक्चरमधल्या “रेवती” या अभिनेत्रीचं काम अतिशय सुंदर झालं आहे. तिला या भूमिकेकरता उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. हिंदीत स्मिता पाटीलने ही भूमिका केली आहे. “अरविंद स्वामी” या गुणी कलाकाराने राजेश खन्नाची भूमिका केली आहे.

मला या पिक्चरमधलं एक गाणं खूप आवडलं, जे एस.पी. बालसुब्रमण्यमने अतिशय अप्रतिम गायलं आहे. एस.पी. बालसुब्रमण्यमच्या आवाजाची क्वालिटीच वेगळी आहे. “येशूदास आणि एस.पी. बालसुब्रमण्यम” या दोघांचे आवाज म्हणजे साक्षात परमेश्वराचे आवाज वाटतात. या दोघांनी गायलेलं कोणतंही ट्रॅजिडी सॉंग ऐकल्यावर “डोळ्यात पाणी आलं नाही”, असं होणारच नाही. मला आवडलेल्या या गाण्याचे तामिळमधले शब्द असे आहेत…

“नलम वाळं, एन्नाडुम येन वायकतम्”…

“तमिळ पोडुम पल्लाटं येन वायतकळं”…

“इद वेणील मुनबासन वंदाडुम”…

गाण्याच्या चालीमध्ये मला थोडीशी आशा भोसलेंनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय मराठी भावगीताची “चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवर ही, सावर ही, चांदरात”ची चाल डोकावताना जाणवली.

हे गाणं पाहताना रेवतीचे एक्सप्रेशन्स एवढे सुंदर झाले आहेत की गाणं ऐकावं? की तिचे एक्सप्रेशन्स पाहावेत? असं होऊन जातं. “आयुष्यातलं एक सुख हरवल्यानंतर दुसरं सुख खरंच “पुन्हा” येईल का? असे भाव “रेवती”ने आपल्या डोळ्यात, आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या संपूर्ण अभिनयातून इतके सुंदर साकार केले आहेत, की वाटतं बघत राहावं. तिचा फक्त आणि फक्त मित्र आणि हितचिंतक असलेला अरविंद स्वामी तिला “पुन्हा” एकदा जगून बघ, म्हणजे आयुष्यात “पुन्हा” सुख येईल असं गाण्यातून समजावण्याचा प्रयत्न करत असतो… मला हे गाणं खूप भावलं.

त्याचा मराठी स्वैर अनुवाद असा आहे…

जेव्हा तुम्ही तरुण असता,

तेव्हा तुमच्याकडे सगळेच आकर्षित होतात

पण लोक कधी कधी रंगही बदलू शकतात..

मन आणि स्वभाव बदलूही शकतात..

प्रेम करताना ही चूक होऊ शकते..

सूर्य उगवतो, तसा तो मावळतोही…

समुद्रात लाटा उसळतात आणि नष्टही होतात..

सुखदुःखही येतं आणि जात राहतात..

एक सुख येऊन गेल्यावर आपण म्हटलं पाहिजे..

“मरुपडीयुम” म्हणजे… “पुन्हा”

“मरुपडियुम” हा एक भावनिक सिनेमा आहे. रेवतीने साकारलेल्या “वैवाहिक कलहात अडकलेली पत्नी” आणि त्यानंतरच्या तिच्या जीवनावर केंद्रित आहे. रेवतीचं लग्न रवी या चित्रपट दिग्दर्शकाशी झालं आहे, ज्याचं दुसरीवरच प्रेम आहे. “रेवती”ला तिचा पती आणि त्याच्या मैत्रिणीतील ही जवळीक कळते. परंतु तिचा पती रेवतीकडे दुर्लक्ष करतो. रवी रेवतीपासून घटस्फोट घेण्यासाठी पुढे जातो. रेवती रवीला घटस्फोटासाठी पुढे न जाण्याची विनंती करते. परंतु तो ऐकत नाही. अरविंद स्वामी, एक अनोळखी व्यक्ती, रेवतीला तिच्या पतीने सोडल्यानंतर मदत करतो आणि तिला मैत्रीपूर्ण आधार देतो. अरविंद स्वामी, रेवतीचा एक विश्वासार्ह मित्र बनतो. तो रेवतीला लग्न करण्यासाठी मागणी घालतो. परंतु रेवती स्वतःचा मार्ग “पुन्हा एकदा” निवडण्यासाठी निघून जाते.

“आखिर क्यूँ?” या हिंदी पिक्चरमध्ये राजेश खन्ना याच सिच्युएशनमध्ये गाणं म्हणतो. तेही छान आहे…

एक अँधेरा, लाख सितारे

एक निराशा, लाख सहारे

सब से बड़ी सौग़ात है जीवन

नादाँ है जो जीवन से हारे…

दुनिया की ये बग़िया ऐसी

जितने काँटे, फूल भी उतने

दामन में ख़ुद आ जाएँगे

जिनकी तरफ़ तू हाथ पसारे…

बीते हुए कल की ख़ातिर तू

आनेवाला कल मत खोना

जाने कौन कहाँ से आकर

राहें तेरी फिर से सँवारे..

दुख से अगर पहचान ना हो तो

कैसा सुख और कैसी ख़ुशियाँ

तूफ़ानों से लड़कर ही तो

लगते हैं साहिल इतने प्यारे…

एक अँधेरा, लाख सितारे

एक निराशा, लाख सहारे

मानवी आयुष्य हे आशा आणि निराशा, अंधार आणि प्रकाश यात हेलकावे खातच असतं. परंतु प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं आयुष्य सर्वात बहुमोल आहे. ईश्वराने आपल्याला दिलेली ती सर्वात मोठी देणगी आहे. सुख-दुःखाचा हा खेळ चालतच राहणार आहे. कितीही दुःख आली, संकटं आणि अडचणी जरी आल्या, तरी आपल्याला हाच विचार करायचा आहे की, आपल्याला सुखी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा… म्हणजेच “मरीपुडीयुम”…

Continue reading

गुड बाय मिस्टर जिम्मी विक्रोळीकर..

तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक १७६मध्ये राहायला गेलं. जूनमध्ये आम्ही मुलं विकास हायस्कूलचे विद्यार्थी झालो. मी पाचवीत प्रवेश घेतला.आमचे सख्खे...

दिल में होली जल रही है…

शेवटचा मराठी महिना फाल्गुन. आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी (होली). होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक सुरू होतं. ते सुरू होताना बाजारात पिचकाऱ्या, फुगे, गुलाल, रंग, बत्ताशांच्या, साखरेच्या गाठ्यांच्या, कुरमुऱ्यांच्या माळांचे स्टॉल्स दिसू लागले की होळीची चाहूल...

ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजनचा काळ गाजवणारे प्रा. अनंत भावे!

१९७७मध्ये भारतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. नवीन माध्यम असल्यामुळे आल्याआल्या लोकप्रिय झाले. तो दूरदर्शनचा जमाना होता. विक्रोळीत चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे घरातला छोटा रुपेरी पडदा म्हणजेच सर्वांचं मनोरंजनाचं विश्व बनलं. माहितीचा स्त्रोत असलेल्या रेडिओ आणि वर्तमानपत्रात आता टेलिव्हिजनची भर...
Skip to content