मुंबईत बोरिवली पश्चिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रेष्ठ भारत घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रखर देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
यानिमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वक्ते म्हणून भाजपाचे उत्तर मुंबई पूर्व जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते गणेश खणकर यांनी डॉ. मुखर्जी यांच्या पूर्वस्मृतींना उजाळा दिला. डॉ. मुखर्जी यांनी देशासाठी दिलेले बलिदान, त्यांनी दिलेली अंत्योदय संकल्पना व प्रेरणा यातूनच सतत गोरगरीब जनतेसाठी झटत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन गोपाळ शेट्टी यांनी यावेळी केले. आमदार उपाध्याय यांनीदेखील डॉ. मुखर्जी यांनी दिलेल्या शिकवणीतूनच पुढे मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. ‘खून भी देंगे.. जान भी देंगे.. मगर देश की मिट्टी कभी नही देंगे’.., ‘देशात दोन विधान दोन प्रधान’ कदापि चालणार नाही, असा नारा डॉ. मुखर्जी यांनी दिला होता. त्याची आठवणही त्यांनी करून दिली.
आमदार उपाध्याय यांनी अंत्योदय ह्या संकल्पनेतून शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या व अपघातात एक हात पूर्णपणे गमावलेल्या, अपंग असलेल्या बोरिवलीतील हर्षिता सिंग हिला गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने कॉम्प्युटर भेट देतानाच तिला १०वीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय करून देत, तिला आधुनिक हात प्रत्यारोपण करण्यासाठी दिनेश झाला यांच्या सहकार्याने मदत करणार असल्याचे उपाध्याय यांनी जाहीर केले. दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महिलांना तुळशीच्या रोपांचेदेखील वाटप याप्रसंगी करण्यात आले.
भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.